२/१२/२०१५

आजपासून रेडमी 4G फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशनशिवाय मिळणार!शाओमी या चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने फ्लिपकार्टसोबत फ्लॅश सेल हा विक्री प्रकार भारतात लोकप्रिय केला. आठवड्यातून एकदाच मर्यादित स्टॉकसाठी पूर्वनोंदणी केलेल्या ग्राहकांना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर ही विक्री व्हायची. मात्र आता कंपनीने शाओमी रेडमी नोट 4G या स्मार्टफोनची विक्री कुठल्याही पूर्व नोंदणीशिवाय करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आजपासून तुमच्या सवडीप्रमाणे कधीही फ्लिपकार्टवर तुम्ही हा फॅबलेट विकत घेऊ शकता.
या माध्यमातून शाओमीने सर्वप्रथम Mi3, त्यानंतर शाओमी रेडमी S1 आणि त्यानंतर शाओमी नोट 4G या स्मार्टफोनची विक्री केली. शाओमीने सध्या Mi3 आणि रेडमी S1 या स्मार्टफोनची विक्री थांबवली असली तरी नव्यानेच भारतीय बाजारपेठेत रूजू झालेला शाओमी Mi4 आणि शाओमी नोट 4G या फोनची विक्री मात्र सुरू आहे. फ्लॅश सेलमध्ये आठवड्यातील एका निश्चित दिवशी तसंच पूर्व नोंदणी केलेल्यांनाच शाओमी हँडसेट खरेदी करता येत असे. या फ्लॅशसेलमध्ये अवघ्या एक-दोन सेकंदात विक्रीसाठी ठेवलेला स्टॉक संपल्यावर फोनची प्रतिक्षा करणाऱ्या लाखो ग्राहकांची निराशा व्हायची. त्यामुळे अनेकजण या फ्लॅश सेलला वैतागलेही होते. मात्र शाओमी किती सेकंदात स्टॉक संपला याची माहिती प्रसारित करण्यातच धन्यता मानत असे. अनेकदा फ्लिपकार्टचे सर्वरही क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या. पण शाओमीने आपला फ्लॅश सेलचा फंडा बदलला नाही. आताही फक्त शाओमी रेडमी नोट 4G या एकाच स्मार्टफोनची त्यांनी फ्लॅशसेलऐवजी थेट विक्रीसेवा सुरू केलीय. तसंच नुकत्याच लाँच केलेल्या शाओमी Mi4 या फोनसाठी फ्लॅश सेल आणि पूर्व नोंदणी आवश्यक असेल, असं शाओमीने स्पष्ट केलंय. आजपासून फ्लिपकार्टवर कोणत्याही नोंदणीशिवाय तुम्हाला रेडमी नोट 4G हा फोन मिळवता येणार आहे.
फ्लिपकार्टबरोबर एअरटेलच्या काही निवडक स्टोअर्समध्येही शाओमी रेडमी नोट 4G हा फॅबलेट उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारीच्या वीकएन्डमध्ये रेडमी 4G ची खुली विक्री केली होती. त्यामध्ये नेमक्या किती फॅबलेटची विक्री झाली, याची माहिती शाओमीने अजून उघड केलेली नाही. रेडमी नोट 4G चा लूक आधीच्या 3G व्हर्जनप्रमाणेच आहे. या फोनचा स्क्रीन 5.5 इंच 720 पिक्सेल आयपीएस डिस्प्ले, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फॅबलेटचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 400 क्वाडकोअर आणि 1.6 गिगाहर्ट्झ गतीने प्रक्रिया करणारा आहे. तसंच या फोनची रॅम 2GB आहे. या फोनची इंटर्नल मेमरी 8 जीबी तर एसडी कार्डच्या सहाय्याने ती 64 जीबीपर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्राईडच्या 4.4 किटकॅट या ओएसवर चालतो तसंच या स्मार्टफोनची बॅटरी 3100 एमएएच क्षमतेची आहे. फक्त रू. 9999 किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये फक्त एकच सिम बसवण्याची सुविधा आहे. यापूर्वीच्या रेडमी नोट 3G हा स्मार्टफोन डबलसिम सुविधेचा होता.
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search