५/०६/२०१५

आहार उन्हाळ्याचा


उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, घशाला लागलेला शोष आणि जरा काही थंड प्यायल्यावर होणारा खोकला, ताप.. गरम पदार्थाकडे पाहवत नाही आणि थंड खाल्ले की त्रास होतो. मग या उन्हाळ्यात नेमके खायचे तरी काय?

गुढीपाडवा ही नव्या वर्षांची सुरुवात असते तशीच वसंत ऋतुचीही असते. आता येणाऱ्या काळात सूर्याची उष्णता क्रमश वाढत जाते, परिणामी शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा वाढतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या आधीच्या ऋतूत म्हणजे हेमंत व शिशीरामध्ये खूप थंडी असते. या काळात शरीरात कफाचे प्रमाण वाढलेले असते. हा साठलेला कफ वसंत ऋतूतील उष्णतेमुळे पातळ होऊ लागतो आणि या ऋतुच्या सुरुवातीलाच सर्दी, कफ, खोकला, तापाचे विकार सुरू होतात. शरीरातील कफ पातळ झाल्याने हिवाळ्यात वाढलेली भूक उन्हाळ्यात कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे कफविकार वाढू न देणारे, पचन वाढविणारे व शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत.

प्रत्यक्षात मात्र चित्र उलटेच दिसते. जरा ऊन पडायला लागले की पंखा जोरात चालायला लागतो, एसी सुरू होतो. थंडपेय, फ्रिजमधील पाणी, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे पोटात जाऊ लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कफ, खोकला, सर्दीने आपण बेजार होऊन जातो. याकरीता उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खावे. गरम अन्न खावे. थोडे तिखट, तुरट रसाचे, कडू पदार्थ खावेत. भूक वाढविणारे उष्ण पदार्थ खावेत. गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने वाटून, त्यात सुंठ, ओवा, जीरे, साखर, सैंधव मीठ घालून सेवन करतात. ही चटणी कफ कमी करण्यासाठी आणि भूक वाढवून खाल्लेले अन्न पचवण्यासाठी अत्यंत योग्य आहे. चैत्रात येणाऱ्या रामनवमी व हनुमानजयंतीलाही सुंठवडा देतात. सुंठ कफ कमी करते, भूक वाढवते, पचन सुधारते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी धने-जीरे-खडीसाखर यांचे पाणी घेतो तेव्हा त्यात चिमटीभर सुंठपावडर अवश्य घालावी.

थंडाचा अतिरेक टाळावा. इतर लोकांना चालतं मग मला का नाही? याचे उत्तर आपली प्रकृती समजून आपणच ठरवा. अतिरेकी थंड सेवनाचा त्रास या ऋतूत सर्वानाच त्यांच्या प्रतिकारशक्तीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात होत असतो. फक्त प्रत्येक आइस्क्रीम पार्लरमध्ये भेटणारी व्यक्ती तुम्हाला तुमच्याच डॉक्टरकडे भेटत नाही, एवढेच!

सकाळचा नाश्ता - सकाळची वेळ ही कफाची असते. त्यामुळे सकाळी अनशापोटी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. (मध व गरम पाणी आयुर्वेदात निषिद्ध सांगितले आहे.) दिवसभराच्या कामांसाठी बळ राहील, असा नाश्ता करावा. तूप, गूळ, पोळी किंवा तूप-साखर-पोळी, मुगाचे घावन, भाजणीचे थालीपीठ, मेथी-मुळा-गाजर-कोबी-फ्लॉवर अशा भाज्या घालून पराठे, जोंधळा किंवा बाजरीची भाकरी, लसूण-पुदीन्याची चटणी, उपमा, पोहे यापैकी काहीही चालू शकेल.

सकाळी दूध प्यायचे असल्यास कोमट दूधात पाव चमचा सुंठ व पाव चमचा हळद पावडर टाकून प्यावे. वेळ नसेल किंवा वृद्धांना भूक नसेल तर भाताची पेज-तूप-जीरे-सुंठ घालून घेतली तरी उत्तम. उन्हाळ्यात थोडय़ाशा श्रमानेही अशक्तपणा वाढत असल्याने कामावर जाणाऱ्यांनी नाश्ता करूनच निघावे.

संध्याकाळी नाश्तामध्ये अनेकदा बाहेरचे जंक फूड व त्यानंतर कोल्डड्रींक्स घेतले जाते. त्याऐवजी मुगाचा किंवा कणकेचा लाडू, खाकरा, कणकेचे शंकरपाळे, भाताच्या लाह्य़ांचा चिवडा, पोहे-कुरमुऱ्याचा चिवडा, एखादे फळ असा बदल करता येईल.

दुपारचे जेवण - घरी असणाऱ्यांनी वरण किंवा आमटी भात, कोथिंबीर-आलं-पुदीन्याची चटणी, काकडी-टोमॅटो-बीट-गाजर-कांदा या पैकींची कोशिंबीर, नेहमी मिळणाऱ्या हिरव्या फळभाज्या किंवा पालेभाज्या आणि फुलके किंवा पोळी असाच आहार ठेवावा. जेवणानंतर धणे-जिऱ्याची पावडर घालून ताक अवश्य प्यावे. दुपारच्या जेवणात िलबू अवश्य ठेवावे. मूग, मूगडाळ, तूरडाळ, मसूर, कुळीथाचे पीठ यांचा वापर असावा. मटकी, लाल चवळीही चालेल मात्र वाल, पावटा, छोले, राजमा, हरभरा ही वातूळ कडधान्ये टाळावीत. हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखटाचा वापर करावा.

दुपारी कामावर जेवणाऱ्यांनी शक्यतो पोळी भाजीच न्यावी. थंड झालेले जेवण नेहमीच पचायला जड व कफ वाढविणारे व जेवणानंतर सुस्ती आणणारे असते. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळभाज्या व पोळी किंवा फुलके असाच हलका आहार घ्यावा.

रात्रीचे जेवण - रात्रीचे जेवण हलके असावे. वरण-भात-तूप-लिंबू-ताक किंवा पोळी-भाजी-आमटी किंवा ज्वारी-बाजरीची भाकरी-भाजी किंवा मूगाची खिचडी-कढी-ताक यापैकी काहीही एकच खावे. जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे सूप (गरम) घ्यायला हरकत नाही. शक्य असल्यास दोन्ही जेवणात घरच्या साजूक तुपाचा अवश्य वापर करावा. दुपारी मांसाहार करण्याची सवय असेल, त्यांनी निदान रात्रीच्या जेवणात तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजी अवश्य ठेवावी.

फलाहार - वेलची केळे, गोड मोसंबी, सफरचंड, डाळींब, पेर ही फळे सर्वाना चालतील. कफाचा सहसा त्रास होत नसेल त्यांना हिरव्या सालीचे केळे, गोडे संत्र, कलिंगड, पेरू ही फळे चालतील. नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. चवीला आंबट असणारी फळे - द्राक्ष, अननस, सीताफळ- उन्हाळ्याच्या सुरुवातीला टाळावीत.

पाणी - प्रत्येक जेवणात मधे मधे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये. जेवताना फ्रीजच्या पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा. माठातील पाणी चालेल. पाण्यात वाळ्याची पुरचुंडी टाकून पाणी प्यावे. एसीमध्ये आठ-दहा तास काम करताना तहान लागत नाही. तरी या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे. जितके थंड पाणी प्याल, तेवढीच तहान आणखी वाढत जाते, तहान वाढून जितके जास्त पाणी प्याल, त्याने भूक मंदावत जाते. धने-जीरे-खडीसाखर घालून उकळवून थंड केलेले किंवा आले किंवा सुंठ-साखर घालून उकळवून थंड केलेले पाणी प्यावे.

वैद्य राजीव कानिटकर, आयुर्वेदाचार्य.


उन्हाळ्यासाठी थंड पेय

* साध्या पाण्यात लिंबू आवळा कोकम वाळा यांचे सरबत, कैरीचे पन्हे.(सर्वामध्ये आल्याचा थोडा वापर करावा.)

* शहाळ्याचे पाणी, बर्फ न घालता उसाचा रस.

* धने व जिरे पावडर घातलेले ताक.

* दुधाचा मसाला घालून साधे थंड दूध.

* घशाला शोष लागला असेल तर थंड दूधात घरचे लोणी विरघळून प्यावे.

* खडीसाखर किंवा गुळाचा खडा चघळून वर पाणी प्यावे.

* आंब्याच्या मोसमात सायीसकट दूध, आंब्याचा रस, खडीसाखर व वेलडी पूड मिक्सरमध्ये एकत्र करून (फ्रीजमध्ये न ठेवता) प्यावे.

* उन्हाळ्याच्या सुरुवातीला (मार्च, एप्रिल) कोणत्याही प्रकारातील आइस्क्रीम किंवा कोल्ड्रींक्स टाळावीत.

* नुसत्या दूधाचे आइस्क्रीम मे आणि जूनच्या पहिल्या १५ दिवसात चालू शकेल. पण जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते.

* बाजारात मिळणारी तयार सरबतेही चालतील. मात्र साध्या किंवा माठाच्या पाण्यातून प्या.

* आपल्यासमोर काढून दिलेले फळांचे ताजे रस चालतील. मात्र त्यात बर्फ घालू नका. ते आंबट नाहीत, याची खात्री करून घ्या.


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक : जयेश पाटील

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search