७/०१/२०१५

हप्ता

गुन्हेगारांनो,खुशाल गुन्हे करा
आमच्याकडे कमी आहे वेळ
तुमच्याकडे दिले सारे लक्ष तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||०||

दाण्यात खडे की खड्यात दाणे
एवढे भरघोस पीक आपले
कुणा-कुणावर लक्ष ठेवणार
आमचे हे फक्त दोन डोळे...

ज्यांना कुणी गॉडफादर नाहीत
अशांसाठीच फक्त आहेत हो जेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||१||

करणारे करतात कायदे कठोर
कशाला उगीच काळजी करता?
दोन नंबरचीच ही लायसन असते
तुमचे भरता अन् आमचेही भरता...

पगारपाणी कमी, पोटाची भूक मोठी
ईमानदारी जावू द्या लावित तेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||२||

मेले तर मरु द्यात,माल हवा कडक
वैतागलेल्या बायकांना करु थोडी मदत
रोज पिदोड्याचा मार खाण्यापेक्षा
बरे झाले `गेला´ म्हणतील रडत रडत

सरकार आहेच की पाठीशी त्यांच्या
तुम्ही बिनधास्त करा हो भेसळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||३||

आम्ही मारल्यासारखे करतो
तुम्ही रडल्यासारखे करा
टारगेट दाखवण्यापुरतेच तेवढे
आम्हांस सहकार्य करा

जनाची-मनाची म्हणायचंच नाही
सगळीकडे असाच चाललाय हो खेळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||४||

*अनिल सा.राऊत*
9890884228

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search