मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... ।
असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची ।।
मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...।
लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी।।
मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... ।
तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ... कथा ही एका लाल मिरचीची...।।
चार एक वर्षापुर्वीची गोष्ट...
असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे. त्या तकतकीत मिर्च्यांच्या लाल चुटूक रंगाची मोहिनी मला पडली अन त्यातली एक सहज चाळा म्हणून मी खुळखुळ्यासारखी वाजवून पाहिली. मजा वाटली म्हणून वाण्याला माझ्या मालात त्या एका मिर्चीचा हिशोबही चुकता केला. घरी आलो. वाटले जरा नातीला खुळखुळ्यासारखे वाजवून खुष करेन. रात्री जेवणानंतर त्या मिर्चीला मी सर्वांना दाखवत म्हटले, ‘चला आता आपण एक खेळ केळू या. या मिर्चीत किती बिया असतील याचा अंदाज बांधायचा. दहा टक्के इकडे तिकडे चालेल. ज्याचा अंदाज अचुक येईल त्याला एक कॅडबरी बक्षीस.’
कागदावर जो तो लिहायला लागला. प्रत्येकानी डोके लढवले. कोणी 20 तर कोणी 30, 40, जास्तीत जास्त 50 पर्यंत अंदाज वर्तवले. नंतर ती मिर्ची फोडून बिया मोजता आम्हाला थक्क व्हायला झाले. त्यात तब्बल 80 बिया निघाल्या! अंदाज कोणाचाच बरोबर आला नाही पण यापेक्षा त्यातील बियांच्या संख्येने आम्हाला विचारात पाडले. मला वाटले या बिया आपण रुजवल्या तर? मग दुसऱ्या दिवशी मी एक गादी वाफा तयार केला. एका तरटाच्या पोत्यावर माती पसरली. थोडे शेणखत मिसळले. पाणी देऊन त्यात मन लाऊन सर्व 80 बिया लावल्या. त्यांना रोज वेळेवर पाणी द्यायला लागलो. कधी सावली तर कधी उन्हं दाखवून रोपटी उगवायला लागली. पाहिले तर 80 पैका 40 बियांनी तग धरला होता. म्हणजे 50 टक्के मॉर्टॅलिटी रेट होता. होता होता त्या 40 रोपांनी तरारी दाखवली. आता रोजची निगा केल्याने ती दहा एक इंचांची झाली. वाटले आता या रोपांना असे न ठेवता कुडयात ट्रान्सप्लांट करू या. दहा कुंड्या आणल्या. त्यात खाली दगडावाळूवर एक थर नंतर त्यावर पालापाचोळा मग लाकडाचा भुस्सा व भाताची तुसे वर शेणखताचा थर व नंतर काळ्यामातीने कुंड्यांना तयार केले. प्रत्येकात 4 रोपांची लागवड केली आणि रोजच्या रोज पाणी, उन दाखवत ती रोपे आमच्या गच्चीत वाढायला लागली. काही वाचीव तर काही ऐकीव माहितीनुसार कीटकनाशकाची फवारणी, खते, नियमित पाणी व देखभाल यामुळे रोपांची वाढ यथायोग्य होत होती.
असे दहा महिने गेले. एके दिवशी रोपांना फुलोरा आला. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी रोपे डवरली. पुढे काही दिवसांनी त्या फुलातून इवल्या इवल्या मिर्च्यांची फूट दिसायला लागली अन पाहता पाहता मिर्च्यांनी झाडे डवरली. पहिल्या तोडीत सव्वा दोन किलोच्या मिर्च्यांचे पीक आले! पुढे आणखी तीन तोडीत एकूण दहा किलो पर्यंत तोड गेली!
मजा म्हणून सहज लावलेल्या एका मिर्चीतून दहा किलो मिर्च्या निर्माण झाल्याचे पाहून निसर्गाच्या अदभूत लीलेपुढे नतमस्तक होत... वंदन केले... अशी ही एका लाल मिर्चीची गोष्ट...
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :शशिकांत ओक
छायाचित्रे:anonymous