६/१७/२०१७

पालक पनीर डोसा
जेव्हा डोशाचा विषय निघतो, तेव्हा सर्वप्रथम लक्षात येतो तो मसाला डसा. परंतु, या सर्वपरिचीत डोशात काहीप्रमाणात बदल करून आपण त्याला पौष्टिक न्याहारीत रुपांतरित करू शकतो. जर तुम्हाला साधा डोसा खाण्याची इच्छा नसेल आणि बटाटादेखील नकोसा झाला असेल, तर ही पाककृती तुमच्यासाठी एकदम योग्य आहे.


पालक पनीर डोसा

साहित्य: डोशाचे पीठ (२-३ कप), पालक पेस्ट (अर्धा कप), मीठ (१ चमचा अथवा चवीनुसार),

सारणाचे साहित्य: चिरलेला पालक (२ कप), कुस्करलेले पनीर (२०० ग्रॅम / १ कप), तेल (२-३ चमचे), मीठ (अर्धा चमचा अथवा चवीनुसार), जीरे (अर्धा चमचा), १-२ बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिर्च्या, अर्धा इंच किसलेले आले, लाल मिर्ची (पाव चमच्यापेक्षा कमी) (हवी असल्यास वापरावी).


कृती:


१. सारणाची कृती

भांड्यात २ चमचे तेल घेऊन, ते गरम झाल्यावर त्यात जीरे घालून थोडा वेळ ढवळा. मग त्यात हिरवी मिर्ची, आल्याची पेस्ट घालून चांगले ढवळा. नंतर कपलेली पालकाची पाने, मीठ, लाल मिर्ची आणि पनीर घालून सर्व चांगल्याप्रकारे एकत्र मिश्रीत करा. हे तयार झालेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.

आता डोशाच्या बॅटरमध्ये पालकाची पेस्ट आणि मीठ घालून चांगलं ढवळून घ्या. पीठ घट्ट वाटत असल्यास थोड पाणी घाला.


२. डोशाची कृती
आता नॉनस्टिक तव्याला आधी गरम करून, मग तव्यावर थोड तेल टाकून पसरवून घ्या. मग, २ चमचे डोशाचे पीठ तव्यावर घालून गोलाकार पसरवा. डोसा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्या. आधी तयार केलेलं सारण १ ते २ चमचे इतक्या प्रमाणात घेऊन डोशावर पसरवा. डोशाची गोल गुंडाळी करून डोसा तव्यावरून खाली उतरवा.


दुसरा डोसा बनविण्याआधी तव्यावरून ओल्या कापडाचा बोळा फिरवून घ्या, जेणेकरून तवा जास्त गरम होणार नाही. तवा जास्त गरम झाल्यास डोसा जळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे सर्व डोसे तयार करा. गरमगरम पालक पनीर डोसा सांबार अथवा नारळाची चटणी किंवा दाण्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.


सुचना:

१. स्टफिंग तयार करताना पालक जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा पालकाला पाणी सुटेल.

२. पालकाची पेस्ट करताना पालक दोन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून, ग्राईंडरमधून या पानांची चांगली पातळ पेस्ट करून घ्या.


डोशाचे पीठ:

३ कप तांदूळ आणि १ भाग उडीद डाळ. दोन्ही घटक वेगवेगळे ४ ते ५ तासासाठी भिजवून ठेवावेत. यात १ चमचा मेथीचे दाणे टाकावेत. त्यामुळे डोसे कुरकुरीत होतात. दोन्ही घटकांमधील जास्तीचे पाणी काढून टाका. तांदूळ मिक्सरमधून फिरवून घ्या. मिक्सरमधून फिरवताना २ ते ३ चमचे अथवा गरजेनुसार पाणी घाला. आता डाळ आणि मेथीचे दाणे मिक्सरमधून फिरवून घ्या. ही दोन्ही पीठ एका भांड्यात काढून चांगली एकत्र करा. बॅटर चांगले तयार होऊ द्या. यासाठी उन्हाळ्यात जवळजवळ १२ तासाचा कालावधी लागतो, तर हिवाळ्यात २० ते २४ तासाचा कालावधी लागतो.


संदर्भ: facebook share
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search