भौगोलिक स्थान
पेडगावचा किल्ला बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे. बहादूरगड किल्ला ( आता धर्मवीरगड ) अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणसीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतीरावर धर्मवीरगड किल्ला आहे.
कसे जाल?
पेडगावच्या धर्मवीरगडला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत.
दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत येऊन पेडगाव गाठावे लागते. अलीकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील धर्मवीरगडला जावे लागते.
दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगरकडून अथवा पुण्यातून श्रीगोंदेला पोहोचावे व तेथून पेडगावला यावे. हा मार्ग सोयीचा आहे.
पाहण्यासारखे
पेडगावचा धर्मवीरगड हा भीमेच्या काठावर आहे. याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या धर्मवीरगडाची किल्ल्याला तीन चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उद्ध्वस्त झालेल्या आहेत. याची तटबंदीमात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. नदीच्या बाजूच्या तटबंदीमधे असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मीनारायण मंदिर बर्या अवस्थेमधे आहे. या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मूर्ती सुंदर आहेत.
इतिहास
इतिहास - सुमारे सातशे वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. " पांडे पेडगावचा भुईकोट " असे त्याचे त्यावेळचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांचेकडे हा भुईकोट मोकास ( देखभालीसाठी ) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मुघलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधेभाऊ बहादूरखान कोकालताश हा या किल्ल्याचा त्या वेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहंशाह समजत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादूरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादूरखानाने गडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सददाराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले.
एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादूरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केली. बहादूरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते. ३६५ एकरावर हा किल्ला पसरला असून किल्ल्यावर आजही अनेक अवशेष पाहता येतात. गडावर आजही प्राचीन ( १५०० वर्षांपूर्वीची ) चालुक्य शैलितिल मंदिरे , हत्ती मोटा , राजदरबार, वेशी, तटबंदी असे अवशेष आजही भग्न अवस्थेत उभे आहेत.
छत्रपती संभाजी राजांना अटक - छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. येथील अनन्वीत अत्याचा सर्वश्रुत आहेत
संदर्भ: https://www.facebook.com/Amhichtevede
लेखक :anonymous