"ओळखलंत कां डॉक्टर मला?" पेशंट आला कुणी
कपडे होते भिजलेले त्यात गटाराचं पाणी.
तोंड आपलं वाकडं करून आधी जरा हसला
कसाबसा तोल सावरत खुर्चीमध्ये बसला.
डुलतडुलत बोलला मग खाली थोडं वाकून
"अड्ड्यावरती जाऊन आलोय आत्ताच थोडी टाकून.
कशी हल्ली दारू पाडतात कळत नाही काही ,
पहिल्या धारेची घेऊन सुद्धा मुळीच चढत नाही.
नकली दारू पितोय आणि त्यातच शोधतोय नशा
लिव्हर झाली खराब आणि शरीराची होतेय दशा.
'दारू सोड' म्हटलंत म्हणूनच पोटात तिला सोडली
बायको गेली पळून आणि हिच्याशी मैत्री जोडली.
पोटात होतेय जळजळ जरा काळजी माझी घ्या
रॅनटॅकबरोबर दोन चमचे जेल्युसील तरी द्या.
अड्ड्यावरती राडा करून मार थोडा खाल्लाय
मला वाटतं वरचा एक दात जरासा हाल्लाय.
पोटावरती कुणीतरी फिरवून गेलाय चाकू
बिनधास्त घाला टाके तुम्ही करू नका का कू"
रागावलेला मला बघून बरळतंच तो उठला
"अड्ड्यावरती डॉक्टर आज तुम्ही नाही भेटला?"
खळखळून हसले सगळे पेशंट खजील मी झालोय
काय करू मी सांगा सर, तुमच्याकडे सल्ल्यासाठी आलोय
सर तुम्ही काही सांगा तुमचा सल्ला मी मानीन
'अड्ड्यावर जाणं सोड' म्हटलंत, तर मात्र कानफटात हाणीन