४/०५/२०१५

रिव्ह्यू 'कॉफी आणि बरंच काही'प्रत्येक गोष्टीला एक अनोखा गंध असतो....प्रत्येक सिच्युएशनला एक गाणं असतं... वर्तमानात घडणा-या प्रत्येक गोष्टीला एक भूतकाळ असतो... अन् त्या सगळ्या गोष्टींशी जेव्हा एक नातं निर्माण होतं. त्या नात्याला नाव देता येतंच अशातला भाग नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक कॉफी टेबल असतं... त्या भोवती दरवळणा-या आठवणी असतात... मग ते उडप्याच्या दुकानातल्या कॉफीचं असो वा कॉफी शॉपमधल्या मंद म्युझिकच्या तालावर ठेका धरायला लावणारं... वाट पाहायला लावणा-या अशा या कॉफी टेबल भोवती फिरणारी ही गोष्ट आहे... कॉफी आणि बरंच काही...अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी... या टॅग लाइनचा अॅटिट्यूड घेऊन असणारी अशी ही फिल्म आहे. वाफाळत्या कॉफीला असलेला एक वेगळा अरोमा अन् त्यासोबतच्या आठवणींच्या गंधाच्या त्यामधल्या भावनेने ओथंबणा-या क्षणांचा कोलाज आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतो.लव्हस्टोरीमध्ये सारं काही ठरल्यासारखं घडत असतं... पण ते मांडणं... त्याची स्टाइल... त्या सगळ्यामध्ये असलेली एक अनप्रेडिक्टेबिलिटी आहे अन् त्या सगळ्यामध्ये जगण्याकडे पाहण्याचा एक प्रॅक्टिकल अप्रोचही आहे. त्या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा अधिक आपल्या जवळ वाटायला लागतो. त्या सगळ्याला असणारा एक तरल... सॉफ्ट असा एक फिल आहे.

या सगळ्यामध्ये दिग्दर्शक प्रकाश कुंटेचा हा पहिलावहिला सिनेमा आहे, असं वाटत नाही. लूक असेल वा गोष्टीची मांड़णी त्यामध्ये असणारा एक फ्रेशनेस हे या सिनेमाचं शक्तिस्थान आहे. नात्यामध्ये असणा-या मायेच्या ओलाव्याला इथे दिलेलं महत्त्व आहे. त्यासोबत व्यक्त होण्याला... मनात असणा-या गोष्टी ओठावर येण्यासाठी काय लागतं... केवळ बेछूट बोलून कधीही मोकळं होता येतं... ओठावर येण्याअगोदर मनात चालणारं द्वंद्व अन् त्यानंतर ओठावर येणा-या गोष्टींसाठी लागणारं धैर्य कुठून एकवटायचं... या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेतल्या बिटवीन द लाइन्स...मधली ही एक गोष्ट आहे.ही गोष्ट केवळ निषाद आणि जाईची नाही. तुमच्या आमच्या जवळची आहे. आजच्या घडीला सोशल मीडिया अन् संवादाचं माध्यम तशा अर्थाने एक्सेसिबल असतानाही नव्याने मनातली घालमेल प्रेक्षकांसमोर आणण्यातला दाखवलेला मॅच्युअर्ड प्रकार आपल्याला कॉफी आणि बरंच काही मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो.आई बाबा अन् तशा अर्थाने मॉडर्न फॅमिली... जाई म्हणजे प्रार्थना बेहरे अन् तिची बहिण आभा म्हणजे नेहा महाजन... तशा अर्थाने चौकोनी कुटुंब. जाईसाठी आता आईवडिल स्थळ पाहताहेत... पण तिला त्या कांदेपोहे कार्यक्रमाचा कंटाळा आला आहे... आयटी कंपनीमध्ये तिचा प्रोजेक्ट हेड आहे निषाद म्हणजे वैभव तत्त्ववादी... त्यांच्यामध्ये केमिस्ट्री वर्कआऊट होऊपर्यंतचा काळ... ज्या पद्धतीने त्या सगळया गोष्टी दाखवल्या आहेत. त्या सगळ्या प्रकरणात... म्हणजे प्रकरण नाहीए ते तसं... पण त्या अलवार अन् तरल...गोष्टींमध्ये आजच्या काळातलं तशा अर्थाने होणारी घुसमट... मनातल्या मनात असणा-या गोष्टींचा टॅण्जण्ट अँगलने एक लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, हे तितकंच खऱं आहे. पण या सगळ्यामध्ये जो तिला बघायला आलेला मुलगा आहे तो भूषण प्रधान... मग जाईच्या जिवाची घुसमट आहे अन् तिला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तशा अर्थाने रस नाहीए... मग अत्यंत प्रॅक्टिकली भूषण अन् तिच्या संवादातून उलगडत जाणारं नातं.. अन् त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीला वेगवेगळ्या नात्यांचे उलगडत जाणारे पदर...या सगळ्या गोष्टींना एक वेगळा अँगल आहे... प्रत्येकाची असणारी गोष्ट अन् त्याला प्रेम व्यक्त करण्यामधल्या बिटवीन द लाइन्सचे परम्युटेशन- कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारचं आहे अन् त्या कोलाजमुळे सिनेमाला सघनता आली आहे. छोट्या-छोट्या क्षणांमध्ये बरंच काही देण्याचा प्रयत्न प्रकाश कुंटेने केलेला आपल्याला आढळतो. या सिनेमामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तजेला लूकमध्ये जपण्याचा प्रकार केलेला आपल्याला आढळतो. प्रकाशचा हा पहिलावहिला प्रयत्न आढळत नाही. अदिती मोघेचं लिखाण समकालीन आहे. रिलेशनशिपवरचा तिचं म्हणणं अन् त्या सा-या गोष्टींमागचं असणारं लॉजिक देण्याचा... अन् तोही नकळत देण्याचा केलेला प्रकार वेगळा आहे.या सगळ्यामध्ये जगण्याकडे बघण्याचा असलेला प्रॅक्टिकल अप्रोच हा या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. जगणं... नातं... त्यामधली असणारी अनामिक ओढ... या सगळ्या गोष्टीला मांडण्यामध्येच असणारी एक पूरकता अन् एकप्रकारचा वेगळ्याच पातळीवरचा विरोधाभास एकाच वेळी आपल्याला दिसतो... त्यामधलं आव्हान प्रकाशने लीलया पेललं आहे.

या सिनेमातील या नव्या टीमचा हा प्रयत्न लाजबाब आहे. वैभव तत्त्ववादीने केलेली बॅटिंग ही लाजबाब आहे. हंटर पाठोपाठ इथला त्याचा संयत अभिनय यामुळे वैभव आपला एक वेगळा ठसा उमटवतो. इतकंच काय तर प्रार्थना बेहरेने आतापर्यंत केलेलं सगळ्यात उत्तम काम असं म्हणता येईल. तिची इथली जाई अक्षरश: ती जगलीय हे जाणवतं. वैभव अन् प्रार्थनाची केमिस्ट्री खूप छान आहे कारण त्यांचे असणारे कॉम्बिनेशन सीन्स अन् त्यासोबतच त्यांचं रिअॅक्ट होणं कमालीचं आहे. भूषण प्रधानने आपली चुणूक दाखवलीय. त्याच्या आवाजातील खर्जाचा त्याने केलेला वापर असेल वा देहबोली वा अगदी प्रार्थनासोबतच्या सीक्वेन्समध्ये आणलेला स्वाभाविक सहज अभिनय तो करू शकतो... हे त्याने दाखवून दिलंय. नेहा महाजनसोबत असलेल्या अगदी उण्यापु-या सीनमध्येही त्याने कमाल दाखवलीय.नेहा महाजनने आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. तिचा स्वाभाविक अभिनय ही जमेची बाजू आहे कारण तिचे प्रार्थनासोबतचे सीन्स कमालीचे आहेत. त्यांची केमिस्ट्री वर्क होते. त्यामध्ये नेहाच्या डोळ्यामध्ये असलेली चमक प्रकाशने उत्तम कॅच केलीय. जगण्याचा प्रॅक्टिकल अप्रोच तिच्या व्यक्तिरेखेतून तिने दाखवून देताना तारेवरची कसरत केली आहे... त्यामधील उत्स्फूर्तता जर कमी झाली असती तर मजा आली नसती.चार प्रमुख अर्थाने असणा-या वेगळ्या प्रवृत्ती अन् त्यांचे स्वभाव आपल्याला इथे दाखवले गेले आहे. त्यांचे चेहरे तितकेच जिवंत वाटणं गरजेचं होतं, पण ते या सा-यांनी जगले आहेत... त्यामुळे त्यामधलं रसरशीतपणा हा जपला गेला आहे. मोजक्या काही सीन्समध्ये दिसणारा सुयश टिळकही आपला बिनधास्त स्पष्टभ्रमरवृत्तीचा अॅटिट्यूड घेऊन आपली चुणूक दाखवतो. विद्याधर जोशी आपली दखल घ्यायला भाग पाडतो. अगदीच काही न बोलता डोळ्यांमधल्या एक्सप्रेशन्सनी बरंच काही बोलणा-या सुहास जोशी आपल्या मनात घर करतात किंवा उण्यापु-या एखाद दोन सीन्समध्ये दिसणारे दिलीप प्रभावळकराचं स्पीच आपल्या चांगलच लक्षात राहतं. अविनाश नारकरने वडिलांच्या भूमिकेत दाखवलेली प्रगल्भता आपल्याला भावते. अगदी कॉफी शॉपमधला संदेश कुलकर्णी ही त्याच्या चमकदार अॅटिटयूडने आपल्या मनात रंग भरतो. फक्तआजच्या काळात आपल्या मनातलं बोलण्यासाठी एवढा वेळ कोण घेईल का, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजच्या घडीला सोशल नेटवर्किंग असेल व्हॉट्स अॅपपासून इतर अअनेक ऑप्शन्स असताना प्रपोज करण्यासाठी मनातलं सांगण्यासाठी एवढा वेळ का कोण घेईल, या प्रश्नाचं उत्तर मात्र काही केल्या मिळत नाही

या सिनेमाच्या फ्रेम्समधला चकचकपणा अन् प्रत्येक फ्रेम नजाकतभरी होण्यासाठी अर्जुन सोरटेने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. संगीतकार आदित्य बेडेकरचे सूर अन् योगेश दामलेच्या शब्दांची जादू ही आपल्याला रंग हे नवेनवे मध्ये दिसते.


संदर्भ:ABB News
लेखक :अमित भंडारी
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search