
मावळत नाही सूर्य आता
पूर्वी जसा मावळत होता
खवळत नाही दर्या आता
पूर्वी जसा खवळत होता
चौपाटीच्या दर्यामधले
मासे सगळे वाहून गेले
पांगणाऱ्यांच्या पांगल्या होड्या
कोळ्यांचे तर तुटले जाळे
चौपाटीची भेळ आता
पूर्वीसारखी खाववत नाही
शहाळ्यातले पाणी आता
कांही केल्या पिववत नाही
कश्तीवाला कावसबावा
आता जोडीत नाही हात
शेंगा गंडेरीशी भांडून
झाली पुरती वाताहात
"कडकचंपे" चंपीवाला
चोळीत बसतो आपलेच पाय
चौपाटीचा चणेवाला
आपलेच चणे आपण खाय!
पूर्वीच्या त्या पोरी आता
आया होऊन येतात इथे
त्यांच्या मागून मागून फिरतात
त्यांच्या तारुण्याची भुते
टिळकांचाहि पुतळा आता
सारें काही पाहून थकला
मर्सीडिजचा तर म्हणतो
बळवंतराव - होरा चुकला!
- पु.लं. (संग्रहित)