भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

अजिंठा (लेणी)

इतिहास:

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.

पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी नियोजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

रचना:

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३ ही लेणी आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

वेरूळ:

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे.

वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते.

वेरूळची लेणी:

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळम्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.

एक युरोपियन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करून तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.बौद्ध लेणी

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.

यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासेच वाटावे असा कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.

लेणे क्रमांक १:बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी या लेण्यात एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरूळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.
लेणे क्रमांक २:

बौद्ध भिक्षूंना राहण्याबरोबरच बुद्धाची पूजा, मनन व चिंतन करता यावे म्हणून या लेणीत पाठीमागील भिंतीमध्ये गाभारा खोदलेला आहे. या गाभाऱ्यात बुद्धप्रतिमा कोरलेली आहे. या लेणीत गोल स्तंभशीर्षांचे कोरीवकाम आहे. लेणीच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे बोधिसत्व द्वारपालाच्या रूपात आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये एका स्त्रीदेवतेची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यात बसलेली बुद्धप्रतिमा असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत. बुद्ध बसलेले आसन चौकोनाकृती व त्यावर सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चामरधारी बोधिसत्व आहेत.
लेणे क्रमांक १० (विश्वकर्मा लेणे):

हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृतीकोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. त्यांना त्रिदली बिल्वतोरण असे म्हणतात. केवळ बौद्धधर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता कलाकारांनी सौंदर्याभिरूची या लेण्यात दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणे सरस आहे. या लेण्याच्या समोर खूप मोठे प्रांगण असून या या प्रांगणाच्या सभोवताली असणाऱ्या दगडी भिंतींमध्ये लेण्याचे प्रवेशद्वार खोदलेले आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर दोन ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. प्रांगणाच्या तीनही बाजूला वऱ्हांडा आहे. याच्या दोन्ही बाजूंना खोल्या असून मधोमध गर्भगृह आहे. चैत्यगृहामध्ये पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे. स्तूपावर असणारी छत्रावली नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.
लेणे क्रमांक ११ (दोन ताल लेणे):

दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणाऱ्या गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवानबुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वऱ्हांड्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.
लेणे क्रमांक १२ (राजविहार लेणे):

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली हे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

हिंदू लेणी

वेरूळच्या हिंदू लेण्यांची शैली इतर लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पेच आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू करून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. असे शिल्प किंवा बांधकाम करण्यासाठी शिल्पकार/कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.

लेणे क्रमांक १६ (कैलास मंदिर):


वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत.

आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगता येत नाही परंतु इ.स. १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील मंदिरात पूजाअर्चा होत होती व गाभाऱ्यासमोरील मंडपामध्ये साधुसंत राहत असत.

जैन लेणी:

वेरूळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.
घृष्णेश्वर मंदिर:
वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.अजिंठा-वेरूळ लेण्यांना कसे जावे?

रस्ता मार्गे:

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या (luxury buses) चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.). अजिंठा लेणी जळगांव शहराच्या जवळ आहेत, तर वेरूळची औरंगाबादजवळ.
लोहमार्गे (रेल्वे):

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.

चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरून रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे. जळगांव स्टेशनवर उतरून आधी अजिंठा पाहून मग वेरूळला जाता येते.
विमान मार्गे:

औरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपूर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ
सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.


संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita