३/२८/२०१५

आधुनिक संगीत - एक चिंतन !


बप्पी लहिरी पासून सुरु झालेली आधुनिक संगीतातली क्रांती आता हनी सिंगपर्यन्त येउनस्थिरावली आहे. आधुनिक संगीत म्हणजे नवसंगीत नव्हे. संगीत आणि आधुनिक संगीत हेसर्वस्वी भिन्न विषय आहेत. संगीताची निर्मिती ही शब्द,सूर,लय,ताल, वाद्य ह्यांच्याअभ्यासपूर्ण एकत्रीकरणातून होते. शब्द कसे असावेत, ते ताल,सूर,लय यांचा वापर करून कसेवापरावेत या सगळ्या गोष्टींना संगीतामध्ये नियम आखून दिलेले आहेत. आधुनिक संगीत याअसल्या प्रकारांना मानत नाही. शब्द आणि वाद्य ह्यापासून ध्वनीनिर्मीती हा आधुनिक संगीताचा एकमेव उद्देश आहे! त्यातही शब्द एकाच भाषेतले असले पाहिजेत असं काही नाही.मुळात शब्दांना अर्थ असतो किंवा असावा यावर आधुनिक संगीतकारांचा विश्वासनाही.ऐकणाऱ्याने शब्दाचे अर्थ आपापल्या सोयीने लावून घ्यावे असं त्याचं मत आहे.आणिवाद्यांमध्ये रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजापासून ते घरातल्या भांड्याकुन्ड्यापर्यन्त काहीहीवापरता येतं. संगीतामध्ये जसं एखाद्या कवितेचं गाण्यात अलगद रुपांतर होते तसं इथे होतंनाही. अलगद,हळुवार,मधुर हे शब्दच आधुनिक संगीतकारांना मान्य नाहीत. इथेधांगडधिंगा,कर्णकर्कश् अशे शब्द जास्त प्रचलित आहेत. या संगीत निर्माणाचे एक प्राथमिक सूत्रआहे. दहा-पंधरा विस्कळीत शब्द घ्यायचे (इंग्लिश असतील तर बेस्टच!) आणि वाद्यांच्याआवाजात त्यांना बसवायचे. नंतर गायकाकडून ते केकाटुन घ्यायचे. त्यात वेगवेगळे संगीतकारआपापल्या शैलीने बदल करतात. कमी जागेत जास्त सामान जबरदस्तीने भरताना जशी कसरतआपल्याला करावी लागते त्यालाच आधुनिक संगीतात रचनात्मकता म्हणतात. जुन्या काळातबघा प्रख्यात संगीतकारांचा वाद्यवृंद असायचा. मग रेकॉरडिंग सुरु असताना संगीतकार समोरउभं राहून त्यांना मार्गदर्शन करायचा. आधुनिक संगीतात वाद्यवृंदाला मार्गदर्शनाची गरज नसते. 'मार्ग दिसेल तिकडे वाजवा' या नियमानुसार ते वाजवतात. 'आधी कविता, मग चाल, त्यानंतर संगीत' या पुरातन कल्पनेला आता जागा नाही. जी कशीही 'चालवता' येते ती चाल ही नवीन संकल्पना आता रुजलेली आहे. त्याप्रमाणे 'आधी आवाज, मग चाल, त्यानंतर चालीत बसतील ते शब्द' ही आधुनिक संगीताची पद्धत आहे.
जुने-जाणते रसिक या संगीतप्रकारावर टीका करतात. पण 'कुछ तो लोग कहेंगे' या उक्तीनुसार आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण आधुनिक संगीत आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. किंवा ते पाश्चात्य संगीताचं अनुकरणही नाहीये. आता हेच बघा ना, जुन्या काळात गीत-संगीताला न्याय देऊ शकेल अश्या क्षमतेचा गायक निवडण्यात यायचा. आधुनिक संगीतात आधी गायकाची लायकी ओळखून मग संगीत निर्माण केलं जातं. उदा. काहीही झालं तरी संजय दत्त चालीत गाऊ शकणार नाही हे आधीच ओळखून," ऐ शिवानी ...तू लगती हैं नानी" या गाण्याला चाल दिलीच नाही. तुला जमेल तसं म्हण बाबा! किंवा प्रेक्षकांना आपल्या गाण्यापेक्षा कतरीना चा डान्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे हे लक्षात घेऊन, स्वत: च्याच एका मराठी गाण्याचं संगीत तसच्या तसं उचलून "चिकनी चमेली" गाण्याला देण्यात आलं. फुकट मेहनत कशाला करायची ? मागणी तसा पुरवठा ! असे अभिनव प्रकार पाश्चात्य संगीतात होत असतील का ?पाश्चात्य संगीतातले पॉप आणि रॉक आपल्याइथे वापरतात या आरोपातही तथ्य नाहीये. कारण त्यासाठीसुद्धा प्रशिक्षण लागतं. आधुनिक संगीत हे मुक्त संगीत आहे. किंवा मोकाट संगीत म्हटलं तरी चालेल.मला सांगा ,"आता माझी सटकली ..मला राग येतोय" या गाण्यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का ? हनी सिंगची सुद्धा गरज नव्हती. रोहित शेट्टी पुरेसा होता! मला तर नवीन गायकांच कौतुक वाटतं. जुन्या काळी गाण्याचा भावार्थ रसिकांपर्यन्त पोहोचवणं ही जबाबदारी गायकाची असायची. "आज ब्लू हैं पानी पानी” या गाण्यातून बिचार्यांनी रसिकांपर्यन्त काय पोहोचवणं अपेक्षित आहे? तरीसुद्धा तल्लीन होऊन गातात.
शाळेत असताना बघा आपल्याला बडबडगीते शिकवण्यात यायची. थोडीफार करमणूक आणि त्याद्वारे बालशिक्षण असा त्याचा ठराविक साचा असायचा. हा बालशिक्षणाचा वसा आधुनिक संगीतानेसुद्धा घेतला आहे. फक्त त्यात थोडा बदल करून बालवयातच प्रौढ शिक्षण असा नवीन साचा तयार केला आहे. पूर्वी घरादारात उच्चारायला अघोषित बंदी असलेले शब्द आता गाण्यांमध्ये सहज वापरतात. कुटुंब सोबत असताना रस्त्यावर एखाद्याने शिवी हासडली तर आजकाल कोणाला ओशाळल्यासारखं होत नाही कारण मुलाबाळांच्या कानांवर ते संस्कार आधीच झालेले असतात. उलट या प्रसंगातून त्या शिव्यांचा "वाक्यात उपयोग" कसा करायचा हे ज्ञान मुलांना मिळते. प्रौढशिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून आधुनिक संगीतकारांचा गौरव करायला हवा. भविष्यात शाळेत प्रौढशिक्षणाचं विधेयक संमत झालंच तर त्यासाठी आधुनिक संगीताचा कितीतरी उपयोग होईल. सरकारच्या रोजगारनिर्मिती धोरणाला सुद्धा आधुनिक संगीताचा पाठींबा आहे. संगीत ही फक्त कलाकारांचीच मक्तेदारी नसून कोणीही त्याची निर्मिती करू शकतं हा विश्वास आधुनिक संगीतानेच निर्माण केला. त्याद्वारे कितीतरी होतकरू तरुणांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी ज्यांना वाद्यांची साफसफाई करायला सुद्धा ठेवलं नसतं तेचं लोकं आता वाद्यांचा सफाईने उपयोग करतायेत. शिवाय आधुनिक संगीताला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद ही त्यांच्या यशाची पावती आहे.तरीसुद्धा आधुनिक संगीताला अजून योग्य तो मान मिळत नाहीये ही आमची खंत आहे. या संगीत प्रकाराला अभिजात संगीताचा दर्जा मिळायलाच हवा. कारण दिसण्यासारखे फरक कितीही असले तरी संगीत आणि आधुनिक संगीतात बरचसे साम्यसुद्धा आढळते.म्हणजे बघा, दोन्ही संगीतप्रकारांना प्रेरणेची गरज आहेच. संगीताला निसर्ग,अध्यात्म, प्रेम वगैरे गोष्टीतून प्रेरणा मिळते. तर आधुनिक संगीताला कुठूनही प्रेरणा मिळू शकते. म्हणजे अगदी बाई नं बाटली पासून झंडू बाम किंवा अगदी लुंगी पर्यन्त कुठूनही ! शिवाय प्रत्येक कलाकृतीचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे दर्दी, तर आधुनिक संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे गर्दी! कधी एखाद्या डिस्को-पब मध्ये जाउन बघा. आधुनिक संगीताचे कदरदान तुम्हाला तिथे दिसतील. त्या वातावरणातच या संगीतप्रकारातले बारकावे कळतात. "चार बोतल व्होडका" या गाण्याचा मतितार्थ चार बाटल्या रिचवल्यावरचं कळतो (अरे एवढी पिल्यावर लोकांना आयुष्याचा अर्थ कळतो तर गाण्याचं काय घेऊन बसलात!). थोडक्यात म्हणजे, संगीत ऐकून धुंद होण्यापेक्षा आधी धुंद होऊन नंतर संगीत ऐकले तर त्याची मजा औरचं!


संदर्भ:chinarsjoshi.blogspot.in
लेखक :चिनार जोशी
छायाचित्रे:anonymous
मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search