३/०२/२०१५

विठ्ठल: एक संवाद !विठ्ठला... 

उन्हानं करपते त्वचा 

घामानं सुटते जांघेत, काखेत खाज 

कुठल्याही परफ्युमनं झाकता येत नाही 

अंगावरच्या घामाचा उग्र वास 

मग विठ्ठला... 

तू कसा उभायेस युगानुयुगापासून 

कोंदट गाभाऱ्यात 

वारकऱ्यांच्या श्रद्धेचा डिओडरंट 

तुला ठेवतोय सतेज 

की रुक्मिणबाई घालते तुला 

रोज पहाटे उटण्याची आंघोळ? 

पण असं तरी कसं म्हणावं? 

तसं असतं तर 

दिसला नसतास का तू 

एकदा तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 

उघडाबंब? 

आमच्या छातीत चमकते कळ 

सांगाड्यात होतो रोजच विकारांचा 

भूकंप 

श्वासांची गती मोजतो आम्ही 

रिश्टर स्केलनं आणि तू तर 

अठ्ठावीस युगांपासून हललाही नाहीस 

विटेवरून 

शेवाळलेल्या शिलालेखावरून आमची 

घसरून पडते नजर 

तू तर साधी पापणीही पडू दिली 

नाहीस अजून 

आमची पस्तिशीत दुखणारी दाढ 

उपटून काढतो डेंटिस्ट 

कॅल्शिअम्च्या कमतरतेनं 

चाळिशीत ठिसूळ झालेली हाडं 

तपासतो ऑर्थोपेडिक 

सगळ्या अवयवांचा एकेक स्पेशालिस्ट 

आम्हाला दमवतो आयुष्यभर 

आणि तू चष्म्याशिवाय कॉन्टॅक्ट 

ठेवून आहेस विश्वभर 

भक्तीच्या महापुरानं कधी 

गढूळ झालं नाही पंढरपूर 

कुठल्याही त्सुनामीनं कोलमडून पडली नाही 

तुझी चंद्रभागा 

लाखोंचा जयघोष होऊनही 

मोडली नाही डेसीबल मर्यादा 

अबीर बुक्क्यानंही पावन व्हावं 

असं कोणतं सत्त्व दडवून ठेवलंस 

अभंगाच्या पावलात? 

च्यवनप्राशचे चमचे अडखळतात 

आमच्या घशात 

योगाचे रोगाचे दैनंदिन क्लासेस 

इकडे जोरात 

मणक्यातला गॅप भरता भरता उलटून जाते साठी 

फेशियलनं दाबून ठेवलेलं 

सुरकुत्यांचं शेतही उघडं पडतं 

इन्फेक्शनच्या भीतीनं आमचे थरथरते नाक 

गर्दिनंच गुदमरतो ऑक्सिजनचा जीव 

आणि तिकडे तू 

कुठल्याही मास्कशिवाय बेफिकीर, निर्विकार 

विठ्ठला... कुठली संजीवनी 

पसरलीय तुझ्या देहात?संदर्भ: Facebook share
लेखक : श्री.पी.विठ्ठल

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search