२/२३/२०१५

तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी पाचशेची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं... 
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

घराबाहेर पडताना मोठ्यांच्या पाया 
पडावसं वाटलं तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला 
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

जुने, साधेसुधे शाळकरी मित्र 
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी 
कडकडून मिठी माराविशी वाटली 
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही 
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आईने किसलेल्या खोबर्याचा आणि 
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


संध्याकाळी सातच्या आत घरात
येऊन शुभंकरोती म्हणावसं वाटलं 
की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून 
घेतलेल्या बाईकचं, 
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या 
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन 
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


चाळीतल्या दिवसांच्या, 
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या 
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं 
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप 
काम करत असलेल्या तिच्या 
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली 
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...


नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले, 
ज्यांनी आयुष्य घडवलं ती 
मंडळी नुसती आठवली‍, 
तरी समजावं..
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search