१०/०९/२०१७

भाजे लेणी
कार्ले लेण्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला मुंबई-पुणे रेल्वे लाईनच्या पलीकडे एका लहान टेकडीवर या लेण्या आहेत. मळवली स्टेशनपासून अवघ्या ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या भाजे गावानजीकच्या एका डोंगरात या लेण्या खोदलेल्या आहेत. २५०-३०० फूट उंचीवर या लेण्या असल्याने व हे चढण्यासाठी पायऱ्या असल्याने तेथे जाणे सोपे आहे.
कार्ल्याच्या मानाने येथील गुंफांचा परिसर लहान आहे. या गुंफातही एक चैत्यगृह आहे. शिवाय दगडी स्तूपही आहेत. येथील गुंफा कार्ले गुंफांच्या मानाने साध्या आहेत. येथेही लाकडी काम आहे. चैत्यगृहातील खांबांवर कार्ला येथील चैत्यगृहाप्रमाणे कोरीव शिल्प नाही. चैत्यगृहात एका स्तुप आहे. छत व प्रवेशद्वार या ठिकाणी मोठमोठ्या लाकडी तुळ्यांचा वापर केलेला आहे.
या गुंफांतील सूर्य व इंद्र ही दोन शिल्पे भव्य आणि रेखीव आहेत. चैत्यगृहांचं प्रवेशद्वारही देखणं आणि भव्य आहे.
महाराष्ट्रातील प्राचीन बौध्द लेण्यांचे एक सुप्रसिध्द स्थान, हे गाव पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस सु. ८ किमी. वर व मळवळी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. लोकसंख्या ७२९ (१९७१). येथे जवळच्या एका डोंगराच्या कड्यामध्ये लेणी खोदलेली असून एकूण २२ लेण्यांचा समूह आहे. त्यांचा काळ इ. स. पू. दुसरे-पहिले शतक मानला जातो. उत्तरेकडील पहिले लेणे ही नैसर्गिक गुहा असून त्याची लांबी ९ मी. आहे. सर्व लेण्यांत चैत्य असलेले १२ क्रमांकाचे लेणे बहारदार आहे. हे १८ मी. लांब आणि ९ मी. रुंद असून त्याचे २७ शैलोत्कीर्ण खांब अष्टकोनी आणि शीर्षाकडे थोडे कललेले आहेत. या रचनेमुळे दोन्ही बाजूंना पडव्या निर्माण झाल्या आहेत. स्तंभांवर बौद्ध प्रतीके कोरलेली आहेत. चैत्याची मागील बाजू अर्धवर्तुळाकृती (चापाकार) असून तिथे घुमटाकृती छत आहे. त्याखाली पावणे दोन मीटर उंचीचा स्तूप आहे. त्यावर चौकोनी पेटिका आहे. या चैत्याने प्रवेशद्वार आकर्षक असून चैत्याच्या शेजारी मिक्षूंना राहण्याकरिता खोल्या आहेत. या चैत्याच्या दक्षिणेला पाच-सहा गुंफा असून त्यांतील शेवटची सूर्यगुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. यांतील काही लेण्यांत उत्कृष्ट शिल्पे आहेत. यांतील हत्तीवर आरूढ झालेला, हातात पुष्पमाला धारण करणारा एक पुरूष असून त्याच्या एका हातात अकुंश आहे व एक पताकाधरी सेवक मागे बसला आहे. दुसऱ्या बाजूला चार घोडयांचा रथ, त्यात एक राजपुत्र व त्याच्या दोन्ही बाजूंस दोन सेविका उभ्या आहेत (एकीच्या हातात चवरी असून दुसरीच्या हातात छत्र आहे). या मूर्तीबद्दल तज्ञांत मतैक्य नाही. हत्ती व रथ यांवरील प्रतिमा अनुक्रमे इंद्र व सूर्य यांच्या असाव्यात, असे काही तज्ञांचे मत आहे, तर काहींच्या मते ही दिव्यवदन जातकातील मांधात्याची कथा असावी. इंद्र व सूर्य यांची शिल्पे कलात्मक आहेत. जवळच गवाक्षापाशी एका धनुर्धराचे शिल्प आहे. वऱ्हांड्यातील शिल्पांपैकी बैल व उंट यांच्या मूर्ती ओबडधोबड असून या विहाराची प्राचीनता दर्शवितात. भाज्याच्या लेण्यांत अनेक उत्कीर्ण दान लेखही आहेत. येथील कला बौद्ध विहार आणि चैत्यगृहाच्या स्थापत्याच्या संबंधात प्राथमिक अवस्था दर्शविणारी आहे. येथे थोडी शिल्पे असून याच काळतील पितळखोरे, कार्ले, बेडसे इ. ठिकाणच्या शिल्पांशी ती साम्य दर्शिवतात. शिल्पशैली, लाकूडकामाचा पुरावा व कललेले स्तंभ यांवरून या लेण्यांची प्राचीनता लक्षात येते. हे कार्ल्याप्रमाणे एक पर्यटकांचे केंद्र झाले आहे.


संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search