हातात हात घेऊन,ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंञ जपून,या कार्य करायाला हो
बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो...
पूज्य साने गुरुजींच्या या ओळी वाचल्या कि त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा याचे चिञ डोळ्यासमोर उभे रहाते.भारताचे ते विलोभनिय दृश्य आजच्या घडीला तरी कल्पनेतच पहावे लागते आहे हीच खरी शोकांतिका आहे.
कल्पना करा,या भारत देशाची आजची एकशे वीस कोटी जनता लौकिक अर्थाने हातात हात घेऊन चालते आहे...त्यांच्यात अंतर्यामी प्रेमाची भावना आहे...त्यात दिखावूपणा नाही,स्वार्थ नाही-आहे ती केवळ एक भारतमातेप्रती जिव्हाळ्याची भावना! ही एकी,हा एेक्याचा मंञ जपत सर्वांनी सर्वांगसुंदर भारत घडवण्यासाठी हातभार लावला असता तर निश्चीतच या विश्वात आपला भारत शोभून दिसला असता!
कल्पनेतले हे भारताचे चिञ मनाला किती आनंद देवून जाते ! पण सत्यपरिस्थीती पाहिली तर फार भयानक वास्तव समोर येते. आज भावा-भावाचे,आईवडील-मुलाचे एवढेच काय पती-पत्नीचेही पटत नाही तिथे शेजारी,गल्ली,गाव,शहर हा तर खूप लांबचा पल्ला...आणि देश तर खूप खूप दूरची गोष्ट.असे असताना कसा साकारणार आहे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत ?आपण स्व च्या पुढे जावून कधी विचार करणार आहोत की नाही ? आपली देशभक्ती फक्त २६ जानेवारी आणि १५ आँगस्टपुरतीच मर्यादित झाली आहे का ? तसे असेल तर मग या तुटक्या-फुटक्या विचारांनी ऐक्याचा मंञ आपण कोणत्या तोंडाने म्हणणार आहोत ?
पारतंञ्यातून स्वातंञ्य मिळवताना देशभक्तीचा हा अंगार कुणा एकट्या-दुकट्याच्या मनात प्रज्वलीत झाला नव्हता, तर तो संपूर्ण भारतवासियांच्या मनात चेतवला गेला होता.लोकमान्य टिळक,स्वातंञ्यवीर सावरकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी,साने गुरुजी अशी असंख्य नावे आहेत.पण त्यांनी कधी स्वतःला नेता म्हणवून घेतले नाही आणि जनतेनेही त्यांना कधी नेता म्हणून संबोधले नाही.या सर्व लढवय्यांना एकच उपाधी होती-``स्वातंञ्यचळवळीतील कार्यकर्ते !´´ किती समर्पक संबोधन आहे हे ! ना कुणी मोठा ना कुणी लहान,सारेच इथे समान !
ही समानता आजघडीला राहिलेय का ?आज गल्लोगल्ली कार्यकर्ते कमी पुढारीच जास्ती झालेत.त्यातही स्वतःला नेता म्हणवून घ्यायची जणू स्पर्धाच लागली आहे.आणि विशेष म्हणजे अशा नेत्यांचे वाढदिवस वर्षातून तीन-तीन वेळा येतात.तरीही कार्यकर्ते स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून बिनदिक्कत ते साजरे करतात.आज लोकशाही आहे म्हणतात,पण ती कागदावरच आहे.राजे-महाराजे गेले,परकीय सत्ताधीश आले..ते गेले आणि लोकशाही आली.पण मागून घराणेशाही आली आणि आज तीच सबंध भारतवासियांच्या मानगुटीवर बसली.लोकशाही माञ अजूनही निद्राधीनच आहे.
हे झाले नेत्यांचे,कार्यकर्तेही आता स्वातंञ्यचळवळीतील कार्यकर्त्यांप्रमाणे राहीले नाहीत.नेत्यांच्या पंधरा-सोळा वर्षांच्या शेंबड्या पोरालाही `उमलते नेतृत्व´ ही पदवी हे आजचे कार्यकर्तेच बहाल करत आहेत.हे ही आता नवलाईचे राहीले नाही कारण आजच्या घडीला नेत्यांच्या पाळण्यातल्या मुलालाही `भावी नेतृत्व´ ही उपाधी देवून पून्हा घराणेशाहीला खतपाणी घालण्याचे काम हेच कार्यकर्ते करत आहेत.आणि ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे.
अशाने कशी रुजणार समानता? मोठे मोठेच होत जाणार ,लहान आणखीनच लहान होत राहणार...कुठे गेली ती स्वातंञ्यचळवळीतील ती समानता ? कुठे गेले ते ऐक्य ? मग स्वातंञ्य मिळाले ती चूक झाली म्हणायचे का ?
तर नाही...गुलामीत खितपत पडण्यापेक्षा स्वातंञ्य केव्हाही चांगलेच.पण त्या स्वातंञ्याचा उपभोग कसा घ्यायचा हेच आम्हाला समजले नाही.आणि ते समजावून सांगणारेही आता कुणी उरले नाही.जो तो स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्यात मशगुल आहे.जिथे इतरांचा विचार नाही तिथे देशाचा विचार कुठून प्रसवणार ? म्हणूनच आज साने गुरुजींच्या या दोन ओळींची समाजाला आणि माझ्या भारत देशाला गरज आहे.
हातात हात घालून,ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंञ जपून,या कार्य करायाला हो....
........बलसागर भारत होवो !
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :आनंदी प्रभूदास
E-mail:-prabhudasanandi@gmail.com