११/१५/२०१७

गूढ क्रीओल भाषा बोलणारे कोर्लई गाव !


अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.
इ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.
या कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे.
किल्ला हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून त्यावर एक दीपगृह आहे.किल्ल्यावरून रेवदंडा, अलिबाग परिसराचे व समुद्राचे विलोभनीय दर्शन होते.येत्या सुट्टीत अलिबाग व मुरुड ट्रीप आखत असाल तर त्यात या कोर्लईच्या किल्ल्याचा अवश्य समावेश करा
https://www.facebook.com/Amhichtevede/photos/a.786958301319890.1073741828.349954338353624/1904573072891735/?type=3&theater


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search