७/१४/२०१५

माझं करीयर मार्गदर्शन (!)


परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते. आता दुसरी लोकल पकडणे शक्य नसते. शेवटी आपण त्या गर्दीचाच एक भाग होतो.
असो. तर त्या मुलाला माझ्याकडून थोडं करीयर मार्गदर्शन हवं होतं. आमच्यात संवाद सुरु झाला.
मी त्याला विचारलं," काय राजे? कसं वाटतंय इंजिनियर झाल्यावर?"
"मस्त वाटतंय"
"मग पुढे काय ठरवलंय?"
"तेच ठरवायचं आहे. तुमचं थोडं मार्गदर्शन हवं होतं"
"अरे जरूर ..आवडेल मला..मला सांग इंजिनियरिंग का केलंस तू? म्हणजे आवड की अजून काही ?"
स्व.सर विश्वेशरैय्या आणि ३ इडीयट्समधला रॅंचो सोडून या प्रश्नाच उत्तर कोणालाही सापडलं असेल का याबद्दल मला दाट शंका आहे!
तो उत्तरला," बारावीला चांगले मार्क होते. मग घरातले सगळे म्हणाले की..........."
"बरं बरं..मग नोकरी करायचा विचार आहे का आता?”
"हो"
"बरं मग त्याविषयी काही शंका असेल तर विचार मला."
"करीयरच्या सुरवातीला पहिली कंपनी कशी निवडावी?"
मी बुचकळ्यात पडलो. आपण कंपनी निवडायची असते हे याला कोणी सांगितलं? तसं कॉलेज मध्ये असताना मलाही वाटायचं की आपण आपल्याला पाहिजे त्याच कंपनीत जायचं…मनापासून आवडेल तेच काम करायचं…आपले छंद जपायचे… वर्क- लाईफ बॅलन्स वगैरे भ्रामक कल्पना मीसुद्धा केल्या होत्या. पण कॉलेज संपल्यावर या सगळ्या कल्पना गळून पडल्या
मी म्हणालो," आधी तुला कुठल्या क्षेत्रात जायचंय ते ठरवं. मग त्या क्षेत्रातल्या कंपन्या शोध. आणि मुलाखत देत रहा."
आता या वाक्याचा मनात म्हटलेला उत्तरार्ध खालीलप्रमाणे होता.
"शेवटी कोणतीही कंपनी आपल्याला भाव देत नाहीये हे लक्षात येइलच. मग मिळेल ती नोकरी स्वीकारून गप गुमान बसं!"
"मुलाखतीची तयारी कशी करावी ?", त्याने विचारले.
या प्रश्नाचा दुसरा अर्थ मुलाखतीत विचारणाऱ्या प्रश्नांचे '२१ अपेक्षित' कुठे मिळते असा होतो.
मला एकदम कॉलेजमधले व्हायव्हाचे दिवस आठवले. पहिल्या रोलनंबरचा मुलगा व्हायव्हा देऊन बाहेर आला की आम्ही सगळे त्याला घेरून ," काय विचारते बे मास्तर ?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडायचो. अर्थात मास्तरनी काहीही विचारलं तरी आपल्याला येणार नाहीये हे माहिती असायचं. मग मास्तरसमोर उगाचच विचारीमुद्रेचा अभिनय करून, दोन-चार इकडतिकडचे शब्द जोडून उत्तर तयार व्हायचं. मास्तरांची सहनशक्ती संपली की ते बाहेर हाकलायचे.
मी म्हणालो," आधी तर तुझ्या क्षेत्रातले बेसिक कन्सेप्ट्स क्लियर करून घे"
हा सल्ला काही जगावेगळा नव्हता. पण मी तो देण्यामागचं कारण होतं, 'मी दिलेली पहिली मुलाखत'!
"इंजीनियरिंगमध्ये तुमचा आवडता विषय कोणता होता?”, एका नामांकित कंपनीच्या व्हाइसप्रेसिडेंटने मला मुलाखती दरम्यान विचारले.
बोंबला!! आता काय सांगाव? कोणताही विषय सांगितला तर त्यावर हा मला फाडून खाणार हेनिश्चित.
"थर्मोडायनामिक्स!" मी सांगितले.
थर्मोडायनामिक्स शिकवणाऱ्या सरांची शप्पथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलत होतो. परीक्षेतमाझ्या समोर बसणाऱ्या मित्राने जर हे उत्तर ऐकलं असतं तर तिथेच मला झोडपून काढलं असतं.पण आत्ता तो माझ्या समोर बसला नव्हता. माझी मुलाखत सुरु होती. शिवाय इतर विषयांपेक्षा याविषयाचा अभ्यास मला जरा जास्त वेळ (वेळा!) करावा लागला होता. त्यामुळे ह्यातलं ज्ञान इतरविषयांपेक्षा ३-४ टक्क्यांनी जास्त असल्याची माझी समजूत होती. (चाळीस अधिक तीन-चारम्हणजे चौरेचाळीस टक्के असा हिशोबही मनातल्या मनात मी करून टाकला !)
"ओह्ह.. आय सी", व्हाइस प्रेसिडेंट.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपत नव्हता. आणि माझ्या चेहऱ्यावरचे शुन्य भावही त्यांनीटिपले असतीलच.
“कॅन यु एक्सप्लेन दी सिमील्यारीटी बिटविन फ़र्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ?"
एव्हढंच ना ! फ़र्स्ट अँड सेकंड लॉच्या भरवश्यावरंच तर परिक्षा (एकदाची!) पास झालो होतो. मीभडाभडा उत्तर दिले. आणि विचारलेले नसताना आगाऊपणा करून समोरच्या कागदावरउदाहरणसुद्धा एक्सप्लेन करून दिले.
"गुड, व्हेरी गुड… पॉवर प्लांटमध्ये थर्मोडायनामिक्सचं अप्लिकेशन कसं असतं जरा सांग ", ते म्हणाले. (ही मुलाखत बहुभाषिक पद्धतीने सुरु होती)
अरे देवां… पहिल्या लोवर फुलटॉसवर षटकार मारल्यावर पुढचा चेंडू असा ब्लॉक होलमध्ये आला तर सेहवागची जी अवस्था होईल तशी माझी झाली होती. पण शेवटी सेहवाग तो सेहवागच! थर्मोडायनामिक्सशी संबंधित तीन -चार शब्द पकडून मी अंदाधुंद फटकेबाजी सुरु केली. साधारण १५ मिनिटे बोलल्यावर त्यांनी मला थांबवलं.
ते म्हणाले," यंग मॅन… टुडे यु हॅव चेंज्ड माय बेसिक कन्सेप्ट्स ऑफ थर्मोडायनामिक्स!!"
"पण मुलाखतीत फक्त बेसिक कन्सेप्ट्स विचारतात का?", त्याच्या या प्रश्नाने मी भानावर आलो.
"फ्रेशर्स मुलांना तरी तेच विचारतात", मी उत्तरलो.
"पण असं का? असे सोपे प्रश्न विचारून त्यांना माझ्यातलं टॅलेंट कसं कळणार?"
(अरे मग पहिल्याच दिवशी तुला काय क्रायोजेनिक इंजिन डिझाईन करायला सांगणार का? की एक्स्प्रेस वे कसा बांधतात ते विचारणार? की स्विस बँकेसाठी सॉफ्टवेयर बनवायला सांगणार? -- माझ्या मनातलं उत्तर!)
"हे बघ असं नसतं...आधी तुझी आकलनशक्ती, ज्ञान, समज, योग्यता यांची पारख केल्या जाते. त्यात तू पास झाला तरच तुझी निवड करतात.मग तुला योग्य ते प्रशिक्षण देऊन छोटे-मोठे काम देतात. नंतर तुझं टॅलेंट दाखवायला तू मोकळा आहेस."
"पण हे तर चुकीचं आहे ना!”
"का? ह्यात चुकीचे काय वाटतंय तुला?”, मी म्हणालो.
"ते नाही सांगता येणार. पण चुकीचं आहे हे निश्चित!” तो ठामपणे म्हणाला.
साधारणपणे सगळ्या नवख्यांना प्रस्थापित गोष्टी चुकीच्याच वाटतात. परीक्षांमध्ये मिळालेले थोडेबहुत मार्क्स आणि कॉलेजमधले दोन -चार कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव गाठीशी घेऊन हे नवखे अख्ख्या भांडवलशाहीच्या विरोधात उभे राहण्याच्या बेतात असतात. इंजीनीयरिंग किंवा अन्य कोणतेही शिक्षण पूर्ण केले म्हणजे आपण एक युद्ध जिंकून आता नव्या युगाच्या नेतृत्वासाठी सज्ज आहोत अश्या आविर्भावात वावरतात. आम्हीही असेच होतो. बरं एखादी कंपनी, तिथले कामाचे स्वरूप आणि ह्यांचे त्याविषयीचे स्वप्नरंजन हे सर्वस्वी भिन्न असते. उदा. रिसर्च आणि डेव्हलपमेण्टमध्ये जाऊ पाहणाऱ्या नवख्यांना, तिकडे गेल्यावर आपण डायरेक्ट पाण्यावर धावणाऱ्या गाडीचेचं संशोधन करणार असं काहीसं वाटतं असते. किंवा सॉफ्टवेयर कंपनीत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी आपल्याला अमेरिकेच्या विमानात बसवणार अशी रम्य कल्पना असते.
"तुमच्या क्षेत्रात माझ्यासाठी काही स्कोप आहे का?", त्याने विचारले.
"आहे ना...पण नको येऊ आमच्याइथे.काही खरं नाही. मलाच पश्चाताप होतो कधीकधी."
हा प्रश्न त्यानी मलाच काय अगदी बिल गेट्सला जरी विचारला असता तरी हेच उत्तर आलं असतं !
"मग काय करू मी? बाबा म्हणतायेत एमबीए कर"
"अरे मग कर ना..बरोबर सांगतायेत ते. हे बघ हेच वय असतं शिकण्याच. नंतरच काही सांगता येत नाही. खूप अडचणी येतात."
आता हे संभाषण जरा सोप्या ट्रॅकवर आलं होतं. काय आहे की कोणालाही, अरे तू हे शिक..तू ते शिक असं सांगणं खूप सोपं असतं. त्यातही एमबीए हे एक गोग्गोड स्वप्न आहे ज्यात कोणीही सहज फसतं. बीई,एमबीए किंवा बीएस्ससी,एमबीए असं बिरुद नावामागे लागलं की आपलं पोरगं एकतर जनरल मॅनेजर तरी होईल किंवा वॉलमार्टसारखी कंपनी तरी सुरु करेल असं सगळ्या पालकांना वाटतं.
"एमबीए करून पुढे काय स्कोप आहे?",त्याने विचारले.
"फक्त स्कोप वगैरे असा विचार करू नको रे. कदाचित एमबीए करूनही तुला तेव्हढ्याच पगाराची नोकरी मिळेल पण ते शिक्षण कधी ना कधी उपयोगी पडेलच."
"पटतंय मला तुमचं. एमबीए करणंच बरोबर ठरेल"
"हो...पण फक्त मी किंवा तुझे बाबा म्हणतायेत म्हणून करू नको. तुझी इच्छा असेल तरच कर"
"हो"
आता मी 'नरो वा कुंजरो वा' या भूमिकेत शिरलो होतो. शिक्षण कधीच वाया जात नाही हे वादातीत वाक्य मी बोललो होतो. आणि अर्थात अतिशिक्षणाचा फायदा काय ह्यावर गप्प बसलो होतो. इथे आमचं संभाषण संपलं. तो समाधानी होऊन त्याच्या घरी गेला. मी त्याच्या वडीलांकडून मिळणारे आशीर्वाद आणि २ वर्षांनी त्याच्याकडून मिळणारे शिव्याशाप ह्यांचा विचार करत बसलो.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :चिनार

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search