पावसाळ्यामध्ये मित्रमैत्रिणींबरोबर ट्रेकला किंवा वन डे पिकनिकला जाताना आपण अनेकदा उत्साहामध्ये सुरक्षेसाठी महत्वाच्या असणा-या अनेक गोष्टी विसरतो. तरुणाईमध्ये हिट असलेल्या अश्याच लोकप्रिय ट्रेक डेस्टीनेशनवरील संभावीत धोक्याची ही यादी आपल्या ट्रेककरी भटक्या मित्रांपर्यंत नक्की पोहचवा.

लोहगड-विसापूर, ड्युक्सनोज : पावसाळ्यामध्ये या भागात दाट धुके असते, वाढलेल्या गवतामुळे पायवाटाही पुसल्या जातात. त्यामुळे दर वर्षी नवखे पर्यटक या मार्गावर रस्ता चुकतात.

राजमाची : मुख्य रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने वर जाण्याचा प्रयत्न करणारे पर्यटक हमखास वाट चुकतात.

लोणवळा : पावसाळी पर्यटनासाठी सर्वांत लाडके ठिकाण असल्याने सुट्ट्यांच्या दिवशी वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीच्या नियोजनाअभावी तासन्‍‍तास वाहतूक ठप्प होते.

भुशी डॅम : पुणे आणि मुंबईकरांचा आवडता धबधबा. पण अतिउत्साह दाखविणाऱ्या पर्यटकांसाठी हा धबधबा घातक ठरतो आहे. हजारोंच्या संख्येने या डॅमवर पर्यटक येतात, यातील कित्येक जण मद्यपानही करतात. यामुळे दर वर्षी गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत.

ठोसेघर : निसर्ग सौंदर्याची प्रचिती देणारा हा धबधबा मोठा असल्याने त्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नाही. धोक्याच्या सूचना वाचूनही पर्यटक त्यामध्ये उड्या मारतात. पाण्याचा प्रवाह समजला नाही, म्हणून काही पर्यटकांनी प्राण गमावले आहेत.

मढेघाट : गेल्या काही वर्षांतच प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा सुंदर धबधबा आहे. अनेक पर्यटक त्याच्या पात्रापासून पाण्यातून चालत मुखाकडे वर चालत जातात. एखाद्या वेळेस पाण्याचा लोंढा आला तर त्यातून वाचणे अशक्य आहे. पण या धबधब्याजवळ कोणत्याही सूचनांच्या पाट्या आणि पर्यटकांना अडविणारे दोर अथवा रेलिंगही लावलेले नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी हा धबधबा धोकादायक ठरत आहे.

मांदळे धबधबा (महाड) : हा धबधबा अतिशय धोकादायक आहे. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे याचे पात्र (डोह) दहा फूट खोल गेले आहे. पण लांबून पाहताना ते लक्षात येत नाही. पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही या पाण्यात पोहताना अवघड जाते.

मुळशी-ताम्हिणी : धबधबे आणि निसर्ग रम्य वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध असले तरी आता दारूपार्ट्यांचा अड्डा झाला आहे. जोडपी आणि कौटुंबिक सहलीसाठी हा परिसर योग्य राहिलेला नाही. ठरलेल्या वाटा सोडून इतर मार्गावर गेल्यास पर्यटकांना लुटणाऱ्या टोळ्याही सध्या सक्रिय आहेत.

पवना धरण : अनेक पर्यटक पवना धरणावर उत्साहाने फिरायला जातात. पण हा परिसर जोडपी अथवा छोट्या ग्रुपने फिरण्यासारखा नाही. काळे कॉलनी ते पवना धरण हा मार्ग निर्मनुष्य असल्याने येथे लुटालुटीच्या घटना वाढत आहेत.

हाडशी तलाव : ताम्हिणी, मुळशीबरोबरच हाडशी हे लोकप्रिय ठिकाण आहे. तेथील तलाव सगळ्यांनाच आकर्षित करतो, पण त्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका आहे.


संदर्भ:Maharashtra Times

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita