५/१३/२०१५

पाणी किती प्यावेमानवी शरीरामधील अधिकांश म्हणजे ६६ टक्के भाग हा जलमय आहे. साहजिकच शरीराला सर्वाधिक गरज ज्या घटकाची असते, तो म्हणजे पाणी. पण शरीराची पाण्याची नेमकी गरज किती असते? निरोगी व्यक्तीने दिवसभरातून किती पाणी प्यावे? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी शरीरामधील पाण्याचे गणित समजून घेऊ.
सर्वसामान्य वातावरणामध्ये सर्वसाधारण निरोगी शरीरामधून २४ तासांमध्ये दीड लीटर (१५०० मिली) पाणी मूत्रविसर्जनावाटे, पाऊण लीटर (७५०मिली लीटर ) पाणी घामावाटे, ४०० मिलीलीटर पाणी बहिश्र्वसनावाटे व १५० मिली पाणी मलावाटे बाहेर फेकले जाते. या गणितानुसार सामान्य वातावरणामध्ये दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास म्हणजे दीड लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तो तसा योग्यच म्हटला पाहिजे. मात्र हा सल्ला भारतासारख्या देशात जिथे वर्षभरामध्ये सहा ऋतू असतात, तिथे सरसकट कसा काय लागू होऊ शकतो?
शरद व ग्रीष्म या ऋतूंमधला उन्हाळा, हेमंत व शिशिर या ऋतूंमधला हिवाळा आणि प्रावृट व वर्षां या ऋतूंमधला पावसाळा या तीन भिन्न-भिन्न मोसमांमध्ये जलप्राशन सारखेच असावे, हा विचारच मुळात चुकीचा आहे. हिवाळा व पावसाळा या शीत ऋतूंमध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन वाढवून शरीरातले पाणी कमी करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तहानेची जाणीव कमीतकमी निर्माण करून जलप्राशन नियंत्रणात आणले जाते; याउलट ऑक्टोबरच्या व एप्रिल-मेमधल्या उन्हाळ्यामध्ये शरीर जेव्हा मूत्रविसर्जन नियंत्रणात आणून शरीरातले पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा शरीराला पाण्याची अधिक गरज असल्याने अधिकाधिक तहान लागून जलप्राशन वाढवले जाते. मात्र तहानेसारख्या मूलभूत-नसíगक मागणीचा विचारही न करता केलेले अतिजलप्राशन अनेक आजारांमागचे मूळ कारण बनते. शरीरकोषांना नितांत गरजेचे असलेले पाणी गरजेपेक्षा अधिक मात्रेमध्ये मिळाल्यास त्यांचा चयापचय बिघडवण्यास आणि पर्यायाने संपूर्ण शरीराचे आरोग्य ढासळण्यास कारणीभूत होते. आपण सध्या ज्या अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याचा अनुभव घेत आहोत, त्या घामाच्या धारा बरसणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जर दिवसभर उन्हामध्ये फिरावे लागत असेल तर मात्र सामान्य वातावरणाच्या तुलनेमध्ये दुप्पट पाणी घामावाटे शरीराबाहेर फेकले जाते, अंदाजे दीड लीटर (१५०० मिली) वा त्याहून अधिक! त्यामुळेच या उष्णतेच्या दिवसांमध्ये निदान तीन लीटर पाणी प्राशन केले पाहिजे, जे होते अंदाजे १४ ते १६ ग्लास दिवसभरातून! अशावेळी साधारण पाऊण-एक तासाने पाणी प्यावे.

शरीरातले पाणी कमी होत आहे, हे कसे ओळखावे?
तहानेची जाणीव सांगता येत नाही त्या लहान बाळांमध्ये, ज्यांच्या भूक, तहान या नसíगक जाणिवा वयानुसार क्षीण होत जातात त्या वृद्धांमध्ये; इतकंच नव्हे तर तहानेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक प्रौढांमध्ये पाण्याची कमतरता ओळखण्यासाठी सोपी कसोटी आहे. मूत्राचा बदलणारा वर्ण! लघवीचा रंग पिवळसर, पिवळा वा गडद पिवळा होऊ लागला की शरीरातले पाणी कमी होत आहे हे ओळखावे. रंगाच्या गडदपणानुसार शरीरामध्ये अधिकाधिक पाणी कमी होत चालले आहे, हे समजावे. (बी-कॉम्प्लेक्स व्हिटामिन्स, टीबीवरील औषधे वगरे घेत असताना मूत्राचा वर्ण गडद पिवळा होतो. काविळीमध्येही लघवीचा रंग पिवळा-तपकिरी होतो) मूत्राचा वर्ण पिवळसर असेल व त्याचा गडदपणा वाढत असेल तर तुम्हाला पाण्याचे प्राशन वाढवायला हवे. पाण्याबरोबरच नारळाचे पाणी, सरबते (विशेषत आवळ्याचे ,वाळ्याचे ,गुलाबाचे सरबत) पन्हे, ताक, दूध, फळांचे ताजे रस वगरे पेय दिवसभरातून वारंवार प्या. पुन्हा पुन्हा पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास किलगडाचा रस, सब्जाचे पाणी, वाळा घातलेले पाणी प्यावे, जे शरीराच्या आतपर्यंतच्या सूक्ष्म कोषांना थंडावा देते. मात्र उष्णता वाढवणाऱ्या पेयांपासून दूर राहा. जसे - चहा, कॉफी, कोला, कॅफीनयुक्त अन्य पेयं, बीअर, मद्य वगरे. त्याचप्रमाणे जी फळे उष्ण आहेत, अर्थात शरीरामध्ये उष्णता वाढवतात, ती टाळणे योग्य होईल. जी फळे शरीरामध्ये थंडावा वाढवतात, अशा फळांच्या रसांचे प्राशन या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक हितकर होईल.अशा शीत फ़ळांमधून शरीराला अधिक पाणी मिळते. जी फळे व अन्य द्रवपदार्थ शरीराला अधिक पाणी पुरवतात, त्यांची नावे, त्यांमधून मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण व तो पदार्थ शीत आहे वा उष्ण ते सांगणारी सारणी सोबत दिली आहे. कितीही उपयोगी वस्तू असली तरी त्याचा योग्य वापरच जास्त फायदा मिळवून देतो. पाण्याबाबतही हे तंतोतंत लागू होते.


उन्हाळ्यात एसी आणि जलप्राशन
२१व्या शतकामध्ये उन्हाळा आणि जलप्राशन या विषयाचा विचार करताना एका महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तो मुद्दा म्हणजे वातानुकूलित यंत्रणा. दिवसातले सात-आठ तास एसी कार्यालयांमध्ये घालवणाऱ्या वा रात्रभर एसीच्या गार वातावरणात झोपणाऱ्या मंडळींमध्ये पाणी पिण्याबाबत गोंधळ होतो. सभोवतालचे वातावरण थंडगार असेल तर शरीराला उन्हाळ्याचा परिणाम जाणवणार नाही आणि पर्यायाने हिवाळ्याप्रमाणेच तहान कमी करून शरीर जलप्राशन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी उष्म्याचा परिणाम जाणवत नसल्यामुळे तुम्हाला फारसे पाणी प्यावे लागणार नाही, हे निश्चित. मात्र असा एकांगी विचार करून चालणार नाही, कारण एसीच्या गार वातावरणामध्ये जलप्राशन कमी केल्यानेही गडबड होऊ शकते. प्रत्यक्षात सभोवतालचे वातावरण गरम असूनही कृत्रिम थंड वातावरणात राहताना शरीर त्याची जाणीव वेगळ्या प्रकारे करून देते. थंडगार वातावरणामध्ये असताना जर आपल्या कामावर मन एकाग्र करता येत नसेल, डोक्यात संभ्रम होत असेल, डोकं जड होत असेल,चीडचीड होत असेल आणि तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर शरीराला पाणी कमी मिळत असल्याचे अनुमान करता येते आणि पाणी प्यायल्यानंतर ही लक्षणे कमी होत असतील तर अनुमानाची निश्चीती करून एसीमध्ये सुद्धा तुम्हाला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज आहे, असे ठरवता येते. एकंदर काय तर एसीमध्ये असलात तरी पाणी प्यायलाच हवे अर्थात मर्यादित प्रमाणात. त्यातही पित्तप्रकृतीच्या मंडळींना एसीमध्ये असतानाही अधिक पाण्याची गरज पडते.संदर्भ: Loksatta
लेखक :डॉ.अश्विन सावंत
 drashwin15@yahoo.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search