२/१०/२०१६

आयुष्य...नियम जगाचे शिकतो आहे  

एकसारखा चुकतो आहे 


दैव, कर्म, फळ, तिनपत्तिच्या 
जुगारात मी रमतो आहे
करायचे ते करून झाले...   
विचार कसला करतो आहे?
पाप पुण्य हे मनात सारे 
कुणा पासून पळतो आहे?


शरीर जगले जरी कितीही 
आत्मा रोजच मरतो आहे
‘’पूर्व संचीत असते का?’’ हा  
सवाल मजला छळतो आहे
आत्मा कधीच गहाण पडला
जगून हप्ता भरतो आहे
आयुष्याचे माझ्या वरचे
देणे चुकते करतो आहे
माणसात तो दिसला नाही
दगड नवा मी पुजतो आहे
दोर पकडला नियतीने हा 
पतंग मी, वर उडतो आहे


सरळ मार्ग मी किती चाललो 
वळण नवे मी वळतो आहे
जान्हवे तर खुंटीवर पण 
ब्राह्मण्य मी जपतो आहे
लाख बनवले जरी कायदे
दुर्योधन बघ चळतो आहे
  
शरीफ सगळे सांभाळ तरी
पदर तुझाही ढळतो आहे


हलाल खटका जरी वेगळे 
बकरा जिवास मुकतो आहे


‘’हिरवा’’, ‘’भगवा’’, आतंकाला 
रंग धार्मिक चढतो आहे
ग्यास पुरवला एकानी अन 
दुसरा चहा विकतो आहे
  
दिल्लीवरती सत्ता ज्याची 
उपोषणाला बसतो आहे
  
गाडी त्याची लाखाची पण 
टोल भराया रडतो आहे
टोल धाड ही मोडण्याला
मुख्यमंत्रीही डरतो आहे
  
उपरा ठरला इथे मराठी 
इथे बिहारी वसतो आहे
हापुसही मज ‘’आम’’ वाटला 
भैय्या पाट्या विकतो आहे
ट्रेन पकडणे इतिकर्तव्यता  
सीट चौथी धरतो आहे
जमीन माझी कसताना मी
मतल्या मधे मुरतो आहे


मला न देणे इथे कुणाशी 
गझले साठी जगतो आहे
माझ्या मधुनी तिला वगळता 
बाकी कुठे मी उरतो आहे
दुष्काळावर गझल पोतण्या 
मात्रांशी मी झटतो आहे
टिनपाट जरी छाती माझी 
गझलेत सूर्य गिळतो आहे


‘’गझलीयत ना दिसली येथे’’ 
बोच टिकेची सहतो आहे
  
गुरूच सगळे कुणी न चेले 
गझल तरी मी शिकतो आहे
कुणा कधी ना बधलो येथे 
प्रस्थापितांस सलतो आहे 
शरीर गलबत जीर्ण शीर्ण हे 
दूर किनारा दिसतो आहे 


कोहम कोहम शोध चालला 
जीव कुडीतच कुढतो आहे
शरीरास या अहं मानून 
पहा कसा मी भुलतो आहे
शरीर गेले तिरडी वरती 
आत्मा येथे झुरतो आहे
सरणावरती लाकूड नाही 
 तरी जळतो आहे


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search