नोकियाचा 1100 हा फोन आता तसा पार विस्मृतीत गेलाय. पण अँड्राईड स्मार्टफोनचं युग अवतरण्यापूर्वी जेव्हा मोबाईल फोनच्या दुनियेत नोकियाचा दबदबा होता, तेव्हा नोकिया 1100 हा एक खूप लोकप्रिय फोन होता. लाँच झाला तेव्हा चार हजार रूपयांना मिळणारा फोन शेवटी शेवटी तर फक्त त्याच्या मॉडेलच्या नावाप्रमाणे फक्त 1100 ते 1200 रूपयांना मिळायला लागला. ज्यांनी खूप सुरवातीच्या काळात कधीतरी नोकिया 1100 वापरला असेल त्यांना तर तो आठवतही नसेल.
नोकियाच्या कोणे एके काळच्या या लोकप्रिय स्मार्टफोनची आठवण आता पुन्हा काढायचं कारण म्हणजे, मायक्रोसॉफ्टने संपूर्ण व्यवसाय आणि ब्रँड विकत घेतल्यानंतर उरलेल्या नोकियाने आता 1100 हा फोन अँड्राईड ओएसवर काढायचा निर्णय घेतलाय. फक्त नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील विक्रीकराराच्या वेळी झालेल्या एका कलमानुसार, नोकियाला 2016 पर्यंत कोणताही फोन नोकिया या नावाने बाजारपेठेत लाँच करता येणार नाही. त्यामुळे ही मुदत संपताच, नोकिया अँड्राईड 5.0 लॉलिपॉप या ओएसवर आधारित स्मार्टफोनच्या विक्रीला सुरूवात करणार आहे. 2016 हे वर्ष संपायला अजून 22 महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत रिसर्च आणि विकास तसंच व्यावसायिक निर्मितीची कामे पूर्ण करण्याचा नोकियाचा मानस आहे.
नोकिया 1100 हा फोन अँड्राईड ओएसवर येत असल्याची माहिती गीकबेंच साईटवर लीक झालीय. कोणत्याही नव्या फोनची परफॉर्मन्स टेस्ट करण्यासाठी असलेल्या मानकात गीकबेंच हे एक महत्वाचं मानक समजलं जातं. बेंचमार्क स्कोअरिंगसाठी गीकबेंचकडे आल्यावर नोकिया 1100 हा स्मार्टफोन अँड्राईड ओएसवर येणार असल्याची माहिती जगाला समजली.
गीकबेंचनुसार, नोकिया 1100 हा त्याच्या आधीच्या लौकिकाप्रमाणेच एक बजेट फोन असेल. अँड्राईड 5.0 लॉलिपॉप ओएसवर आधारित याफोनचा प्रोसेसर क्वाडकोअर श्रेणीतला मीडियाटेक 1.3 गीगाहर्ट्झ क्षमतेचा आहे. या बजेट स्मार्टफोनचा स्क्रीन डिस्प्ले 720 पिक्सेलचा असून फोनची रॅम 512 एमबी आहे. गीकबेंचने आतापर्यंत फक्त एवढीच माहिती लीक केलीय.
नोकियाने यापूर्वी अँड्राईड आधारीत N1 या टॅबलेटची निर्मिती केली होती. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
नोकियाच्या अत्यंत लोकप्रिय फोनपैकी एक असलेला नोकिया 1100 हा फोन 2003 मध्ये लाँच करण्यात आला होता. नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील करारानुसार नोकिया 2016 पर्यंत कोणत्याही मोबाईल फोनची निर्मिती करू शकणार नाही. या करारातील अटीतून मार्ग काढण्यासाठी नोकियाने टॅबलेटची निर्मिती केली होती. आता त्यांना टॅबलेटच्या पुढे जाऊन स्मार्टफोनची निर्मिती करायची आहे.
संदर्भ: abpmajha
लेखक :anonymous