२/२७/२०१५

रिव्ह्यू : रझाकार
रझाकार हे अत्यंत क्रूर अन्याय करणारे दुराचारी अशी लोकं होती, पण ख-याखु-या रझाकारांचा अन्याय परवडला पण हा सिनेमात होणारा अन्याय जो आहे, त्याला कोणीतरी आवर घाला, असं म्हणायची वेळ आली.

सिनेमा सुरू होताना सचिन खेडेकरच्या धीरगंभीर आवाजात जी पार्श्वभूमी तयार होते, त्यानंतरचा सगळा सिनेमा हा त्याच्याशी विसंगत असल्यासारखा भासतो.

या सिनेमाची असलेली धग आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. कोणत्यारही प्रकारे हा सिनेमा त्या अन्यायकारी रझाकारांच्या विरोधातला आवाज म्हणून न राहता, त्याचा हास्यास्पद पातळीवरचा खेळ बनून राहतो. त्यामध्ये असणारा कोंबडीचोरी अन् त्या सगळ्याला दिलेलं अनन्यसाधारण महत्त्व अन् त्या सगळ्या गोष्टींमध्ये असणारी दाहकताच हरवून बसतं. या सगळ्या गोष्टीला असणारं गंभीर वळण हे इतकं हास्यास्पद पातळीवर आणून ठेवलंय की ते पाहता सिद्धार्थ जाधव अन् झाकीर हुसेन या कलावंतांनी हा सिनेमा कोणत्या लहरीत स्वीकारला असेल असा प्रश्न राहून राहून मनात येतो.

या सिनेमात आपल्यासमोरं ज्या प्रकारे हे सारं काही मांडण्याचा प्रकार केलाय तो एक खेळ गिमिक या पातळीच्या वर जात नाही, हे या सिनेमाचं अशक्तीस्थान म्हणता येईल.

या सिनेमाच्या कथेकडे वळूया... भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक अनोखी स्वातंत्र्यगाथेची ही कहाणी आहे. देशांतर्गत झालेल्या तर हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याची त्या सगळ्या गोष्टीला असणारा डंख वेगळा आहे. त्यामध्ये जाणवणारं एक गांभीर्य आहे. हैदराबादच्या नवाबासाठी लढणारी सशस्त्र संघटना म्हणजे रझाकार.

हैदराबाद संस्थानाच्या विलनीकरणाला विरोध अन् त्यासाठी भारत सरकारच्या विरोधात पुकारलेलं बंड. या सगळ्या गोष्टीचा कॅनव्हास किती मोठा. त्याची व्याप्ती किती मोठी.. त्या सगळ्याला त्या ग्रँजरमध्ये दाखवण्यासाठीचं हे कथानक म्हणजे आपसुक एक सहानुभूती प्रेक्षकांमध्ये निर्माण होते, त्या सगळ्याला एका वेगळ्या पद्धतीने मांडलं असतं, तर निश्चितच एक वेगळी गोष्ट आपल्यासमोर मांडली गेली असती. रझाकारांच्या अन्याय अत्याचाराला त्रासलेली जनता आहे. अशामधलं एक खंडगाव. तिथल्या गावक-यांच्या मनात रझाकारांची दहशत आहे. पण अजूनतरी रझाकार या गावात दाखल झालेले नाहीत अन् त्या सगळ्या गोष्टींमध्ये गावात असलेला भोळसट हरी म्हणजे सिद्धार्थ जाधव त्याची गुडघेदुखी असलेली आई म्हणजे ज्योती सुभाष अन् त्याच्या कोंबडी -शेळ्या - मेंढ्या चोरण्याने गावकरी हैराण झाले आहेत.

बारा बलुतेदारांचं असलेलं असं हे गाव. आता हे गाव म्हणून आपल्यासमोर उल्लेख होतो. प्रत्यक्षात आपल्याला दिसतात, ती मूठभर गिनीचुनी माणसं. अशा परिस्थितीत गावात गांधीबाबांच्या विचारांचा अहिंसा अन् सत्याग्रहाचा पुरस्कार करणारे कार्यकर्ते येतात, ते म्हणजे डॉ. शरद भुताडिया आणि त्यांचे कुटुंबिय अन् त्यांच्यासोबत आणखी दोन कार्यकर्ते. मग ते रझाकारांच्या विरोधात अहिंसक मार्गाने आंदोलन पुकारण्याचं आवाहन करतात. पण त्यांच्या गावात आणखी एक स्वातंत्र्यवीर पानसरे येणार असतात. त्यांना आणण्यासाठी ज्यावेळी गांधींचे अनुयायी जातात, पण त्यावेळी त्या स्वातंत्र्यवीरासमोर अचानक उभे ठाकलेले रझाकार अमानुषपणे त्यांना ठार करतात. अन् खंडगावात पुन्हा दहशत पसरते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये भारताबद्दलचं प्रेम जागृत कऱणा-यांच्या विरोधात हे उभे ठाकतात ते रझाकार एव्हाना खंडगावात दाखल होतात अन् मग त्या सगळ्यांच्या विरोधात गावकरी असतात. पण त्यांच्यासमोर कसा हरी उभा राहतो. एके काळी भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी रझाकारांचा आधार वाटावा, असं वातावरण हरीच्या मनात झालेलं असतं, पण तरीही त्यांच्या विरोधात तो कसा उभा राहतो, अशी ही कहाणी आहे.

क्लायमॅक्स म्हणाल तर तो अत्यंत हास्यास्पद करून ठेवला आहे. कोंबडी पळाली... तंगडी धरून, लंगडी घालायला लागली ... हे गाणं का लिहिलं असेल अन् कधी तरी कोणत्या तरी इव्हेण्टमध्ये सिद्धार्थ जाधवने त्यावर का परफॉर्म केलं असेल, त्याचं उत्तर या सिनेमात आपल्याला मिळतं.

रझाकारांचा प्रमुख असलेल्या झाकिर हुसेनच्या हातात असलेली कोंबडी ही त्याने रझाकारांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मागितलेली मन्नत असली तरी त्या रझाकाराचा जीव हा त्या कोंबडीत आहे. कारण तिला काय झालं तर आपली मन्नत पूर्ण होणार नाही. जे रझाकार माणसांना कोंबड्यांसारखे मारत होते त्यांचा जीव हा त्या मुमताज नावाच्या कोंबडीत आहे, हे काही केल्या न पटण्यासारखंच आहे.

या सगळ्यामध्ये...  या सगळ्या प्रकरणाला ... प्रकरण जरा मोठा शब्द आहे... उगाच आपण महत्त्व देतो असं म्हणून या गोष्टीला ज्या प्रकारे वळण मिळतंय. ते इतकं थिल्लर करून टाकलंय की रझाकार,... त्यांचा अन्याय... त्यांना कंटाळलेली त्या भागातील जनता... त्या सगळ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा हरीचा लढा... म्हणजे बिरबलने खिचडी पकत ठेवल्यासारखी वाटते. ज्याची धग काही लागणार नाही अन् खिचडी काही शिजणार नाही... हे सारं इतकं गुळमुळीत हास्यास्पद पातळीवर आणून ठेवलंय की हसावं की रडावं हेच कळत नाही.

हसण्यासाठी समोर घडणा-या ब-याच गोष्टी कारणं देत असतात... पण रझाकारांच्या अन्यायामुळे पिचलेली जनता अन् त्यां काळाला जोडणारे दुवे जाणणारी माणसं असतील तर ती निश्चितच खेद व्यक्त करतील...अर्थात हे सारं वस्तुनिष्ठ असलं तरी काल्पनिक आहे अशी ज्यावेळी सिनेमा सुरू होण्यापूर्वी जो डिस्क्लेमर येतो... त्याचवेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे होतं, असं मनात येतं.
दिग्दर्शक राज दुर्गेचा हा पहिलाच प्रयत्न आहे... हे या सिनेमावरून निश्चित जाणवतं.

गोष्ट, त्याची मांडणी अन् त्या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गंभीर विषयाला हास्यास्पद करण्यासाठी काय टाळायला हवं... हे एव्हाना त्यांना जाणवलं असणार... अन् आता ते मी सांगण्याची गरज नाही. या गोष्टीशी त्यांची नाळ जुळलेली आहे अन् तरीही या गोष्टीतलं गांभीर्य त्यांच्या हातून निसटतं, हे दुर्दैव म्हणायला हवं. या गोष्टीमधील दाहकता त्यांच्यापेक्षा आणखी कोणाला समजणार. पण त्याला विनोद अन् फार्सिकल टच द्यायचा प्रयत्न का केला असावा, याचं उत्तर राहून राहून मिळत नाही. रझाकारांच्या टोळक्यात मौलवी का आहे... तो माणुसकीची शिकवण फक्त हरीच्या बाबतीत का देतो... सॅटिनच्या कापडाचे भारताचे झेंडे का आहेत. गांधीबाबांच्या अनुयायी असणा-या डॉ. भुताडियांची जी सिनेमात मुलगी दाखवलीय ती प्रत्येक वेळा आता मी प्रेमात पडेन हं... असे एक्सप्रेशन्स... का देतेय...
बळीसोबतच्या तिच्या लव्हस्टोरीचा अट्टहास का... त्यासोबतच भोवताली असणा-यांना उद्देशून असणारे संवाद डॉ. भुताडिया चौथीकडेच बघत... शून्यात नजर घालून का बोलतात... की आपण जे काही बोलतोय... ते या सगळ्यांना कळणारच नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्याचं किंग लिअर आठवतंय मग आता असं का... असा प्रश्न...
सिद्धार्थ जाधव अशाप्रकारचे सिनेमे हल्ली का करू लागला आहे, असं वाटतं. त्चाया मध्यमवर्ग पण बरा होता... निदान त्या सिनेमाचा हेतू तरी स्पष्ट होता... पण हा सिनेमा त्यामधून त्याने साकारलेल्या ब-याच गोष्टी का कराव्या लागल्या आहेत... असा विचार येतो.

दिग्दर्शकाच्या हाती त्याची सूत्रं असतात, असा डिरेक्टर्स अॅक्टर म्हणून तो आहे... पण तरीही आता त्याला वेळीच आवर घालणं अन् मानधनाच्या आकड्यापेक्षा आता गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सिद्धू तो लोच्या झाला रे मधला सिद्धार्थ जाधव त्याचे प्रामाणिक प्रयत्न... स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी झटणारा सिद्धार्थ हरवलाय...त्याला तूच शोधू शकतोस... तो लवकर तुला सापडला तर आम्हाला परत कर... तो आमचा आहे... हा हरी तुझ्याकडेच ठेव... झाकिर हुसेनसारख्या हुशार कलावंताला वाया का घालवलंय, याचं उत्तर मिळत नाही. कॅमेरा.. कलादिग्दर्शन बॅकग्राऊण्ड स्कोअर या सगळ्या गोष्टी दुय्यम पातळीवर यांनी स्वत:च आणून ठेवल्या आहेत.

गावातील तीन वृद्ध माणसं सूत्रधाराइतकी सारखी येऊन बोअर करतात. त्यांच्यातला एक जण सारखा म्हणतो रझाकार आले की काय, त्यांच्या मनात जेवढी दहशत आहे. तेवढीच दहशत हा सिनेमा पाहिल्यावर तुमच्या मनात येईल... इतकी हास्यास्पद दहशत तुमच्या मनात नको बसायला.संदर्भ:एबीपी माझा
लेखक :अमित भंडारी

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search