६/०१/२०१५

कार्ले लेण्या


लोणावळा-खंडाळा परिसरातील या लेण्या प्रसिद्ध आहेत. कार्ला लेण्या लोणावळ्यापासून १२ कि.मी. अंतरावर आहेत. ख्रिस्ती पूर्वकाळात इ.स. पूर्वी पहिल्या शतकाच्या सुमारास या लेण्या खोदलेल्या असाव्यात. या लेण्या सह्याद्रीच्या एका डोंगरकड्यावर असून तेथे जाण्यासाठी थेटपर्यंत पायऱ्या आहेत. अलीकडेच लेण्यांच्या उजव्या अंगाने पक्का रस्ता करण्यात आलेला असल्याने बरेचसे अंतर वाहनाने जाता येते. त्यानंतर थोडेच अंतर चढून जावे लागते.
या गुंफात अनेक विहार, एक स्तुप व एक भव्य चैत्य आहे. हा चैत्य भारतातील सर्वात मोठा चैत्य म्हणून प्रसिद्ध आहे. या चैत्यगृहाचा आकार १२५X४५ फूट असून उंची जवळपास ५० फूट आहे. चैत्यगृहात पाषाणकलेबरोबर लाकडी कामही केलेले आहे. प्रचंड आकाराच्या लाकडी तुळया व कमानी येथे पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे २००० वर्षे लोटली तरीही हे लाकूड अजूनही सुस्थितीत आहे. चैत्यगृहातील भिंती व खांब यावर शिल्पाकृती कोरल्या आहेत. ही शिल्पकला वेरुळ-अजिंठा येथील शिल्पकलेइतकीच सुंदर व देखणी आहे. गुंफांतील खांब आणि भिंती तसेच प्रवेशद्वार यावर अनेक शिल्पाकृती कोरलेल्या असून ही शिल्पकला थक्क करणारी आहे. गुंफेतील मिथुनयुग्म, प्रवेशद्वारावरील कोरीव सज्जे, चैत्यगृहाच्या महाद्वाराशी असलेल्या भव्य शिल्पाकृती अत्यंत रेखीव, प्रमाणशीर आकर्षक आणि जिवंत आहेत.
मुख्य लेण्याच्या बाहेरच्या परिसरात प्रसिद्ध एकविरा देवीचे मंदिर आहे. येथे दर्शनार्थीची मंगळवारी व शुक्रवारी गर्दी असते. नवरात्रात येथे मोठी यात्रा असते. एम.टी.डी.सी.तर्फे नजीकच एक विश्रामधाम आहे. तेथे वॉटर स्पोर्ट्सची सुविधाही आहे.


संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.tripadvisor.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search