३/२१/२०१५

शाहीर साबळे यांचं निधन
'महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले शाहीर साबळे यांचं आज निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी शाहिरांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा... हा खड्या आवाजातला शाहीर साबळेंचा पोवाडा घराघरांत दाखल झाला... पण, हाच पहाडी आवाज आता कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेलं हे गीत... पण शाहीर साबळेंनी ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं.

साताऱ्याच्या वाई तालुक्यात पसरणी गावात शेतकरी कुटुंबात 3 सप्टेंबर 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. सानेगुरूजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचं बाळकडू त्यांनी आत्मसात केलं. जागृती शाहीर मंडळाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार केले. 1942 साली शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळ असो की, हैदराबाद मुक्ती संग्राम... संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की, गोवा मुक्ती आंदोलन... शाहिरांचा डफ कडाडत राहिला.

मात्र, 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमानं शाहीरांचं आयुष्यच पालटून गेलं. महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं आणि कलांचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम तुफान गाजला. संगीत दिग्दर्शक मुलगा देवदत्त, नृत्य दिग्दर्शिका कन्या चारूशीला, यशोधरा असं अख्खं साबळे कुटुंबच महाराष्ट्राच्या लोकधारेत सामावून गेलं होतं. शाहिरांचा कलागुणांचा वारसा त्यांचे नातू, प्रख्यात सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही जोपासलाय.

1998 साली शाहीर साबळेंना भारत सरकारतर्फे पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आलं. त्याशिवाय संगीत नाटक अकादमीसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. 1990 सालच्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. तरूण पिढीमध्ये कलागुण रूजवण्यासाठी त्यांनी 'शाहीर साबळे प्रतिष्ठान'चं बीज रोवलं. वृद्ध, निराधार कलावंतांसाठी तपस्याश्रमाची स्थापना केली. महाराष्ट्राच्या लोककलांचा मानबिंदू असलेल्या शाहीर साबळेंचं वयाच्या 92 व्या वर्षी शुक्रवारी निधन झालं. परळच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सतत गर्जत राहणारा बुलंद आवाज कायमचा शांत झाला.संदर्भ: zeenews
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search