मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून दहा कि.मी. अंतरावर भर समुद्रात असलेल्या घारापुरी बेटावरील या लेण्या म्हणजे अजोड शिल्पकलेचा नमुना होय. म्हणूनच या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. गेटवे ऑफ इंडियापासून तेथे मोटरबोटीने जाता येते. पाशुपात शैव-वैष्णव परंपरेतील या गुंफा सहाव्या किंवा सातव्या शतकात कोरल्या गेल्या असाव्यात. घारापुरी हे प्राचीन काळी एक उत्कृष्ट बंदर असावे व या ठिकाणी सागरी व्यापाराचे मोठे केंद्र असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांना पश्चिम सागरी किनाऱ्यावरील या बेटाचा माग लागला असावा. त्यांनी या बेटावर जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी तेथील कातळात कोरलेला प्रचंड हत्ती प्रथम पहिला व विस्मयचकित होऊन त्यांनी ’एलिफंटा-एलिफंटा’ असे उद्गार काढले. तेव्हापासून पोर्तुगीजांनी घारापुरीचा उल्लेख एलिफंटा या नावाने सुरू केला व नंतरच्या काळात येथील लेण्यांना ’एलिफंटा केव्हज’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. या बेटावरील शिल्पकलेत शैव परंपरेच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. गुप्त व चालुक्य काळातील स्थापत्यकलेचा सर्वोच्च आविष्कार येथील लेण्यांमध्ये आढळतो.
घारापुरी बेटावरील विस्तीर्ण परिसरात मुख्यतः नऊ लेण्या आहेत. त्यात योगमुद्रेतील शिवप्रतिमा, शिवतांडव, दैत्य संहारक शिव, शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर, महेशावतार, कैलास पर्वतावरील पार्वती, कैलास उचलून धरणारे शिव-कैलास राणा अशा भव्य प्रतिमांचा समावेश आहे. गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर आणि त्रिमूर्ती ही शिल्पे जगातील अप्रतीम शिल्पे होत.
घारापुरीचा परिसर निसर्गरम्य असून सहलीसाठी उत्तम आहे. अलीकडे या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे संगीत नृत्य महोत्सव साजरा केला जातो व देशातील मान्यवर कलाकार आपली कला सादर करतात. या महोत्सवासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
नजीकचे रेल्वे स्थानक : चर्चगेट, सी.एस.टी. (व्ही.टी.)
संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous