१२/१४/२०१५

विशाळगडविशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

इतिहास

विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

पुढे छ. शिवाजी महाराजांनी इ.स. 1659 मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून ते विशाळगड चे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. साधारण 30 मिनिटे चालल्यानंतर आपण गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर "हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आहे.


संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search