१२/१७/२०१५

किल्ले रतनगड
पावसाचा दीर्घ सहवास मनाला हुरहूर लावून गेलेला.. तोच तिकडे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून रानमाळावर रानफुलांचा रंगारंग उत्सव एन बहरात येत असलेला. निळ्याशार आसमंताच्या पार्श्वभूमीवर शुभ्र ढगांचं कोंदण तर लाजवाबच..! दूरदूरपर्यंतचे हिरवे मुलूखमैदान पूर्ण दृष्टिक्षेपात येणारा. स्वच्छ सूर्यकिरणात न्हाऊन निघणारा तो साऱ्या सृष्टीचा अशा असामान्य वातावरणात आम्हा भटक्या मंडळींना वर्षभरातल्या ट्रेकिंगचं सेलिब्रेशन आणि नवरात्रानिमित्त सीमोल्लंघन करण्याचा मूड न आला तर नवलच!


सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर विविध रंगांनी सजलेल्या माळरानांवर हे ट्रेकिंग सेलिब्रेशन किंवा सीमोल्लंघन म्हणा हवं तर, साजरा करण्याची काही अफलातून ठिकाणं या सह्याद्रीच्या कडे-पठाराकडे आकृष्ट करताहेत. त्यातलंच हे एक सह्याद्रीतलं अनमोल रत्न 'किल्ले रतनगड' वर्षभरात एकदाच सीमोल्लंघन करण्याची संधी नवरात्रोत्सवात मिळते. शास्रीयदृष्ट्या याला वेगळे आयाम प्राप्त असतीलही, मात्र आम्हा भटक्यांना सीमोल्लंघन म्हणजे आपला परिसर वा परिघाबाहेर डोंगरदऱ्यात भटकायला जाणं हेच.


दुपारीच रतनवाडीत पोहचलो.. अमृतेश्वर मंदिराच्या अंगणातचं गाडी लावली. तोपर्यंत हेमाडपंथिय धाटणीच्या या मंदिरवर नजर स्थितप्रज्ञ अवस्थेत गेलेली.. अप्रतिम कलाकुसरीचं मंदिर.. महादेवाचं दर्शन घेतलं. आवरासावर करत सोबत वाटाड्या घेतला अन् पाऊले चालू लागली रतनगडच्या दिशेने. काही वेळातच दाट जंगलाच्या कुशीत विसावलेला अन् आपल्या अस्तित्त्वाचं निशान दाखवण्यासाठी उठावलेला रतनगड आव्हान देऊ पाहात होता. काही वेळातच खळखळणाऱ्या प्रवरेच्या नदीपात्राला ओलांडून झाडांचा सहवास सुरू झाला.. रहदारीची पायवाट.. आपलीशी वाटणारी ! जुनी-जाणती झाडं आलावा धरून बसलेली. पुढे दमछाक करणारी चढाई. तासाभरात एका चौफुलीवर विश्रांतीसाठी थांबलो. दक्षिणेकडे काही पावलांवर स्वच्छ पाण्याचं कुंड. पुढची पायवाट कात्राबाई खिंडीकडे जाणारी.. परत चौफुलीपर्यंत आलो तर उत्तरेकडची पायवाट सांम्रद गावाकडून येणारी.


आम्ही पश्चिमेकडे निघालो, अन् तासाभराची जंगल चढाई करत शिडी मार्गापर्यंत आलो. सावध पवित्रा घेत पहिल्या गणेश दरवाजापर्यंत आलो. माथ्यावर भैरोबाची मूर्ती कोरलेली आहे. तर डाव्या कातळावर गणेशाची मुर्ती. पुढे पायऱ्या चढत डावीकडच्या हनुमान दरवाजासमोर येऊन पोहोचलो. दरवाजातनं किल्यावर जाण्याचा मार्ग आहे. आम्ही तिकडे न जाता उजवीकडे गुहेकडे मोर्चा वळवला. पहिल्या लहानशा गुहेत रत्नादेवीची तांदळा प्रकारची सुरेख मूर्ती आहे तर पुढे मोठ्या गुहेत राहाण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. बाजूलाच थोड्या अंतरावर पिण्यायोग्य पाण्याचं टाक आहे. गुहेत सॅक टाकत हनुमान दरवाज्यातनं माथ्यावर आलो. अन् काय आश्चर्य पिवळ्या जांभळ्या रानफुलांनी संपूर्ण गडमाथा सजला होता. त्यात उजवीकडे राणीचा हुडा बुरुज आकर्षित करणारा. बुरुजाच्या बाजूलाच स्वच्छ पाण्याचं टाक आहे. बुरुजावरून चौफेरचं विहंगम न्याहाळत गडाच्या उत्तर-पूर्व बाजूकडे निघालो. थोड्याच वेळात काठावर आलो. चिलखती शैलीचा कातळ कोरीव बुरुज अन् तिथून दक्षिणेला आव्हान देणारा कात्राबाईचा आवाका फारचं भन्नाट दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्यामुळे हिरवाईचा गालीचा कात्राच्या सौंदर्यात भर टाकत होता. सोबतीला लगट करणारे शुभ्र ढगांचे खट्याळ पुंजके मन वेडावून टाकत होते. पूर्वेचे रंग न्याहाळत आम्ही पश्चिमेकडे कूच केली. माजलेलं रानगवत कापत पश्चिम दिशेला आलो. खालच्या टप्प्यात कोकण दरवाजा अन् बाजूला तुडुंब भरलेली ६ कातळ टाकी किल्ल्याचं महत्त्व अधोरेखित करीत होती. फोटोग्राफीचा आनंद घेत उत्तरेकडे निघालो. पिवळ्या- निळ्या रानफुलांनी जणू गालिचा अंथरलेला अन् त्यातून जाणारी वाट काय सुख देत होती. तिरकस चाल ठेवत नेढ्यात पोहोचलो. भन्नाट वारा अनुभवत माथ्यावर गेलो. चारही बाजूंचं सृष्टिसौंदर्य बघून गलबलून गेल्यासारखं झालं. काय नजराणा पेश केला होता! निशब्द शांतता आणि सोबतीला अंगाला स्पर्शून जाणारा वारा.. समोर कात्राबाईच्या गगनचुंबी पहाडाला आपल्या कवेत घेणारे ढगांचे मायाजाल अवाक करत होते. भंडारदरा डॅमचं स्थिर जलसंचय शाश्वत जीवनातचं सूत्र सांगत होतं तर उत्तरेला अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर, रांगड्या सह्याद्रीच्या दराराचं प्रतिनिधित्व करत होती.


मतीगुंग अवस्थेत नेढ्यात परतलो. मग तिथून उत्तरेकडच्या त्र्यंबक दरवाजाकडे उतरू लागलो. अप्रतिम बांधकाम शैलीचा भरभक्कम दरवाजा अन् कातळकोरीव पायरी मार्ग. पुढील मार्ग रतनगडच्या खुट्ट्याला वळसा मारून साम्रद वा रतनवाडीकडे जाणारा. पायऱ्या उतरून खालपर्यंत जाऊन मागोवा घेतला आणि परतीला निघालो. गुहेत मुक्कामाचं नियाजन होतं. दिवे लावण्याची वेळ.. तशी इथे गुढरम्य वाटणारी .. अंधाराचं साम्राज्य जसं पसरू लागलं तसं दिवसभरातलं रतनगडाचं अलौकिक सृष्टी सौंदर्य मनातल्या गाभाऱ्यात लख्ख दिसू लागलं..


हल्ली रतनगड तसा तमाम ट्रेकर्स जमातीचा तसेच सर्व प्रकारच्या भटक्यांचा हॉट डेस्टिनेशन आहे. पण सध्या बरीच व्यसनी मंडळी गेट टुगेदरच्या दृष्टिकोनातून तिथे जातात. दारू व मटण, मासे यांच्या पार्ट्या करतात. यासाठी स्थानिकही तितकेच जबाबदार आहेत. तरी तमाम नाशिककरांना नम्र विनंती आहे की अशा प्रकारांपासून अलिप्त रहा व तसं करणाऱ्या व्यक्तींना विरोध करा!


रतनगड - भंडारदरा परिसर

पायथ्याचं गाव - रतनवाडी

उंची : १२९७ मीटर

अंतर : नाशिकपासून ९६ किमी

मुक्काम : मुक्कामासाठी गुहा आहे तर बारमाही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.

मार्ग - नाशिककरांसाठी : नाशिक -भंडारदरा -रतनवाडी

योग्य वेळ : रतनगडावर ट्रेकला जाण्यासाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम आहे. याच काळात रानफुलांचे सौंदर्य सर्वत्र खुललेला असतो. हा गड फोटोग्राफीसाठी तर हॉट डेस्टिनेशन आहे.

उगम : साऱ्या अहमदनगर जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या प्रवरा नदीचा उगम याच रतनगडाच्या कुशीतून झाला आहे!संदर्भ: Maharashtra Times
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search