६/०३/२०१६

विजयदुर्गची नैसर्गिक भिंत

विजयदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रातील भिंत हा इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्ये नेहमीच उत्सुकता राहिली आहे. ही भिंत शिवकालीन आहे की तयापूर्वीची यावरूनही बरीच चर्चा झाली आहे. पण ही भिंत मानवनिर्मित नाही तर नैसर्गिक असल्याचं नव्या संशोधनामधून स्पष्ट झाले आहे.


विजयदुर्गाजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे शील त्रिपथी यांनी १९९८ मध्ये ' जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी ' मध्ये शोधप्रबंध सादर केला होता. ओशनोग्राफी संस्थेतील याच प्रबंधाला समोर ठेवून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत भरलेल्या इंडियन हिस्ट्री कॉँग्रेसमध्ये जोशी यांनी ' मिथ्स अँड रिअॅलिटी - दी सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅट फोर्ट विजयदुर्ग ' या विषयावर शोधनिबंध सादर केला होता.

जोशी यांनी याबबत माहिती दिली. विजयदुर्ग किल्ल्याला तीन मोठ्या व भक्कम तटबंद्या आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे बांधकाम करण्याची आवश्यकता नव्हती. तसेच , त्या वेळी पाण्यावर पूल बांधण्याचे तंत्रज्ञानही विकसित झाले नव्हते. त्यामुळे त्याकाळी पाण्याखाली अशा प्रकारचे बांधकाम करणे शक्य नव्हते , असं त्याचं म्हणणं आहे.

हे बांधकाम भिंतीसारखे नसून एखाद्या ' प्लॅटफॉर्म ' सारखे असल्याचे दिसते. यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वांत मोठा दगड हा ३.५ बाय २.५ बाय २.५ मीटर इतक्या मोठ्या आकाराचा आहे. एवढा मोठा खडक वाहून आणून त्याचा बांधकामात वापर करणेही त्या वेळी शक्य नव्हते.

या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे त्या काळी आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते. विजयदुर्ग किल्ल्यावर झालेल्या लढायांच्या ९० वर्षांच्या इतिहासात दोन-तीन घटना वगळता या भिंतीच्या परिसरात बोटी भिंतीवर आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश , पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात कोठेही आढळत नाहीत.

किनारपट्टीवर अन्य ठिकाणीही ...

विजयदुर्गाजवळील भिंतीसारखेच बांधकाम कोकण किनारपट्टीवरील जंजिरा , सुवर्णदुर्ग , खांदेरी , देवगड , कोरलाई आदी ठिकाणीही आढळते. वेळणेश्वर परिसरात पुरातत्त्व खात्याने केलेल्या संशोधनात सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची अशाच प्रकारची २.१८ किलोमीटर लांबीची भिंत आढळली आहे. या बांधकामात आणि विजयदुर्गाजवळ आढळणाऱ्या भिंतीच्या रचनेतही साम्य आढळते. भूगर्भशास्त्रानुसार ही रचना ' डाइक ' या प्रकारात मोडते. त्यामुळे ही भिंत म्हणजे एक नैसर्गिक रचना असल्याचे स्पष्ट होते. आंतरविद्याशाखीय पद्धतीने अभ्यास केल्यास या भिंतीबाबत अधिक ठोस पुरावे हाती येण्याची शक्यता आहे

संदर्भ: https://www.facebook.com/Amhichtevede

लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search