१२/०९/२०१५

कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते. 
काही आमदारांचं 'मोबाईल वेड'
यावेळी एकदा शोकप्रस्तावमध्येच थांबवण्यात आला,  'मोबाइलवर खेळायचे असेल तर, बाहेर जा', अशा शब्दात विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आमदारांना इशारा द्यावा लागला. लहान-लहान गोष्टींवरून सभागृहाचा अवमान होईल, असा विचार करणारे आमदार सभागृहाच्या दिवंगत सदस्यांविषयी आदर का बाळगत नाहीत, हा सवाल उपस्थित होत आहे.

हरिभाऊंना अखेर बोलावं लागलं...
अतिशय गंभीर विषयावर चर्चा सुरू असतानाही बहुसंख्य आमदार हे व्हॉटस अॅप आणि मोबाईलमध्ये गुंग असल्याचं लाजीरवाणं प्रदर्शन दिसून आलं आहे. हे पाहून विधानसभा अध्यक्षांना अखेर बोलावं लागलं, 'शोकप्रस्तावावर भाषण सुरू आहे. ज्या सदस्यांना मोबाइलचा वापर करायचा आहे, त्यांनी उठून बाहेर जावे', असं हरिभाऊंना सांगावं लागलं.

विरोधी बाकावरून आवाज.... मोबाईल बंद करा
हरिभाऊंनी खडसावल्यानंतर सभागृहात शांतता झाली, सर्वांनी बाकांखाली मोबाईल ठेवले. एका आमदाराने तर बाकावर टॅब ठेवल्याचंही दिसून आलं, यानंतर पतंगराव कदमांचं भाषण सुरू असताना दोन मंत्र्यांनी मोबाईल न्याहाळायला सुरूवात केली, व्हॉटस अॅप मॅसेज वाचायला सुरूवात केलीच असेल, तेव्हढ्यात विरोधी बाकांवरून दबका आवाज आला,  मोबाईल बंद करा.

सभागृहात मोबाईल बंदी लावावी का?
शोकप्रस्ताव, गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना व्हॉटस अॅप मॅसेज वाचण्यात सदस्य गुंग असतील, तर सभागृहात मोबाईल बंदी का करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित होत आहे, जनता जनार्दनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात आमदारसाहेब येतात, पण साहेब व्हॉटस अॅप खेळत असतील तर, जनतेच्या प्रश्नांचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित होऊ नये, म्हणून सभागृहात मोबाईल बंदी लावण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे.


Source:http://zeenews.india.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search