''सृष्टी मधे बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक''
या समर्थ वचनाला जागून एकदा का घराबाहेर पडले की या सृष्टीमधल्या अनेक सुंदर गोष्टी, ठिकाणे यांचा परिचय होतो. नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा जरा वेगळी वाट, आडवाट धरली की कितीतरी आश्चय्रे, निसर्गनवल, सौंदर्यस्थळे सामोरी येतात. सृष्टीकर्त्यां परमात्म्याची ही सारी निर्मिती पाहून थक्क व्हायला होते. त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. अफाट ज्ञानाचा खजिना आपल्यासमोर त्याने उघडून ठेवलेला असतो. गरज असते ती फक्त आपण तिथे जाण्याची, त्याचा आस्वाद घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची. अशाच आडवाटेवरून फिरताना सुखकर्त्यां गणेशाची विविध स्थाने, त्याची विविध रूपे नजरेस पडली. कधी तो राजगडच्या सुवेळा माचीमध्ये भेटला, तर कधी हरिश्चंद्रगडावर भेटला. कधी भोरगिरीसारख्या शांत रमणीय गावी भेटला, तर कधी सागरकिनारी बुरोंडीला. ऐन समुद्रात कुलाबा किल्ल्यामध्ये पण तो आहे आणि एरंडोल-आजरा इथल्या रम्य प्रदेशी तो आहे. कधी तो टेकडीवर उभा आहे तर कधी चक्क झोपलेला आहे. पण तो सगळीकडे आहे, तो सर्वागसुंदर आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आपली वाट पाहतो आहे. नेहमीचे प्रसिद्ध गणपती तर सगळ्यांनाच माहिती असतात. त्यातल्या अनेकांचे व्यावसायिकीकरणसुद्धा झालेले आहे. त्यांच्या दर्शनासाठी तासन्तास ताटकळत थांबावे लागते. परंतु हे आडवाटेवरचे गणेश अत्यंत शांत, रमणीय ठिकाणी वसले आहेत. गर्दी, गोंगाट काहीही नाही. देव आणि आपण यांच्यामध्ये कोणीही नाही. कितीही वेळ इथे थांबावे, त्याच्याशी संवाद साधावा, मन शांत करून घ्यावे आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालू लागावे. हे सगळे आडवाटेवरचे गणेश तुमच्यासमोर आणण्याचे प्रयोजन हेच आहे. मुद्दाम, आवर्जून त्यांना भेट द्यावी आणि मन:शांती अनुभवावी. काही वेगळे बघितल्याचा आनंद तर आहेच. पण या सर्व ठिकाणी देव भक्तांची वाट पाहात उभा आहे. गरज आहे आपण जरा वाट वाकडी करायची आणि त्या सुखकर्त्यांची भेट घेण्याची. रेटारेटी करून दर्शन घेण्यापेक्षा हे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आडवाटेवरचे गणपती तुम्हा सर्वाना निश्चितच भावतील. त्यासाठीच हा सारा खटाटोप. फार लांब जाण्याची गरज नाहीये. आपण नेहमी जातोच अशाच ठिकाणी फक्त थोडी वाट वाकडी करा. या आडवाटेवरच्या गणपतींच्या दर्शनासाठी चला निघू या..
रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा. दंतकथा; आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुरवधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रा नगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रा गणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेशमंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पुष्करणीसारखी एक विहीर आहे. ही विहीर चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची एक काळ्या दगडाची मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची व सुंदर असून, या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे. एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रा नगरीमध्ये केला, असेही सांगितले जाते.
रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटेने चालू लागलो की काही गमतीशीर गोष्टी आपल्यासमोर येतात. भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे हे भोरगिरी. राजगुरुनगरवरून वाडा, टोकावडेमाग्रे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. अगदी छोटं टुमदार गाव आहे हे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर हे गाव आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पोटात गुहा खोदलेल्या आहेत. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते. कोटेश्वर मंदिरात शिविपडी तर आहेच; पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली स्कर्ट नेसतात तशीच रचना त्याच्या वस्त्राची दिसते. ही वेशभूषा पाश्चात्त्य वाटते. तुंदिल तनू असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो; तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेश मूर्ती त्याच्या वस्त्रामुळे निश्चितच वेगळी ठरलेली आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात भोरगिरीला अवश्य यावे. भोरगिरी ते भीमाशंकर हे फक्त सहा किमीचे अंतर. तो एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात.
कोल्हापूर जिल्ह्यतला गडिहग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरंतर हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिक दृष्टय़ासुद्धा हा प्रदेश काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ आहे. गर्द झाडी, सह्यद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यांसारखे निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडिहग्लजच्या पश्चिमेला फक्त सात कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे. इ. स. १९०७-०८साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाल, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून १९८७ ते १९९२ या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते ४ मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बठी असून तिची उंची अंदाजे सव्वा दोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ नऊ एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी) घराण्याकडे गेल्या ३०० वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे. कोल्हापूर-गडिहग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
पुण्यात गणेशिखडीमधील पार्वतीनंदन गणपती किंवा िखडीतला गणपती मंदिर शिवकाळापूर्वीपासून अस्तित्वात असावे. असे म्हटले जाते की, राजमाता जिजाबाई एका श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्या वेळी िखडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. त्यांनी या गजाननाचे दर्शन घेतले. ही पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले. काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर शिवराम भट्ट चित्राव यांना या मंदिराचा जीर्णोद्धार करताना गुप्तधन सापडले. ते धन स्वीकारायला बाजीराव पेशव्यांनी नकार दिल्याने त्याचा वापर करून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि िखडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे मंदिर उभारले गेले. या मंदिरात गणेशाची सिंदूरचíचत चार फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. मूर्ती बठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात मांडीवर असून मागील दोन हातात पारशी आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. सर्व पेशवे मोहिमेवर जाताना या िखडीतल्या गणपतीचे दर्शन घेत असत. दुसऱ्या किवळे इथल्या कॉन्ट्रॅक्टर रानडे घराण्यातील मंडळी कुटुंबात कुणाचे लग्न झाले की नवीन जोडप्याला घेऊन या गणेशाच्या दर्शनासाठी आजही येत असत. त्या विधीला 'ओहर' असे म्हणत. त्या वेळी मोठा जेवणावळीचा कार्यक्रम होत असे. एकदा हे सर्व कुटुंबीय या समारंभासाठी जमले असता त्यातल्या श्रेष्ठींना या गजाननाचा दृष्टांत झाला की या ठिकाणी दरोडेखोर येणार आहेत तेव्हा तुम्ही इथून लगेच निघावे. श्रेष्ठींनी सर्व मंडळींना लगेच किवळे इथे हलवले. दरोडेखोर आले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही, अशी दंतकथा आहे. आजही कॉन्ट्रॅक्टर रानडे मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आवर्जून जातात. अजून एक महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती १८९७ साली. रँडच्या खुनापूर्वी चाफेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रँडचा खून केल्यावर दामोदर हरी चाफेकरांनी 'िखडीतला गणपती नवसाला पावला' असा सांकेतिक निरोप खंडेराव साठे यांच्यामार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पार्वतीनंदन गणपतीचे दर्शन मुद्दाम घ्यायला हवे.
वेरूळ म्हटले की डोळ्यासमोर येतात त्या नितांतसुंदर कोरीव लेणी आणि त्यातही कैलास लेणे हे तर लेणी स्थापत्यकलेचा सर्वोच्च आविष्कार आहे. या शिल्पकृतीला जगात तोड नाही. स्थापत्याचे असे शास्त्र आणि तंत्र याच भूमीवर विकसित झाले होते याचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो. बारा ज्योतिìलगांपकी एक असलेले श्रीघृष्णेश्वर हेसुद्धा वेरूळलाच आहे. शिवरायांचे भोसले घराणे याच वेरूळचे पाटील होते आणि घृष्णेश्वराचे भक्त होते. हे सगळे वैभव वेरूळला आहेच, परंतु त्याचबरोबर एक सुंदर गणेशस्थानसुद्धा इथे आहे. त्याचे नाव आहे लक्ष विनायक. अर्थातच आडवाटेवरचे असल्यामुळे अनेक मंडळींना त्याची माहिती नसते. हे गणेश स्थान एकवीस गणेशस्थानांपकी एक आहे. श्रीगणेशाची मूर्ती भव्य असून डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी वर करून बसलेल्या स्थितीतली आहे. या स्थानाशी साहजिकच एक सुंदर दंतकथा निगडित असणारच. त्यानुसार या गणेशाची स्थापना शिवपुत्र काíतकेयाने केल्याचे सांगितले जाते. त्याची पौराणिक कथा अशी की, जेव्हा तारकासुराचे व काíतकेयाचे युद्ध सुरू होते तेव्हा तारकासुराचा वध, पराक्रमाची शर्थ करूनदेखील काíतकेयाला होईना. तेव्हा भगवान शंकराच्या उपदेशावरून त्याने विघ्नराज गणपतीची या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाला आणि त्याच्या कृपेमुळे काíतकेयाला तारकासुराचा वध करणे शक्य झाले. काíतकेयाने म्हणजेच स्कंदाने स्थापन केलेला गणेश तो हाच लक्ष विनायक होय. या कथेवरूनच इथल्या स्थानाला प्राचीन काळी 'स्कंदवरद एलापूर' असे नाव पडले असावे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. औरंगाबादला गेल्यावर आता न चुकता अजिंठा वेरूळबरोबरच या लक्ष विनायकाचे दर्शन अगत्याने घ्यावे.
कोल्हापूर जिल्ह्य़ात आजरा तालुक्यात एक गणेशस्थान आहे एरंडोल. इथली मूर्ती एरंडोल आजरा इथे पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. या मंदिरात अष्टविनायकांच्या प्रतिमा आठ दिशांना ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे. मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहे. तांत्रिक साधना करणाऱ्या लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जन-तंजावर-गोकाक असा प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्रींकडे आली. आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम महाराज पोखरकर यांना द्यावी, असा त्यांना स्वप्नदृष्टान्त झाला. त्यायोगे ही मूर्ती त्यांच्याकडे पोहोचली. तिचे तेज आणि शक्ती सहन न झाल्याने तिचा सुरुवातीला त्यांना बराच त्रास झाला. परंतु त्यांचे काशी येथील गुरू आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि त्याचा त्रास बंद झाला. पुढे महाराजांच्या आश्रमातच मंदिर बांधून तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू असतात. भाविकांची इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात. या आडवाटेवरच्या इच्छापूर्ती गणेशाला नक्कीच भेट द्यायला हवी.
मराठवाडय़ातील ६७ गणेशस्थानांपकी एक असलेले स्थान म्हणजे िलबागणेश. प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून हा श्री भालचंद्र. नगर-बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे ११ कि.मी. वर हे देवस्थान आहे. जवळ जवळ दोन फूट उंचीची शेंदूरचíचत गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. मोरया गोसावी या स्थानाचे वर्णन करताना म्हणतात की. 'चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सन्निध.' महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामींनी या स्थानाला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.
असे सांगितले जाते की िलबासुर नावाचा एक दैत्य इथे राहत होता. त्याने इथल्या प्रजेला उच्छाद आणला होता. तेव्हा गणेशाने िलबासुराचा वध केला. मरते वेळी लिंबासूराने गणेशाची क्षमा मागितली आणि इथले स्थान त्याच्या व गणेशाच्या नावाने प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा प्रकट केली. गणेशाने तसा वर दिला आणि हे ठिकाण िलबागणेश या नावाने प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचे हे कुलदैवत असल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार इ.स. १९३० मध्ये श्री भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर बसवलेला आहे. दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपाच्या मागे मोठी दीपमाळ, तसेच प्रवेशद्वारावर नगारखाना असे सर्व असलेला हा सुंदर परिसर आहे. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदीने तो संरक्षित केलेला आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती िलबासुराची समाधी असल्याचे सांगितले जाते. परळी वैजनाथाचे दर्शन घेण्याआधी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. भाद्रपद प्रतिपदेपासून इथे गणेश उत्सवाला सुरुवात होते. ६६६.२ँ१ीुँं'ूँंल्ल१िं.ूे या वेबसाइटवर माहिती मिळते.
आडवाटेवरचे गणपती शोधताना काही सामाजिक बांधीलकी जपणारी मंदिरे, देवस्थाने भेटतात. तुरंब्याचे देवस्थान हे याच प्रकारातले एक आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर कोल्हापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर राधानगरी तालुक्यात तुरंबे नावाचे गाव आहे. गावातूनच वाहणाऱ्या दूधगंगा नदीमुळे गाव समृद्ध आहे. मुख्य रस्त्यावरच आता जीर्णोद्धार झालेले सिद्धिविनायकाचे मंदिर लागते. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरातन आहे. नोव्हेंबर २००० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. ४० फूट रुंद आणि ८० फूट लांब असा प्रशस्त प्रकार असलेल्या या मंदिरात अंदाजे अडीच फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती संपूर्णपणे शेंदूरचíचत आहे. चारही हातांत विविध आयुधे आहेत. या ठिकाणाचे महत्त्व सांगताना लोक सांगतात की, अष्टविनायकातल्या एका गणपतीचे पुजारी अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून या सिद्धिविनायकाला नवस बोलले आणि त्यांची मनीषा पूर्ण झाली. पंचक्रोशीतच नव्हे, तर अगदी दूरदूरच्या गावांहून इथे लोक मोठय़ा श्रद्धेने येतात. माघी गणेश उत्सव हा इथला खूप मोठा उत्सव असतो. गणेश सप्ताह इथे साजरा केला जातो आणि या सात दिवामध्ये देवस्थानतर्फे ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते यांचे कार्यक्रम ठेवले जातात. जलसुराज्यचे सचिव डॉ. इंद्रजित देशमुख यांचे सक्रिय योगदान या ठिकाणी असते. गायन, कीर्तनाबरोबरच गावातील दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक आणि जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम देवस्थानतर्फे राबवला जातो. देवस्थान समितीचे सचिव बाळासाहेब वागवेकर आणि त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमात असते. मार्गशीर्ष चतुर्थीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो तेव्हा महाप्रसादाचे आयोजन असते. इथे मुद्दाम जाऊन भेट द्यायलाच हवी.
नम: कालीमालापघ्नम्। भाक्तानामिष्टदम् प्रभुम्।
गव्हरं सुनिबद्ध तम्। शिलाविग्रहिणेनम:।
कलियुगातील सर्व दोषांचा संहार करणारा, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, विश्वव्यापी असणारा, पण गुळ्यातील डोंगरामध्ये गुहेत अत्यंत गुप्तपणे राहणारा व बाह्य़त: पाषाणाच्या रूपाने दृश्यमान होणारा असा गजानन त्याला आम्ही नमस्कार करतो.
रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या गणेशगुळे इथल्या गणपतीबद्दल अगदी यथार्थ वर्णन या श्लोकात केलेले आढळते. खूप मोठय़ा स्थानापुढे इतर ठिकाणे झाकोळून जातात, असेच काहीसे इथे झाले आहे. सुप्रसिद्ध गणपतीपुळ्याच्या जवळच असलेले हे ठिकाण हे असेच काहीसे झाकोळले गेले आहे. या ठिकाणाचे आणि गणपतीपुळ्याचे संबंध काही दंतकथांमधून आपल्याला आढळतात. रत्नागिरीच्या दक्षिणेला श्री स्वरूपानंद स्वामींच्या पावस या गावापासून गणेशगुळे अवघे दोन कि.मी.वर आहे. गावात आदित्यनाथ, वाडेश्वर, लक्ष्मीनारायण ही मंदिरे तर आहेतच; परंतु इथे असेलेले श्री गणेश मंदिर अगदी वैशिष्टय़पूर्ण आहे. ते उंच डोंगरावर असून अगदी शहाजीराजांच्या काळापूर्वीही ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. त्या काळी विजापूर भागात असे घुमट असलेले बांधकाम करीत असत. त्याच प्रकारची या मंदिराची घुमटी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी शिळा असून त्यामुळे ते दार बंद केलेले दिसते. इथे या शिळेलाच गणेश मानून तिची पूजा करतात. त्या शिळेवरच एक गणेशाकृती प्रकट झालेली दिसते. या गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला व तो पुन्हा इथे प्रगट झाला, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. नंतर रत्नागिरीमधील एक सधन व्यापारी थरवळशेट यांनी या मंदिराला एक मोठा सभामंडप बांधून दिला. माघी चतुर्थीला इथे तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
रत्नागिरीपासून फक्त २० कि.मी.वर आणि पावसपासून दोन कि.मी.वर असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे.
कोकणात भटकंतीला कुठेही जा, जागोजागी तुम्हाला निरनिराळी देवळे-राउळे निसर्गरम्य परिसरामध्ये निवांत असलेली दिसतील. इथे जवळजवळ प्रत्येक देवस्थानाला एकेक दंतकथा, गूढरम्य अशा गोष्टी चिकटलेल्या आहेत. काही देवळे मात्र खरोखरच आडवाटेवरची आहेत. चांगले रस्ते असल्याने तिथे जाणे जरी आता सोयीचे झाले असले तरीसुद्धा ही देवळे अशा अनगड जागी वसली आहेत की तिथे पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. अशा ठिकाणी गेले की खरंच मन:शांती लाभते. देव आणि आपण फक्त दोघेच आणि आपल्या साक्षीला असतो पाण्याचा झुळुझुळु वाहणारा प्रवाह आणि पक्ष्यांची अखंड साद. बाकी कोणीही नाही. पोखरबावला आल्यावर अगदी असेच वाटते. इथून हलूच नये असे वाटते. इथे डोंगराला एक खूप मोठे नसíगक छिद्र पडले आहे. त्याच्या खालून अव्याहत एक ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेलाय म्हणून पोखर आणि खाली तळे, ओहोळ आहे म्हणून बाव. त्यामुळे हे स्थान झाले पोखरबाव. देवगड या आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ठिकाणापासून पोखरबाव जेमतेम ११ कि.मी.वर आहे. देवगड-दाभोळे-दहिबाव रस्त्यावर दाभोळे गावापासून २ कि.मी.वर हे ठिकाण आहे. रस्त्याच्या बाजूला एक छान गणपती मंदिर बांधलेले दिसते. संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती बघण्याजोगी आहे. चतुर्भुज गणेश एका आसनावर बसला असून त्याच्या पायाशी वाहन उंदीर आहे. मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने खाली जायला पायऱ्यांचा रस्ता आहे. खाली शंकराची एक स्वयंभू िपड दिसते. याबद्दल एक कथा अशी सांगतात की ही िपडी हजारो वष्रे पाण्याखाली होती. १९९९ साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टान्त झाला. त्यानुसार त्यांनी ही मूर्ती पाण्यातून वर काढली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. अत्यंत नितळ आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह इथे वाहत असतो. हे पाणी भक्त तीर्थ म्हणून वापरतात. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर, मालवण, विजयदुर्ग, देवगड यांपकी आता कुठेही गेलात तर या गणपतीचे दर्शन आणि इथल्या अनाहत निसर्गाचा अनुभव अवश्य घ्यावा.
संदर्भ: Loksatta
लेखक : anonymous