१/०६/२०१६

उरण चिरनेर चा महागणपती
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक गाव पनवेल पासून २२ किलो मिटर तर उरण शहरापासून १६ किलोमिटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल खेडेगाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं आहे .गावात पाय टाकल्यावर कुंभारकामाचे नमुने पहायला मिळतात. उरण-चिरनेर गावचे हे मंदीर ऐतीहासीक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्‍या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा. मग तळ्यामध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले. महाराष्ट्रातील अष्टविनायकानंतर नववे मानाचे स्थान या गणपतीला असल्याचे भाविक मानतात. हिंदू धर्माला अनुसरून गाव तिथे देऊळनुसार फडके या सुभेदाराच्या कृपेने चिरनेर येथे गणेश मंदिर बांधण्यात आले. तेच हे चिरनेरचे महागणपती तीर्थक्षेत्र होय. महागणपतीचे हे मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराचे बांधकाम सिमेंट, चुनाविरहित चिरेबंदी दगडाचे आहे.
उरणकडे जाणार्या बसने चिरनेर फाट्यावर उतरून सहासिटर मिळतात .तिथे जेवणाचीही सोय होते .एक दिवसिय सहल आणि चिरनेर चा क्रांति कारी इतिहास जाणून घ्यायलाही चिरनेर ला जायला हरकत नाही .


संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search