केळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे. दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडा खाडीवर व समुद्रावर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगिजांना सहज साध्य झाले.जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे. ओहोटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमिन उघडी पडते व खुष्कीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.
पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकात उतरुन, बस अथवा रिक्षाने (८ किमी) केळवे गावातील चौकात यावे. या चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडीमार्गे भवानगडाकडे जातो.. या रस्त्यावर चौकापासून ५ मिनिटावर कस्टमची इमारत व कस्टमचा किल्ला आहे. या इमारतीकडून उजव्या हाताचा रस्ता केळवे कोळीवाड्याकडे जातो. कोळीवाड्यातून ओहोटीच्यावेळी चालत किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर आहे. लाटांच्या घर्षणामुळे अंदाजे ५ फूटावर तटबंदीत खाच तयार झालेली आहे. या खाचेत चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.