४/२२/२०१५

'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्यमुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.

मात्र घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. म्हाडाने दिलेल्या लिंकवर जाऊन, तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन सादर करा, तुमचे पैसे म्हाडाकडेच जातील.

म्हाडाची अधिकृत लिंकhttps://lottery.mhada.gov.in

फक्त तुम्ही ज्या पत्यावर म्हणजे वेबसाईटवर माहिती भरताय, त्या पत्यात एचटीटीपी'एस' हवा, नुसता एचटीटीपी नको, एचटीटीपी नंतर येणारा (https:)'एस' हा सिक्युअर म्हणजे वेबसाईट सुरक्षित आणि अधिकृत असल्याचं दर्शवतो. बँकिंग आणि इतर महत्वाच्या वेबसाईटच्या पत्यातही 'एचटीटीपीएस' असतो.

म्हाडाची बनावट वेबसाईट
गूगल सर्च इंजिनमध्ये म्हाडा लॉटरी टाईप केल्यानंतर 'म्हाडा लॉटरी २०१५' अशी वेबसाईट येते, या वेबसाईटवर अनेक ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण ओरिजन वेबसाईटवर जातो. म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरणाऱ्या नवख्या माणसाची येथे मात्र दमछाक होते, या वेबसाईटवर अनेक जाहिराती देखिल आल्या आहेत, म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला कोणतीही जाहिरात दिसणार नाही.

बनावट वेबसाईट बनवून फायदा काय?
म्हाडाची लॉटरी दरवर्षी निघते, तेव्हा लाखोंच्या संख्येत लोक इंटरनेटवर म्हाडाच्या वेबसाईट भेट देतात, या वेबसाईट पेज व्ह्यूवज कोट्यवधींच्या घरात जातात, साधारणत: निकाल लागेपर्यंत हे दोन-अडीच महिने, ही वेबसाईट पाहण्यासाठी कोट्यवधी भेटी हा वेबसाईटला होतात. याचाच फायदा बनावट वेबसाईट तयार करणाऱ्याला घ्यायचा आहे.

'अलेक्सा'कडून बनावट साईटलाही रँक 

अलेक्सा ही जागतिक स्तरावर तसेच तुमच्या देशात तुमची साईट किती नंबरवर आहे हे दाखवत असते, अलेक्सा या वेबसाईटवर म्हाडाच्या बनावट वेबसाईटची भारतात रँक १४ हजाराच्या जवळपास आहे, तर अधिकृत वेबसाईट ११ हजाराच्या आसपास आहे.

लोकांना गोंधळात टाकून पैसे मिळवणार

बनावट वेबसाईट तयार करणाऱ्याने, म्हाडासाठी अर्ज करणाऱ्यांना गोंधळात टाकून, त्यांच्या भेटी आपल्या वेबसाईटला वाढवायचा निश्चिय केला आहे. यामुळे त्याच्या साईटला गूगलकडून जाहिराती येण्यासही सुरूवात झाली आहे. भेटी वाढल्याने गूगलने त्याला अधिकृत अॅड-मॅनेजरही दिला असावा, या दोन-तीन महिन्यात या जाहिरातींपासून त्याला लाखोंचा फायदा होणार आहे, यासाठी हा उपदव्याप करण्यात आला आहे.

कायदेशीर अडचण?
बनावट वेबसाईट तयार करणाऱ्याला तशी कायदेशीर अडचण फारशी येणार नसल्याचं दिसून येतेय, कारण या वेबसाईने अधिकृत लोगो वापरलेला नाही, म्हाडाचे लोगो किंवा ऑप्शन या वेबसाईटवर जिथे दिसतात तिथे, म्हाडाच्या अधिकृत लिंक लावण्यात आल्या आहेत, आणि लिंक लावणे हा गुन्हा नसल्याचं सांगण्यात येतं.

बनावट वेबसाईट कशी थांबवता येईल?
१) पर्याय पहिला - म्हाडाची बनावट वेबसाईट ही वैशाली सिंग यांच्या नावाने रजिस्टर केली आहे. खरंतर हा आपल्या नावाचा गैरवापर असल्याचं म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली सिंग यांनी म्हटलंय, ही एक बाब आक्षेपार्ह असू शकते.

२) पर्याय दुसरा - या वेबसाईटवरील जाहिराती या जर गूगल अॅडसेन्स अथवा कोमली या ऑनलाईन जाहिरात कंपन्यांकडून आल्या असतील, त्या जाहिरात कंपन्यांना मेल करून व्यथा मांडण्यात यावी, 'गूगल अॅड सेन्स'चे नियम याबाबतीत अत्यंत कडक आहेत. ते बनावट वेबसाईटच्या जाहिरातीचं ऑनलाईन अकाऊंट त्वरीत बंद करतील, त्यामुळे साईटवरच्या जाहिराती बंद होतील आणि बनावट वेबसाईट बनवणाऱ्यांच्या हातात काहीही येणार नाही, "खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आणा" अशी स्थिती करता येणार आहे.

म्हाडाने याबाबतील सायबर क्राईमखाली तक्रार दाखल केली आहे. तेव्हा ही साईट लवकरच बंद होईल अशी अपेक्षा असली, तरी या वेबसाईटचं सध्याचं स्वरूप पाहता कोणत्याही अर्जदारासोबत गैरप्रकार होणार नाही असं दिसतंय. कारण बनावट वेबसाईटवर खूप फिरल्यानंतर ती लिंक अधिकृत वेबसाईटकडेच जाते.संदर्भ: Zee news
लेखक :जयवंत पाटील, झी २४ तास

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search