२/२१/२०१५

भेकडांनो, हे घ्या उत्तर, पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'च्या विक्रीत वाढ


गोळ्यांनी माणूस मरेल पण विचार मरत नाहीत, कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या निधनानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

पानसरे दाम्पत्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातच हल्ला झाला होता. मात्र त्यानंतर म्हणजेच 17 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवाजी कोण होता? च्या तीन हजार प्रतींची विक्री झाल्याची माहिती लोकवाग्मय प्रकाशनने दिली आहे.

हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं. आजवर या पुस्तकाची 37 वेळा आवृत्ती छापाव्या लागल्या होत्या. आतापर्यंत 1.42 लाख प्रतींची विक्री झाली आहे तर आणखी पाच हजार पुस्तकांची मागणी नोंदवली गेली आहे. त्यामुळे पुस्तकाची प्रचंड विक्री हे लोकांनी हल्ल्याला दिलेलं उत्तरच म्हणावं लागेल.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्याने रात्री 10.45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे

अलीकडल्या काळात जात, धर्म, भाषा यांचा वापर समाजकारणासाठी करण्याचं प्रस्थ भलतंच वाढत चाललं आहे. आपल्या स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी वेगवेगळे भावनिक पातळीवरील म्हणजेच रोजच्या जगण्याच्या प्रश्नांशी काडीचाही संबंध नसलेले विषय उपस्थित करून समाजात दुही माजवण्याचे प्रकारही रोजच्या रोज घडताना दिसत आहेत. त्यातून मग जनमानसात वैमनस्य निर्माण होऊन प्रसंगी त्याचं रूपांतर हिंसाचारात झालं, तरी त्याची या तथाकथित समाजधुरिणांना पर्वा नसते. हे असल्या प्रकारचं विद्वेषाचं समाजकारण करण्यासाठी कायमच इतिहासातील थोर पुरुष आणि त्यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या विचारधारा यांना विकृत वळण देण्याचं काम केलं जातं आणि जणू काही या थोर पुरुषांनीच हे असं फाटाफुटीचे, वादविवादांचं आणि सुंदोपसुंदीचं समाजकारण करण्याची संथा सर्वसामान्य जनतेला दिली आहे, असं चित्र उभं केलं जातं.

इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.

छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे. त्याबद्दल पानसरे आणि ही पुस्तिका प्रकाशित करणारी `लोकवाङ्मय गृह' ही प्रकाशन संस्था यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

शिवाजी महाराजांविषयी प्रसृत केलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे `महाराज हे केवळ हिंदूंचे राजे होते आणि त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराचीच भावना होती.' अर्थात हा असा गैरसमज समाजात पसरवण्यामागचं राजकारण काय आहे, ते सांगण्याचीही गरज नाही. पानसरे यांनी आपल्या लेखनातून हा गैरसमज ठामपणे खोडून काढला आहे. पानसरे लिहितात : ``शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप वा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत?... शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते... मग असं का व्हावं?...''

त्याचं उत्तरही पानसरे यांनी देऊन टाकलं आहे. त्यांच्या मते `हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजी महाराजांना यश प्राप्त झालं, हे खरं नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी महाराज आणखी काहीतरी चांगलं करायला निघाले होते, असं दिसतं...'' काय होतं हे चांगलं काम?

तर महाराजांच्या मनात आपलं राज्य, सत्ता वा अंमल प्रस्थापित करायची गोष्ट आली, त्याचं कारण त्या काळातले, वतनदार, जमीनदार, सुभेदार आणि पातशहा यांच्याबरोबरच पाटील-कुलकर्णी आदी मंडळींनी गोरगरीब रयतेवर चालवलेले अत्याचार हे होतं. त्या अत्याचाराच्या विरोधात महाराजांनी मोठा लढा दिला आणि आपला अंमल प्रस्थापित केला. असा लढा देऊन उभी राहिलेल्या सत्तेला दुसर्‍या कोणावर अन्याय करण्याचा नैतिक हक्क तर नव्हताच शिवाय, या लढय़ासाठी समाजाच्या तळागाळातून उभी राहिलेली जनताही, त्या सत्तेला म्हणजेच महाराजांना सोडून गेली असती.

अर्थात, केवळ राज्य जाईल म्हणून महाराजांनी रयतेला प्रेमानं वागवलं, असं नाही तर त्यांच्या मनातच `आम आदमी'विषयी कशी जिव्हाळय़ाची भावना होती, ते अनेक उदाहरणांनिशी पानसरे यांनी दाखवून दिलं आहे. महाराजांच्या सैन्यात केवळ मुस्लिम सरदारच नव्हे तर सैनिकही होते. त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराची भावना असती, तर असा धोका त्यांनी पत्करला असता का, हा पानसरे यांचा सवाल आहे.

पानसरे म्हणतात : ``याचा अर्थ शिवाजी महाराज हे धर्मच मानत नव्हते वा ते निधर्मी होते किंवा त्यांनी आपलं राज्य निधर्मी म्हणून घोषित केलं होतं, असा मात्र नाही. महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते... पण याचा अर्थ ते मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते का?'' या प्रश्नाचं उत्तरही पानसरे यांनी तपशीलात जाऊन दिलं आहे. ते अर्थातच नकारार्थी आहे. त्यासाठी त्यांनी सभासदाच्या बखरीचा हवाला दिला आहे. बखरकार म्हणतात : ``मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालवले...''

महाराजांविषयी असलेला किंवा काही मतलबी मंडळींनी पसरवलेला आणखी एक गैरसमज म्हणजे महाराज हे फक्त मराठय़ांचेच राजे होते. प्रत्यक्षात चित्र काय होतं? शिवाजीच्या सहकार्‍यांमध्ये सर्व जातिधर्माचे लोक होते. न्हाव्यांपासून मराठय़ांपर्यंत आणि ब्राह्मणांपासून प्रभू-शेणवींपर्यंत सर्वांचा गोतावळा शिवाजी महाराजांनी उभा केला होता...

शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य या सर्वसमावेशकतेत आहे. जातिधर्माचे, तुकडय़ातुकडय़ांचे समाजकारण करणार्‍यांच्या लक्षात ही बाब आणून देण्याचे फार महत्त्वाचे काम गोविंद पानसरे यांनी ही पुस्तिका लिहून केलं आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search