नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय.
तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू "
पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे !
वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल. आता हेच बघा ना, लग्न लागल्यावर सगळ्यांना वधु - वरांसोबत फोटो काढायचा असतो. ग्रुप फोटोसाठी आधे इधर -आधे उधर असं करून पंधराजण फोटोसाठी वधु-वराजवळ उभे राहतात. समोर मुख्य फोटोग्राफर चा कॅमेरा, घरातला एक कॅमेरा, एका नातेवाईकाने नविनच घेतलेला अत्याधुनिक कॅमेरा, दोन -तीन मोबाईल कॅमेरे असे जवळपास ६-७ कॅमेरे असतात. फोटो निघतो. सगळ्यांना अगदी भरून पावल्यासारखं होतं. फोटोसुद्धा अगदी आरशात बघितल्यासारखा स्वच्छ येतो. फक्त एवढंच होते की फोटोतला प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅमेराकडे बघत असतो ! किंवा एखाद्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असतो. नातेवाईक, मित्र, बालगोपाळ केक भोवती जमतात. तेवढ्यात केकचे फोटो काढण्याची सूचना येते. मोठमोठे मोबाईल खिशातून बाहेर येतात. वेगवेगळ्या कोनातून केकचे फोटो निघतात. मुलगा- आई, मुलगा-बाबा, आई-बाबा, आई-बाबा-मुलगा, मुलगा-केक, आई-बाबा-मुलगा-केक अश्या शक्य असलेल्या सगळ्या जोड्यांचे फोटो निघतात. मग केक कापल्यावर आई मुलाला केक भरवताना, बाबा मुलाला केक भरवताना, आई -बाबा एकमेकांना भरवताना असे फोटो होतात. सगळ्या पाहुण्यांना अगदी अपूर्व सोहळा पाहिल्याचा आनंद होतो. इथपर्यन्त ठीक आहे पण याच्या अगदी विरोधी फोटो सुद्धा तुम्ही सोशल मेडिया वर बघितले असतीलच. रस्त्यावर अपघात होतो. बसने मोटरसायकलला धडक दिलेली असते . मोटरसायकलस्वार जखमेने विव्हळत असतो. काही लोक त्याची गाडी उचलतात, काही त्याला धीर देतात, काही त्याच्या घरी संपर्क करतात, काही नुसतेच बघ्याच्या भूमिकेत असतात.आणि काहीजण खिशातला फोन काढून त्या दृश्याचे फोटो काढतात !
फोटो काढण्याची आणि काढून घेण्याची चढाओढ सुरु झाली आहे. लहानपणी बगीच्यात गेल्यावर पाळण्यावर बसण्यासाठी भलीमोठी रांग असायची. तशी रांग आतासुद्धा असते. पण ती बसून झुलण्यासाठी नाही तर बसून फोटो काढण्यासाठी! बरं, एक फोटो काढून समाधान होत नाही, १५-२० फोटो हवे असतात. मग हाती डीजीकॅम घेतलेले उत्साही नवरे किंवा बाप वेगवेगळ्या कोनातून फोटो काढतात. प्रत्येक माणसात कुठेतरी एक कलाकार दडला असतो असं म्हणतात. डीजीकॅम हातात आल्यावर बऱ्याच लोकांमध्ये 'आपल्यातला कलाकार सापडलाय' अशी भावना बळावत असावी. खरं म्हणजे फोटोग्राफी मध्ये झालेल्या तांत्रिक क्रांतीमुळे या नवक्रांतीकारक फोटोग्राफर्सचा जन्म झालाय. आधी ३६ फोटोंची रीळ वर्षभर पुरवावी लागायची. डिजिटल कॅमेरे आल्यापासून रीळ वैगेरे भानगड उरलीच नाही. एका तासात ३६ फोटो काढायचे. त्यातले २-३ तरी बरे येतातच ! वाट्टेल त्या गोष्टींचे फोटो काढत सुटतात. घरातल्या गॅलरीतून बाहेर उडणाऱ्या पक्षांचे फोटो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ! घरातल्या पंख्याचा फोटो. मोशन फोटोग्राफी ! कपात स्थिर झालेल्या चहाचा फोटो. स्टिल फोटोग्राफी ! मस्ती करणाऱ्या स्वत:च्या मुलांचा फोटो. कॅन्डीड फोटोग्राफी ! (माझ्या तीन वर्षाच्या पुतण्याचे हजाराच्या वर फोटो असतील ! माझ्या लहानपणी फोटो काढताना आमच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांना दूरच ठेवायचे. एखाद्या ग्रुप फोटो मध्ये कोणाच्यातरी कडेवर किंवा खाली जमिनीवर आम्ही बसायचो. किंवा उत्साहाच्या भरात एखाद्या फोटोत कुठूनतरी कोपरयातून डोकं बाहेर काढून आपली हौस भागवून न्यायची. पूर्ण देह दिसेल असे तर फारच कमी फोटो असतील.)
पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या फोटोग्राफरचे फोटो कोणीच काढत नाही. तो स्वत: मोठ्या ऐटीने कॅमेराची किंमत, फीचर्स सगळ्यांना सांगतो. कॅमेराचा कौतुक सोहळा पार पडतो. प्रत्येकजण आपापले फोटो काढून घेतो. त्याचे फोटो काढायला कोणीच उरत नाही. (म्हणूनच मी ठरवलंय आयुष्यात कधी कॅमेरा घ्यायचा नाही. खिशातले पैसे खर्च करून लोकांचे फोटो काढण्याचे धंदे सांगितले कोणी ?) स्वत: चे फोटो काढण्यातली गोची लक्षात आल्यावर एक नवीन प्रकार उदयास आला. सेल्फी !! स्वत: चे फोटो स्वत: काढणे. सेल्फीचं तांत्रिक नाव बहुधा 'उठसूट फोटोग्राफी' असं असावं. कारण सेल्फी काढायला कुठलही कारण किंवा प्रसंग असावा लागत नाही. मनात आलं की मोबाइल हातभर लांब धरायचा आणि क्लिक ! बसमधून फिरताना, जेवतांना,व्यायाम करतांना, पुस्तक वाचतांना सेल्फी कधीही काढता येतो. म्हणूनच सेल्फी काढताना माणसाने कितीही लपवलं तरी फोटोत 'आपण बावळटपणा करतोय' हे भाव दिसल्याशिवाय राहत नाही. जसं फ्लॅशमूळे काही लोकांचे डोळे मिटतात तसं सेल्फी काढताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. ती चमक म्हणजेच मेंदूने पाठवलेला 'काय बावळटपणा लावलाय' असा संदेश असतो. फोटोग्राफी ही जर कला असेल तर सेल्फी हे त्या कलेचं विडंबनचं म्हणावं लागेल.
खरं म्हणजे कॅमेरा हा मानवी इतिहासात लागलेला एक विलक्षण शोध आहे. घडलेला एखादा प्रसंग कैद करून ठेवता येणे म्हणजे विज्ञानाची देणगीच म्हणावी लागेल. पण इथेच थोडीशी गल्लत झालीये. विज्ञानाची देणगी ही घडणारा प्रत्येक क्षण नव्हे तर 'एखादा' प्रसंग कैद करून ठेवण्यासाठी आहे.कारण घडणारे प्रसंग हे आठवणीत ठेवण्यासाठी असतात, "गॅलरीत" ठेवण्यासाठी नाही ! त्यासाठीच ईश्वराने डोळ्यांसारखा कॅमेरा निर्माण केलाय. ज्याद्वारे असंख्य क्षण स्मृतीच्या गॅलरीत साठवले जातात. आणि स्मृतीपटलावर हवे तेंव्हा बघता येतात.संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :चिनार
chinarsjoshi@gmail.com
7350948300
वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita