आपल्या देशात सण आणि उत्सव ज्या आत्मियतेने व उत्साहाने साजरे केले जातात त्याला तोडच नाही.पूर्वापार चालत आलेले सण आणि उत्सव यातल्या साजरीकरणात जरी बदल होत गेला असला तरी उत्साह मात्र तीळमात्र कमी झालेला नाही.आपल्या महाराष्ट्रात तर श्रावणमास हा सणांचा गोतावळा घेऊनच येतो.यातल्या श्रावण शुक्ल पंचमीलाच आपण नागपंचमी असे म्हणतो.शेतातील पीकाचे नुकसान करणारे उंदीर खावून साप शेतकऱ्याला एकप्रकारे मदतच करतो.या सापाला शेतकरी मित्र मानतो तर स्त्रिया बंधू मानतात.त्याच्या सहकार्याची जाणिव म्हणून नागाचे पूजन करुन नागपंचमी साजरी केली जाते.
पूर्वीच्या नागपंचमीत आणि आताच्या नागपंचमी खूप फरक पडलेला आहे.त्याला अनेक कारणे आहेत.

पूर्वीची नागपंचमी
===========

जून महिन्यात मृग नक्षत्रावर पावसाळा सुरू व्हायचा.पाऊसही तेव्हा बेफाम कोसळायचा....धरतीची तृषा भागवायचा!मग उघडीप मिळाली कि शेतकरी पेरण्या उरकायचा.मातीतून कोंब अंकुरायचे...पीके जोमात येता-येता श्रावण येवून ठेपायचा.सगळी धरती हिरवा शालू नेसून बैजवार नटलेली असायची.नवविवाहितेला माहेरची ओढ लागलेली असायची अन् आईचे डोळे लेकीच्या वाटेवर घुटमळायचे!अशात हर्षपावलांनी नागपंचमी यायची.
आषाढवारे वाहू लागताच कुमारीकेंच्या मनात `गुळोबा' नाच करायचा.आषाढातल्या चार बुधवारी ओल्या मातीला आकार देवून वेगवेगळ्या प्रतिकृती बनवल्या जायच्या.प्रत्येक बुधवारी वेगवेगळी! दिपावलीत जशा गवळणींच्या प्रतिकृती बनवल्या जातात तशाच थोड्याफार फरकाने गुळोबाच्या प्रतिकृती असायच्या.हा गुळोबा फक्त कुमारीकांसाठी असायचा. हा गुळोबा पाटावर बसवून एका पटांगणात आणला जायचा.तिथे त्याची यथासांग पुजा व्हायची आणि नंतर विसर्जन!विसर्जनानंतर मुली एकमेकींना पाटावरुन ओढण्याचा खेळ खेळायच्या.किती अवर्णनीय क्षण असायचा तो!
नागपंचमीची चाहूल लागताच मेंदीच्या झाडांचा शोध सुरु व्हायचा.मेंदीची पाने तोडून आणून वाळवायची.नंतर ती बारीक वाटून घ्यायची.नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेंदी दिवसभर भिजत घालायची आणि रात्री निवांत हातावर रेखाटायची.आता रेडीमेड मेंदी मिळते त्यामुळे मेंदीच्या झाडांचा शोध संपला आहे.मेंदीबरोबर नेलपेंट(नखपॉलिश),हातातील रंगीबेरंगी बांगड्या,गळ्यातील विविध माळा,केसातील पीना,कानातील झूबे अशा सौंदर्यप्रसाधनाची रेलचेल असायची.आता तर हरेक नमुन्याची सौंदर्यप्रसाधने बाजारात सहजासहजी उपलब्ध होत आहेत.आणि ती केव्हाही विकत घेतली जातात.मात्र त्यामुळे नागपंचमीच्या त्या खरेदीची ती कालची नजाकत आणि ओढ आज राहिली नाही.
नागपंचमीच्या आदल्या दिवशीच मुलांना दोर-दोरखंडाचे वेध लागायचे.जाडजूड दोरखंडांनी उंच झाडांना भरभक्कम झोके बांधले जायचे.झोके बांधण्यातही स्पर्धा असायची.आपल्याच झोक्याकडे मुली कशा येतील हे तर आवर्जून पाहिले जायचे.
कुणाची मेंदी किती रंगली याची वास्तपुस्त अंथरुणातच व्हायची आणि मेंदीभरल्या हातांवरुन जोडीदाराच्या किंवा भावी जोडीदाराच्या प्रेमाचे भविष्य रंगले जायचे.सगळ्या नाजूक हातांवरील मेंदीखवले आपल्या अंतरंगात रेखून लालभडक सूर्यनारायण नागपंचमीचा दिवस घेऊन दारात यायचा.
सकाळच्या घाईगडबडीत हळूच एखादी श्रावणझड येवून मनात ओलावा निर्माण करायची.नवविवाहिता थोडी भूतकाळात शिरुन अंतरंगी शहारायची अन् हळूच गाली नाजूक हसायची.कुमारिका तर वेगळ्याच भावविश्वात रममाण असायच्या.आज तो भेटेल अशी आस धरुन असायच्या.तो ही झोक्याभोवतीच आशेत झुलत रहायचा अन् पुन्हा एक श्रावणझड मन चिंब चिंब करुन जायची!
झडीमागून झडी यायच्या.घरात पूरणपोळीची लगबग असायची.एकदा का ही लगबग संपली कि दुसरी लगबग सुरु व्हायची.सोळा शृंगारात सजून घरातल्या आया-बाया,पोरी-बाळी आपल्या बंधूरायाला-नागाला-पूजायला दहीभात, नैवेद्य घेऊन वारुळाला जायच्या.बंधूच्या दर्शनासाठी भावभक्तीने तरसायच्या.
हा भक्ती सोहळा संपला कि नवविवाहिता व कुमारिका लाजत मुरडत झोक्याकडे वळायच्या.तिथे जुन्या-नव्या मैत्रीणींच्या गाठीभेटी व्हायच्या.काही गुजगोष्टी व्हायच्या.स्वप्नातला जूना राजकुमार झोक्याजवळ दिसताच ओठांच्या कोपऱ्यातून ओळखीच्या स्मितहास्याची एक लकेर अलगद फेकायच्या.श्रावणझड पुन्हा भिजवायला हजर असायची.
जुन्या मैत्रिणींबरोबर झोका उंच आकाशाला भिडवायचा...मनात भीती दाटून यायची अन् डोळे अलगद बंद व्हायचे.त्या बंद पापण्याआड असायचा फक्त तो स्वप्नातला राजकुमार! तो राजकुमार तिला उंच उंच आकाशात घेऊन फिरतोय असा भास व्हायचा.
झोक्याच्या चढाओढीत सया वयही विसरायच्या अन् जगाचे भानही विसरायच्या.एका मुक्त आकाशात त्या स्वच्छंद विहारायच्या.जणू बंधूराजाच्या भेटीने त्या दु:खमुक्त व्हायच्या.आयुष्याच्या झुल्यावर झुलतानाचे सारे कष्ट विसरायच्या.
श्रावण शुक्ल षष्ठीला गौरीची मिरवणूक निघायची आणि पाटलाच्या वाड्यात स्थानापन्न व्हायची.तिथे गौरीभोवती फेर धरुन भगिनी गौरीगीते म्हणायच्या.एकाचढ एक गीते सादर केली जायची.नंतर त्या गौरीचे विसर्जन करुन नागपंचमीची सांगता व्हायची.
असा आगळावेगळा आनंद घेऊन नागपंचमीला आलेल्या सासरवाशिणी पुन्हा आपल्या संसारासाठी एक नवी शिदोरी घेऊन जायच्या.

आताची नागपंचमी
============

आज जूनमध्ये मृग नक्षत्रावर पाऊस येईलच याची शाश्वती राहिली नाही.पाऊस आता पहिल्यासारखा वेळेवर पडतच नाही.ही धरतीमाता हिरवा शालू पांघरत नाही.तिलाही ओढ लागलेली असते पावसाची.पाऊसही बेईमान झाला...आला तर येतो नाहीतर दुष्काळच पाचवीला पुजलेला असतो.पेरण्या होत नाहीत...झाल्या तरी पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने जोमातली पीके कोमात जातात.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु होते.आषाढातले वारे आणखीनच जोरात वाहतात.सगळीकडे चिंता आणि फक्त चिंता असते.समाधान आणि आनंदाचा कुठेही मागमूस नसतो.पाठीवरल्या संकटांनी गुळोबाही आता पाटावर सजत नाही.
अशातच श्रावण येतो...पाठोपाठ नागपंचमीही येते.पण त्यात उत्सुकता राहिली नाही.तो सोळा शृंगारात सजण्याचा ध्यासही नाही आणि परिस्थीतीही नाही.
सासरवाशिणीही चार दिवस येतात.परिस्थिती इकडेही तीच असते आणि तिकडेही तीच असते.एक रिवाज म्हणून नागपूजन करतात.पण त्यात जोश नसतो.गौरीलाही हल्ली तोंडदेखले पुजले जाते.गौरीगीते नामशेष होण्याच्या मार्गावर असून नविन जमान्यातल्या स्त्रियांना गौरीगीतासह कोणत्याच लोकगीतात रस राहिला नाही.
झाडेही आता राहिली नाहीत आणि ते झोकेही राहिले नाहीत.एवढेच काय,मनाला चिंब चिंब भिजवणारी ती श्रावणझडही आता येत नाही...!संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
anandiprabhudas@gmail.com

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita