६/२२/२०१७

लोणावळा-खंडाळा


मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवरील सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळ्यात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळ्यात जांभळं आणि करवंदाची लायलूट असते.
मुंबई व पुणे या दोन्ही शहरांपासून ही ठिकाणे अगदी जवळ असल्याने सुटीच्या दिवसात येथे खूपच गर्दी लोटते. मुंबईहून अवघ्या तीन-चार तासात तर पुण्याहून केवळ दीड-दोन तासात येथे पोहोचता येते.
राहण्या-जेवणाची विपुल सोय हे या ठिकाणांचे आगळे वैशिष्ट्य होय. या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेण्या, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुद्धा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : लोणावळा-खंडाळा (म.रे.)
मुंबई-लोणावळा (रेल्वे मार्गे) : १२८ कि.मी., मुंबई-लोणावळा रस्त्याने : १०४ कि.मी.
पुणे-लोणावळा (रेल्वे मार्गे) : ६४ कि.मी.संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:Internet

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search