१०/२०/२०१५

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

३ एप्रिल १६८०

'छत्रपति शिवाजी महाराजांचे महानिर्वाण'.


स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ते कधीही
मागे न हटणाऱ्या मावळ्यांची. मावळ्यां बरोबरच
शिवरायांना साथ दिली गड किल्ल्यांनी. ते बोलू शकत
नसले तरी शिवरायांप्रती त्यांची निष्ठा
मावळ्यांइतकीच
होती. शिवकाळात बचाव व चढाईसाठी अत्यंत उपयुक्त हे
गडकोट पाहिले की अंगात उत्साह संचारतो. या बुलंद
किल्ल्यांच्या साथीने मूठभर मराठा सैनिकांनी
औरंगजेबासारख्या बलाढ्य आणि पाताळयंत्री
बादशहाला झुंज दिली. १८१८च्या इंग्रज-मराठा
युद्धापर्यंत या
किल्ल्यांचा उपयोग झाला. अनेक निर्णायक युद्धांत
किल्ल्यांवर शिबंदीने निकराची झुंज दिली. सातवाहन,
शिलाहार, यादव अशा पराक्रमी व कीर्तिवंत घराण्यांनी
या किल्ल्यांवर वास्तव्य केले. शिवरायांनी किल्ल्यांचे
महत्त्व ओळखले, त्यांच्या आधारेच राज्यकारभार केला
आणि नवे किल्ले बांधले. शिवरायांचा जन्म शिवनेरी
किल्ल्यावर झाला आणि रायगडावर त्यांनी
चिरविश्रांती घेतली.
शिवरायांचा आठवावा प्रताप छत्रपती शिवाजी
महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी
किल्ल्यावर झाला. शिवरायांनी हिंदवी
स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी तोरणा हा
गड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणा
जिंकल्यानंतर त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला २२
हंड्यांचा लखलाभ झाला. त्या धनाचा उपयोग
शिवरायांनी राजगड बांधण्यास केला. हळूहळू त्यांनी
अनेक किल्ले जिंकले, नव्याने बांधले आणि काहींची
डागडुजी केली. मध्यंतरी झालेल्या पुरंदरच्या तहात
शिवरायांना काही किल्ले मोगलांच्या ताब्यात द्यावे
लागले; परंतु काही दिवसांतच त्यांनी आपल्या वीर
मावळ्यांच्या साथीने परत मिळवले. महाराष्ट्राच्याच
नव्हे तर जगाच्या इतिहासात शिवरायांचे नाव
सुवर्णाक्षरांनी नोंदवलेले आहे. कर्तृत्व, साहस,संघटनकौशल्य,
मुत्सद्देगिरी, शासन कौशल्य, अलौकिक बुद्धिमत्ता,
चारित्र्य, नीतिमत्ता असे सर्व गुण असलेल्या
शिवरायांची मोहिनी आजही मराठी मनावर कायम आहे.
अशा या रयतेचा राजाचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी
रायगडावर झाला.

त्यांची समाधी रायगडावर सर्व शिवभक्तांना कायम
प्रेरणा देत आहे आणि राहील. या स्वराज्य रयतेच्या
राजेंना शतश: प्रणाम


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search