६/२९/२०१६

पाऊस , तू अन मी


तिला पावसाचा कंटाळा 
मला पाऊस आवडतो 
कारण तो आल्यावर तिच्या आठवणींचा पूर येतो 

एक तर ती कधीच येत नाही 
माझ्या प्रेमाची शपथ देऊन 
मी तिला बोलावतो 

अन हा पाऊस 
माझी परवानगी न घेता 
तिच्या अंगाशी लगट करतो 

ती थरथरते पहिल्या थेंबानं 
नजरेनच त्याची तक्रार करते 
मी मनातल्या मनात नुस्ता हसत रहातो 

तिलाही आवडतो त्याचा स्पर्श 
तो हि तिच्या स्पर्शान सुखावतो 
मग तो सर होऊन तिच्यावर बरसत रहातो 

ती जाते चिंब भिजून 
मी माझी छत्री उघडतो 
तो इकडून तिकडून तिला छेडत रहातो 

तो कोसळतो मुसळधार 
तू अजून जवळ येते 
तू असाच कोसळ मी मनातच म्हणतो 

तुझी जवळीक पाहून 
तो हि चिडत जातो 
पावसासोबत वाऱ्यालाही आमंत्रण देतो 

छत्रीचे वाजतात तीन तेरा 
त्याला मोकळे रान मिळते 
मग तो मनसोक्त तुला मला भिजवतो 

असेच आपण भिजत चालतांना 
एक भूट्यांवाला दिसतो 
एक कणीस आपण दोघं मिळून घेतो 

ते गरमागरम कणीस पाहून 
त्याच्या तोंडालाही पाणी सुटते 
तोही त्या कणसात बेमालूमपणे मिसळून जातो 

मी म्हणतो पावसास 
कां रे बाबा तू नेहमीच असा वागतो 
तिला आवडत नाही तरी तू कां छेडतोस 

तो हळूच सांगतो कानांत 
तुझी प्रिया आहेच खूप खूप सुंदर 
मी हि मनापासून तिच्यावर प्रेम करतो 

तुझं काय रे तुला तर 
मिळते तिची नेहमीच सोबत 
मी मात्र वर्षातून एकदाच तिला भेटतो 
मी मात्र वर्षातून एकदाच तिला भेटतो 

संजय एम निकुंभ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search