७/०२/२०१६

वेरुळ लेणी : भूलोकीचा स्वर्गवेरूळच्या लेणीसमूहात १६ वैदिक हिंदू, १३ बौद्ध, तर ५ जैन लेणी आढळतात. तीन धर्माचे अधिष्ठान असलेल्या शिल्पाकृती एकाच ठिकाणी येथे पाहावयास मिळतात. त्यातून धर्माभिमानाचा अट्टहास दिसत नसून, परधर्मसहिष्णुतेचे अनोखे दर्शनच घडते..
भारतभूमीवर सुमारे बाराशे लेणी आहेत. त्यातील जवळजवळ ८०० लेणी महाराष्ट्रात निर्माण झाल्यात. स्थापत्य शिल्पकलेचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या विविध लेण्यांना इतिहासाबरोबर काही राजसत्तेच्या प्रोत्साहनाबरोबर धर्माचीही पाश्र्वभूमी आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत भारतातील ज्या मानवनिर्मित वारसावास्तू, शिल्पांचा समावेश झालाय त्यातील औरंगाबादजवळील वेरूळ येथील लेणी-समूह म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच!
औरंगाबादपासून २८ कि.मी. अंतरावर हा शिल्प-खजिना आहे. देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते. मात्र वेरूळचा लेणी समूह सलग प्रस्तरातून निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम 'आधी कळस, मग पाया' या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे अलौकिक शिल्प साकारण्यातील शिल्पकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. लेण्यांचे खोदकाम हाती घेण्याआधी त्या अज्ञात शिल्पकारांनी नियोजित जागेचा निश्चितच अभ्यास करून आराखडा तयार केल्याचे जाणवते. लेणी खोदकामातील भूमितीशास्त्राबरोबर भूगर्भशास्त्र, पहाडी प्रदेशातील पत्थराच्या दर्जाचा अभ्यास करून येथे कामाला प्रारंभ झाला. संपूर्ण लेणी-समूहातून हवा-प्रकाशाबरोबर पर्यावरणाचाही अभ्यास या शिल्पकारांनी करून आम्ही किती प्रगत, अभ्यासू आहोत हेच जगाला दाखवून दिले आहे.
यापूर्वी- आधी निर्माण केलेल्या लेणी उभारणीचा अनुभव ध्यानी घेऊन खोदाईचे तंत्र कालांतराने विकसित झाल्याचे दिसते. या लेण्यांमध्ये दुर्मीळ असलेल्या इमारतीप्रमाणे मजल्याचे काम हाती घेण्यात आले हे विशेष. त्यासाठी जिने, गच्ची, सज्जे अशा प्रकारचेही पूरक बांधकाम करण्यात आले आहे. अजिंठा लेण्यांचे काम पूर्ण झाल्यावर इ.स. ५व्या शतकात ही अजरामर शिल्पकला निर्माण झाली. या लेणी समूहात १६ हिंदू, १३ बौद्ध, तर पाच जैन धर्मीय लेण्या आढळतात. तीन धर्माचे अधिष्ठान असलेल्या शिल्पाकृती एकाच ठिकाणी येथे पाहावयास मिळतात. त्यातून धर्माभिमानाचा अट्टहास दिसत नसून, परधर्म सहिष्णुतेचे येथे अनोखे दर्शनच घडते. जैन, बौद्ध, हिंदू धर्मीयांनी ही उत्कृष्ट कलाकृती निर्माण करताना आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सहिष्णुता, सलोखा आणि एकात्मतेचे अनोखे दर्शनच घडवले आहे. वेगवेगळ्या संस्कृतींचा असा मिलाफ क्वचितच कुठे पाहावयास मिळतो.
या लेण्यांतील कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंध खडकातून निर्माण केलेले अवर्णनीय असे नुसतेच काव्य नव्हे, तर ते अजरामर महाकाव्य आहे. २९ मी. उंच ५० मी. लांब आणि ३३ मी. रुंद असे त्याचे आकारमान आहे. शिवाचे निवासस्थान (सदन शिवाचे) म्हणून या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते. हजारो वर्षांपूर्वी हाती फक्त छिन्नी-हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून आमच्या संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवलाय. ज्या पहाडात ही लेणी निर्माण झाली, त्याला 'येलू' पर्वत असे म्हणतात. त्याच्याजवळून 'येलगंगा नावाची नदी वाहते' येलू पर्वत आणि येलगंगा यावरून या ठिकाणाला 'येलूर' हे नाव पडून कालांतराने त्याचे 'वेरूळ' हे नाव रूढ झाले.
कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूंस सुबक शिल्पे आहेत. त्यांना पौराणिक पाश्र्वभूमी आहे. त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष्य वेधतात. जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ, कीर्तिस्तंभांनी या शिल्पाचे सौंदर्य खुलवले आहे. एकाच प्रस्तरातून निर्माण झालेले हे कैलास लेणे इ.स. ८ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा कृष्णराज याच्या औदार्य, प्रोत्साहनाने निर्माण झाले. त्याच्यानंतर सत्तेवरील राज्यकर्त्यांनीही प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले. रामायण-महाभारतातील प्रमुख प्रसंग या लेण्यांत अप्रतिमपणे कोरले गेल्याने या दोन्ही काळांतील सचित्र इतिहासाचे सादरीकरण करण्यात शिल्पकारांनी आपली जान ओतली आहे. त्यातील महाभारत कथासार, श्रीकृष्ण जन्म, महाभारत युद्ध, भरताचे राज्यारोहण, राम-हनुमान भेट हे प्रमुख प्रसंग खूपच सजीव-बोलके वाटतात.
कैलास लेणी प्रारंभी 'माणिकेश्वर' नावाने परिचित होती. इतिहासकार- जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर सोयीचा मोठा खडक मूळ डोंगरापासून अलग करून घेतला. नंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्या काळच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम नव्हे, तर कल्पकतेने कोरीव कामातून साकारल्याने ते शिल्पच आहे. येथील मोठय़ा संख्येने (१६) निर्माण केलेल्या हिंदू लेण्यांवर पौराणिक प्रसंगांवर भर देण्यात शिल्पकारांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे. देशभर हिंदूंच्या पुनरुज्जीवनाच्या काळी भव्य शिल्प मंदिरे उभी राहत असतानाच वेरूळची ही भव्य लेणी शिल्पाकृती निर्माण झाली, ही विशेष बाब आहे. शतकापेक्षा जास्त काळ परिश्रम घेऊन एकसंध प्रस्तरातून कल्पकतेने विशाल देखणी लेणी निर्माण करणे हा खरे तर वास्तुशास्त्रामधील अजब प्रकार येथे पाहावयास मिळतो. या लेण्यांवर द्रविडी शैलीचा प्रभाव जाणवतो. १४ क्रमांकाच्या भव्य लेण्यांतील विस्तीर्ण मंडपाच्या केंद्रस्थानातून उभारलेल्या बारा स्तंभांमुळे या लेण्याचे वेगवेगळे चौरस-चौकटीसदृश भाग दिसून येतात. प्रत्येक भागातील लहान-मोठय़ा शिल्पाकृती पौराणिक कथेचे सादरीकरण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. दुर्गामूर्ती, गजलक्ष्मी, जलाभिषेक करणारे गजराज यांच्या बरोबरीने पाना-फुलांचा जो निसर्ग आविष्कार दाखवलाय तो सर्वच सजीव आणि बोलका वाटतो.
वेरूळ लेण्यांतील बौद्ध लेण्या दक्षिणाभिमुख आहेत. बऱ्याच लेण्यांतून कलात्मकतेबरोबर भव्यतेचा आविष्कार जाणवतो. औरंगाबादनजीकच्या अजिंठा लेण्यांतील भित्तीचित्रांचे वैशिष्टय़ येथे जाणवत नाही. गौतमबुद्ध आणि बुद्ध धर्मीय देवतांना या लेण्यांतून महत्त्व देण्यात आल्याचे जाणवते. बुद्धाच्या विविध शैलीतील लहान-मोठय़ा मूर्ती कोरण्यावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते. या बौद्ध लेण्यांतील क्र. १० चे लेणे म्हणजे कल्पकता, कला आणि प्रगत वास्तुशास्त्राबरोबर नव्या-जुन्यांचा सुनहरा संगम आहे. क्र. ११-१२ लेण्यांना भव्यता आहे. हे लेणे सुरुवातीस दोन मजलीच होते, परंतु तळमजल्यावर उत्खनन केल्यावर ते मूळचे तीन मजली असल्याचे निष्पन्न झाले. बौद्ध लेण्यांतून सर्वत्र विविधता आणि कलात्मकतेचेही दर्शन घडते. बुद्धाच्या विविध मूर्तीव्यतिरिक्त मानवी जीवनाला आधार ठरलेले पशु-पक्षी यांच्याबरोबर वनसंपदा दाखवण्यापाठीमागे त्या काळचे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगण्याचाच जणू प्रयास आहे.
जैन लेणी समूह
संख्येने कमी असलेली एकूण पाच (क्र. ३० ते ३४ ही जैन धर्मीयांची गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. त्या काळी निर्माण झालेल्या बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृतीच वाटते. या लेण्या एक मजलीच असून त्याची आतून जोडणी करण्यात आली आहे. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव साक्षीदार ठरलेत.. २३ वे र्तीथकार पाश्र्वनाथांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्टय़ आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.
वेरूळ लेण्यांतील शिल्पमूर्तीचे बोलके, सजीव चेहरे, त्यांची कमनीय, सुडौल शरीररचना, वस्त्र-आभूषणांसहित स्त्री-पुरुष मूर्तीचा साज-शृंगार, स्त्री शिल्पांची आकर्षक वेशभूषा-केशरचना, पशु-पक्षी आणि वृक्षसंपदेचे सहजसुंदर सादरीकरण हे सारे पाहाताना त्या काळच्या कलासक्त, सुसंस्कृत समाजजीवनाची कल्पना येते.
कितीही वेळा वेरूळ बघून झाले तरी आपले मन भरत नाही. पण येथील देवदुर्लभ, अनोख्या दर्शनाने कोणताही दर्शक-अभ्यासक हेलावतो आणि अंतर्मुखही होतोच. हा सारा दुर्मीळ नजारा बघून बाहेर पडताना पाय जडावतात आणि काही प्रश्न तुमचा पाठपुरावा करतात.
..कैक शतकांपूर्वी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण होते? त्यांची नावनिशाणी कुठेच का नाही? की पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी भगवंतानेच त्यांना धाडले होते..
धर्माभिमानी आक्रमकांनी साम्राज्यविस्ताराच्या आसुरी हव्यासापोटी, उन्मादात येथील काही मूर्ती-शिल्पांचा केलेला विध्वंस बघितल्यावर त्यांच्यातील अरसिकता, असंस्कृतपणाचेही दर्शन घडते. तेव्हा ही कलाकृती निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात शिल्पकारांची कितीही वेळा क्षमा मागूनदेखील आपले मन खंतावलेलेच राहते..

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search