१२/१४/२०१६

माणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, "चला, आता जेवायला मोकळा झालो." बारा-साडेबारा झाले की भुकेनं व्याकूळ व्हायचे.
भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेत आणि शतपावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही.
तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला 'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं.