११/०६/२०१७

नगारखाना - भवानी मंडप कोल्हापूर !


आपण रोज जुन्या राजवाड्याचा परिसर पाहतो. भाऊसिंगजी रोडवरून मंगळवार पेठेत जायचा एक शॉर्ट कट म्हणून राजवाड्यातून जातो. कांदा भजी, बॉंबे वडा, पाणीपुरी खायची इच्छा झाली तर राजवाड्यात येतो; पण सारं जग फिरून आलेल्या लोकांनाही भुरळ घालणाऱ्या या वास्तूकडे आपण खुद्द कोल्हापूरकर मात्र कोरड्या नजरेने पाहतो. एखाद्या वास्तूचे महत्त्व समजून न घेता त्या वास्तूत आपण वावरत राहिलो तर त्या वास्तूशी आपले नातेच तयार होऊ शकत नाही. जुन्या राजवाड्याच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. जुना राजवाडा ही केवळ दगड मातीची वास्तू नव्हे, तर तेथे कोल्हापूरचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक इतिहास घडला आहे, हेच विसरून गेलो आहे.

महाराणी ताराराणी यांनी पन्हाळा येथे मराठ्यांची दुसरी गादी स्थापन केली. कालांतराने पन्हाळ्यावरून कोल्हापुरात राजधानी स्थलांतरित झाली. महालक्ष्मी मंदिराच्या सानिध्यात असलेल्या जुना राजवाड्यातून छत्रपतीकडून कारभार केला जात होता. छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराजांनी १८२१ ते १८३८ या कालावधीत मराठी राज्याच्या कारभार करताना जुना राजवाड्यासमोर देखण्या नगारखान्याची इमारत उभी केली. उत्तर भारतातून कसबी पाथरवटांनी महाराजांनी कोल्हापुरात आणले होते. दरमहा त्यांना २५ ते ३० रूपये मजुरी होती. जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळून घोटीव दगड कोल्हापुरात आणण्यात आला. त्यासाठी पाच हजार कामगार होते. वेतून दगड कोल्हापुरात आणले जात होते. शके १७५६ म्हणजेच ऑक्टोबर १८३४ मध्ये महाराजांच्या हयातीत नगारखान्याची इमारत पूर्ण झाली. राजर्षी शाहू महाराजांनी आपली कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहानिमित्त जुना राजवाड्याच्या बाहेर भवानी मंडप बांधला.
प्रत्येक शहराचा एक केंद्रबिंदू असतो. तसा कोल्हापूरचा केंद्रबिंदू जुना राजवाडा आहे. जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानच्या राजधानीची डौलदार वास्तू. वास्तू दुमजली, काही भागांत तीन मजली व वाड्याच्या आतल्या भागात सहा सुंदर दगडी चौक व कारंजा असणारी. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या सूनबाई ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. संस्थानची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात आणली. शिवरायांशी इतके थेट नाते असणारा हा राजवाडा म्हणजे तत्कालीन मराठा बांधकाम शैलीचा एक नमुना आहे. राजवाड्यात आज पोलिस ठाणे, प्रांत ऑफिस, रजिस्टर ऑफिस अशी कार्यालये आहेत; पण त्या काळातली खजिना, टांकसाळ (नाणे पाडण्याचा कारखाना), दरबार अशी वेगवेगळी दालने आजही बंद आहेत.

जुन्या राजवाड्याचा नगारखाना ही स्वतंत्र वास्तू आहे. राजवाड्यानंतर हा नगारखाना बांधला आहे; पण दगडी चार मजली हा नगारखाना म्हणजेच जुना राजवाडा आहे, अशी बहुतेकांची समजूत आहे. या नगारखान्यात गुळगुळीत संगमरवरी दगडाचा आयने महाल आहे. या दगडात आपले प्रतिबिंब दिसू शकते इतकी त्याची नजाकत आहे.

हा झाला वास्तूचा भाग; पण जुन्या राजवाड्याच्या आवारात 1857 च्या उठावाचा रक्तरंजीत इतिहास घडला आहे. हा इतिहास एका सलग साखळीत लोकांसमोर आलेलाच नाही, अशी परिस्थिती आहे. 1857 च्या उठावात चिमासाहेब महाराजांनीच उठावाला बळ दिले या संशयावरून चिमासाहेब महाराजांना ब्रिटिशांनी कोल्हापुरातून कराचीला नेऊन नजरकैदेत ठेवले. याच राजवाड्यात झालेला उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला. क्रांतिकारकांना राजवाड्याच्या परिसरात मृत्युदंडास सामोरे जावे लागले. स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा जुना राजवाडा हा एकमेव साक्षीदार आहे.

त्यामुळे जुना राजवाडा ही केवळ वास्तू नव्हे, तर तेथे इतिहास दडला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा इतिहास घडला आहे; पण या वास्तूची ही बाजू ठळकपणे समोर न आल्याने जुना राजवाड्याच्या वाट्याला अनास्था आली आहे. जर खरोखर या वास्तूचे संवर्धन करायचे ठरवले तर जुन्या राजवाड्याच्या परिसराची गणना देशातल्या एका चांगल्या चौकात होऊ शकणार आहे.

चित्र - नगारखाना इमारत, जुना राजवाडा चे दुर्मिळ जुने छायाचित्र

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search