२/१२/२०१५

दुसऱ्याला पोर झाल्याचा आनंद किती करणार? मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सोडला बाण !


दुसऱ्याच्या घरामध्ये पोर झालं तर फार दिवस आनंद साजरा करता येत नाही', असा पलटवार दिल्लीतील 'आप'च्या विजयाने आणि भाजपच्या पराभवाने खुष झालेल्या शिवसेनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दिल्लीतील पराभवाचे आम्हाला चिंतन करावे लागेल, त्यामागची कारणे तपासावी लागलीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

दिल्लीतील भाजपच्या पाडावानंतर शिवसेना-भाजपच्या संसारात पुन्हा एकदा खटके उडू लागले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना थेट लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातूनही भाजपला झोडपण्यात आले आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांनीही सरकारविरोधी मोहीम उघडली आहे.

शिवसेनेचा सर्वात जास्त राग महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर असून त्या खात्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी उद्धव यांच्याकडे 'दिल्ली निकाला'च्या मुहूर्तावरच राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. भाजपकडून योग्य वागणूक मिळत नाही. जनतेची कामे होत नाहीत. मग मंत्रिपदावर का रहायचे?, अशी आपल्या मनातली खदखद राठोड यांनी उद्धव यांच्यापुढे मांडली. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना आज पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले. आधी राजकीय प्रश्न येथे नकोत, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

राठोड यांच्या नाराजीबाबत मुख्यमंत्र्यांनी विचारले असता त्यांनी शिवसेनेवरच बाण सोडला. राठोड नाराज असतील तर शिवसेनेच्या मंत्र्यांबाबतही भाजपच्या राज्यमंत्र्यांची हीच भावना असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 'सर्व राज्यमंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत. राठोड यांची मागणी अधिकच्या अधिकारांची आहे. यावर समन्वयातून तोडगा काढला गेला पाहिजे', असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीला शरद पवारांकडे चाललेले नाहीत. तेथे विकास प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी ते चालले आहेत. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. पवार आणि मोदी यांनी भेटायचेच नाही, अशा प्रकारची राजकीय अस्पृष्यता निदान आपल्या देशात तरी नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search