फारशी गर्दी नव्हती. एका स्टॉपवर दोन
महिला प्रवासी बसमध्ये चढल्या. तीस ते
पस्तीशीतल्या असाव्यात. त्या शेतमजूर होत्या.
बहुधा पाहुण्यांकडे
एका महिलेची मुलगी असावी... बऱ्याच
दिवसांनी त्या मुलीकडे जात असाव्यात... बस सुरू
झाल्यानंतर पाचच मिनिटांत त्यांची चर्चा सुरू
झाली... अगं, माजी पोर वाट बघत असेल
सकाळपासून. तिला गेल्या गेल्या खायला देते
बघ... असं म्हणत असताना तिने पिशवीत हात
घातला... तिने लेकीसाठी खायला घेतलेलं
गडबडीत विसरल्याचं लक्षात आलं...
आता त्या "माय'चा चेहरा पाहवत नव्हता. अगं,
माझं लेकरू माझी वाट बघत असंल, त्येच्या हातात
गेल्या गेल्या काय देऊ गं? असं म्हणत "ती'
रडकुंडीला आली.
बिस्कीटपुडा तरी घेतला असता पार
एसटी सुटली... मळा वस्तीत उतरणार असल्यामुळं
कुठं काय मिळणार नाही... काय करायचं गं... असं
म्हणत तिचा चेहरा काळवंडला... कंडक्टर
सिटशेजारीच त्या बसल्या होत्या. कंडक्टर
काहीसे ज्येष्ठ होते.
त्यांच्या चेहऱ्यातूनही त्या मायेची "तगमग'
सुटली नाही. इतक्यात बेल वाजली.
एका पानपट्टीसमोर जाऊन एसटी थांबली.
कंडक्टरने पटकन आदेश दिला... मावशी पटकन
काहीतरी घेऊन या... थांबवतो एसटी...
अनपेक्षितपणे हे उत्तर मिळाल्याने
त्या दोघींना काही कळेनाच...
अगदी अर्ध्या मिनिटासाठी एसटी थांबली.
त्या "माय'ने क्षणाचाही विलंब न
लावता खाली उतरून दहा रुपयांचा एक
बिस्कीटपुडा विकत घेतला.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता...
माय-लेकीच्या प्रेमाने
एसटीच्या "नियमा'वरही मात
केली होती.