असं म्हणतात की बायकांच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखता येत नाही. बाईच्या मनाला ३६ कड्या अन ३६ कुलुपं, प्रत्येकीची वेदना वेगळी अन प्रत्येकीचा हुंदका वेगळा. असे कितीतरी हुंदके रोज उरातल्या उरत दबून जात असतील देव जाणे.
कुठे लग्न झालेल्या नव्या नवरीची घुसमट तर कुठे तरुणपणीच विधवा झालेल्या स्त्री च्या यातना. कुठे प्रोढ कुमारिकांचा कोंडमारा तर कुठे जोर जबरदस्ती. या सगळ्यांना आपली होणारी भावनिक आणि शारीरिक घुसमट कधीच व्यक्त करता येत नाही, किंबहुना आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना इतकं गृहीत धरलं जातं ना की या सगळ्या गोष्टींची साधी दखल सुद्धा कोणाला घ्यावीशी वाटत नाही.
खरंच, बाईच्या मनात काय चाललाय हे पुरुषांना थोडं जरी कळलं ना तरी बाईचा जन्म कितीतरी सुखकर होईल. कारण आपल्या भारतासारख्या पुरुषप्रधान आणि संस्कृती जपणाऱ्या देशात अजूनही स्त्रीला आपल्या सगळ्या भावना व्यक्त करता येत नाहीत आणि कोणी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर अनैतिकतेचा ठपका ठेऊन आपण मोकळे होतो. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाहीत.
पण, संकृती संस्कृती म्हणजे तरी काय हो तुम्ही आम्ही मिळून केलेली जगण्याची सुंदर परिभाषाच ना मग, ती कालानुरूप थोडीफार बदलली तर बिघडला कुठे?? या थोड्याश्या बदलाने जर कित्येकीना आनंद मिळणार असेल तर असा बदल का नाकारायचा?? चांगले बदल हे नेहमी समाजाला पोषकच ठरतात आणि याची सुरवात आपल्या पासूनच झाली पाहिजे. त्यामुळे बदलला सामोरं जायचं की जुन्या रूढी, परंपरांना कुरवाळत बसायचं हे ज्याच त्याने ठरवावं.
Blogger द्वारा समर्थित.