भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. कृष्णचंद्र बंदोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली.
राममोहन १८१४ साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी ‘आत्मीय सभा’ सुरू करून तीत भिन्नभिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या. वेदान्तसूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रसृत केली. सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानू लागला. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला.
ब्राह्म समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इ. अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरूष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला.
संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous