बंधनातून सुटण्याचा तर
अट्टाहास चाललाय माझा,
आणि तू पुन्हा बंधनातच
अडकवू पाहत आहेस,
मी एकटाच चाललोय
फरफटत आयुष्यात
जाऊ दे ना,
तू कशाला सोबत वाहत आहेस ?
मुक्ती, बंधनं अशा जड शब्दांचे
बंध फुटतील माझ्या वेदनांनी
जाईन मी वाहत
नदीच्या इशार्यावर
तू मात्र येऊ नकोस प्रवाहात,
थांब निरंतर तिथेच किनाऱ्यावर
माझ्या आवेगाचा सुनामी
पेलवणार नाही तुला..!!