१/१८/२०१७

हिची नाराजी


आज हि कशावरून नाराज आहे कळत नाही.
काही केल्या हिची कळी खुलत नाही.

''आरे वा! आज नवीन ड्रेस वाटतं!" मी खडा टाकला
''जुनाच तर आहे.. लक्ष कुठे असतं?'' तिनं विषय तोडला
''कानात आज का रिंगा घातल्यास?'' मी विचारलं
''रोजच तर असतात'' तिनं फटकारलं.
आज हिचा बर्थ डे नाही अन नाही लग्नाची anniversary… पण
आज हि कशावरून नाराज आहे कळत नाही.
काही केल्या हिची कळी खुलत नाही.

काही आणीन म्हणून विसरलोय असं ही आठवत नाही
दिवसभरात फोन केला नाही, असं ही झालं नाही
पायातले चाळ नवे तर नाहीत?
हातातली अंगठी बदललेली तर नाही???
आयब्रो किंवा फ़ेशिअल केलंय असंही वाटत नाही…पण
आज हि कशावरून नाराज आहे कळत नाही.
काही केल्या हिची कळी खुलत नाही.

गादीवर पडल्यावर घाबरत मी म्हणालो,
''सांग ना काही चुकलं माझं? का मी काही विसरलो.?
तू दिलेला डबा तर सगळा संपवला.
भाजी टेस्टी होती म्हणून फोनही केला..
आज बाहेर पार्टी केल्याचीही देऊन झाली कबुली…पण
आज तू कशावरून नाराज आहेस कळत नाही
काही केल्या तुझी कळी का खुलत नाही?''

''तुमचं हल्ली माझ्या कडे लक्षच कुठे असतं!
काय करते मी हे तुमच्या गावीही नसतं!
Aerobics चा आज माझा पहिला दिवस होता.
जायचं तिकडे लवकर म्हणून तर सगळा घाट होता..
नाही केला फोन, ना साधी चौकशी. अन म्हणताय…पण
आज मी कशावरून नाराज आहे कळत नाही
काही केल्या माझी कळी का खुलत नाही?''

ऐकलं हे अन थोडा relax झालो.
ठेवून पोटावर हात तिच्या, मी म्हणालो
''पोटच काय तुझी तर कंबरही सुटलेली नाही.
Aerobics तर सोड, तुला पार्लरची ही गरज नाही.''
ऐकलं हे अन ती खुश झाली, सारून नाराजी दूर,
ती माझ्या कुशीत आली..
पाहिलंत! हे एवढं सोपं होतं…
अन मी मात्र उगाच विचार करत होतो…पण
आज हि कशावरून नाराज आहे कळत नाही
काही केल्या हिची कळी खुलत नाही

मित्रा. बायकोचं प्रेम हे असंच असतं..
छोट्या छोट्या गोष्टींतच त्यांचं सुख दडलेलं असतं..
नको असतात त्यांना पिकनिक, ड्रेस अन दागिने.
हवे असतात केवळ आपले शब्द चार कौतुकाचे.
आपण मात्र तोडून आणतो आकाशातले चंद्र अन तारे.
अन विचार करत रहातो…पण
आज हि कशावरून नाराज आहे कळत नाही
काही केल्या हिची कळी खुलत नाही


केदार…

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search