४/२२/२०१५

फुलबाग जळल्यावर...
फुलबाग जळल्यावर ठरवले
आता या वाटेला पुन्हा जायचे नाही
ज्वारी बाजरी मका कापूस
दुसरे पिक घ्यायचे नाही
फार काही नाही मिळाले तरी
उपासमार तर होणार नाही
पोट भरेल घर चालेल जरी
माडी घरावर चढणार नाही

पण जाता जाता रस्त्याने
दिसतात कधी कुणाचे बगीचे
आकाश झगझगीत रंगाचे
श्वास होतात धुंद फुलांचे
डळमळतो निश्चय अन
पाय जणू होतात ओंडक्याचे
मग त्या दिवशी
बाजरीच्या बाजारात फिरता फिरता
मी विचारू लागतो
फुलांचे बियाणे ऋतुचा कल
अन बाजाराचं मागणे
तेव्हाच डोळ्यासमोर येतात
थकलेले आईबाप
काटकसरी बायको
शाळेत जाणारी पोरं
गोठ्यातील जनावरं
अन मी पुन्हा घरी येतो तेव्हा
आणलेले असतात तेच
बाजरीचे करडईचे अन तिळाचे बियाणे
घट्ट मनाने


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search