७/२३/२०१५

साहेब,...

कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची शेतकर्‍यांच्या भावना प्रखरपणे मांडणारी ही एक वास्तवदर्शी कविता,...

साहेब,...

वरून वरून बोलु नका
एकदा शेतात येऊन जा
डोळ्यात तुमच्या पाणी येईल
करपतं पीक पाहून जा

फक्त कागदंच वाचु नका
रानात पुरावा वाळला आहे
एका-एका ठोंबासाठी
जीव आमचा जळला आहे

आभाळ सताड आ वासुन
पीक खाण्यास टपलं आहे
लेकराबाळांचं सुख आमच्या
मातीमधी खपलं आहे

हिशोब कर्जाचा पाहून तर
जगणं आमचं बारगळलंय
अन् रानामध्ये पेरलेलं
बीज सुध्दा विरघळलंय

आम्ही जाणतो आहोत तुमची
सत्तेची बोर पिकलेली आहे
पण तुमचे धोरणं ऐकुनच
पिकाने मान टाकलेली आहे

शांत बसुन पाहिलं आहे
आज बोलतो ऐकुन घ्या
शेतकर्‍यालाही कधीतरी
साहेब तुम्ही समजुन घ्या

सुख भोगलं असतं आम्ही
निसर्ग मात्र कोपला आहे
तुमच्याकडून अपेक्षा होत्या
तुम्हीही विश्वास कापला आहे

सरकार बदललं असलं तरी
शेतकरी सुखी झालेच नाहीत
तुम्ही सांगितलेले अच्छे दिन
आमच्यापर्यंत आलेच नाहीत

तुमचीच नीती आपली करत
आम्हीही गंभीर व्हायचं का,.?
सांगा साहेब तुम्हीच आता
इलेक्शन दुबार घ्यायचं का,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. : 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव न काढता,...

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search